लेख-समिक्षण

शाश्वत भविष्यासाठी तरुणीची आदर्श मोहीम

आपल्या आजीच्या पाऊलावर पाऊल ठेवत बंगळुरू येथील 15 वर्षांच्या मान्या हर्षा हिने पर्यावरण संवर्धनाचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. आजीच्या शाश्वत जीवनशैलीतून प्रेरणा घेऊन मान्याने ‌‘ग्रँडमाज्‌‍ ग्रीन वीव्ह‌’ नावाचा उपक्रम सुरू केला असून, त्याद्वारे आतापर्यंत सुमारे 1.2 टन कापडी कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाण्यापासून वाचवण्यात तिला यश आले आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये मान्याच्या आजीचे, व्ही. रुद्रम्मा यांचे निधन झाले. आजीच्या आठवणी कशा जपाव्यात, या विचारातून मान्याला एक नवी दिशा सापडली. तिची आजी जुन्या साड्यांपासून कापडी पिशव्या शिवून त्या बाजारात विकत असे. आजीची हीच सवय मान्याने एका मोहिमेचे रूप देऊन पुढे नेली. घरातील काही साड्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज संपूर्ण शहरात पसरला आहे. मान्याने केवळ साड्या गोळा केल्या नाहीत, तर त्यातून प्लास्टिक प्रदूषणाला सक्षम पर्याय उभा केला आहे. तिच्या या उपक्रमाचे स्वरूप पाहिल्यास, निवासी संकुलांमधून वापरलेल्या साड्या आणि चादरींचे संकलन करणे. स्थानिक टेलर्सच्या मदतीने या कापडापासून मजबूत पिशव्या तयार करणे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करणे असे आहे.
आतापर्यंत मान्याने 2,200 हून अधिक साड्या आणि 230 चादरींचा पुनर्वापर करून 28,000 पेक्षा जास्त कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. या प्रयत्नांमुळे अंदाजे 2,45,000 प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी मान्याने कोणतीही बाह्य देणगी स्वीकारलेली नाही. विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमधून मिळालेली बक्षीसांची रक्कम आणि स्वतःची बचत वापरून तिने हा खर्च पेलला आहे. जेव्हा एखादा उपक्रम व्यवसायाचे रूप घेतो, तेव्हा त्यामागचा मूळ उद्देश बदलतो. आम्हाला ही केवळ एक चळवळ म्हणून जिवंत ठेवायची आहे, असे मान्याच्या मातोश्र्ी चित्रश्र्ी यांनी स्पष्ट केले. मान्याचा निसर्गाप्रती असलेला ओढा केवळ कापडी पिशव्यांपुरता मर्यादित नाही. स्वयंपाकघरातील कचरा, विशेषतः कांद्याची टरफले, गाजराची साल आणि लसणाच्या कुड्यांपासून कागद बनवण्याचे प्रयोगही तिने यशस्वी केले आहेत. तिने तयार केलेला कागद लिहिण्यासाठी आणि इतर कामांसाठी वापरता येतो…
पंधरा वर्षाची मान्या उद्याची नागरिक आहे; जर एवढ्या कमी वयात शाश्वत भविष्याचा पाया रचल्या जात असेल, तर नक्कीच मोठा बदल घडून येईल हे खरे नाही काय?

Check Also

स्मार्टफोनच्या साथीने बनला कोट्यधीश

जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, …