लेख-समिक्षण

मुलांना क्रीम बिस्किट देताय ?

आपल्या अनेकांच्या बालपणीच्या आठवणीत हमखास असणारी क्रीम बिस्किट ही त्याकाळाप्रमाणे कधी तरी खावयाची गोष्ट न राहता आजच्या पिढीतील कित्येक मुलांसाठी तो रोजचा आहारघटक बनला आहे. पण ज्या क्रीमवर इतकं प्रेम केलं जातं ते खरोखरीच दुधापासून बनवलेले असते का, याची खातरजमा किती जण करतात?
सध्या सोशल मिडियावर एक व्हायरल व्हिडिओ फिरत असून त्यामध्ये या तथाकथित ‌‘क्रीम‌’ विषयी आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या रंगांंची बिस्किटे दाखवून ‌‘हे क्रीम आहे का‌’ असे विचारुन या क्रीमविषयीचे वास्तव सांगण्यात आले आहे. त्यानुसार, बाजारात मिळणाऱ्या बहुतांश क्रीम बिस्किटस्‌‍मधील क्रीममध्ये हायड्रोजेनेटेड व्हेजिटेबल फॅट, साखर, आर्टिफिशियल फ्लेवर्स आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. म्हणजे, ही क्रीम पांढरी शुभ्र दिसत असली तरी तिचा दुधाशी अथवा सायीशी काहीही संबंध नसतो.
ब्रिटानिया मिल्क क्रीम बिस्किटस्‌‍मध्ये रिफाइन्ड मैदा, साखर, पाम ऑईल, इंटरएस्टीरिफाईड व्हेजिटेबल फॅट, दुधातील मिनरल्स आणि प्रोटीनचे अंश असतात. कोणतेही शुद्ध दूध क्रीम त्यात नाही.
बॉर्बन चॉकलेट क्रीम बिस्किटांमध्ये 33% साखर, पाम तेल, कृत्रिम रंग आणि फ्लेवर, मैदा असतो. यामध्येही खरे चॉकलेट किंवा डेअरी घटक नाहीत.
जगभर लोकप्रिय असणाऱ्या ओरिओ क्रीम बिस्किटांमध्येदेखील मैदा, साखर, पामोलीन फॅट, इनव्हर्टेड शुगर, कोको सॉलिडस्‌‍ आणि अगदीच अल्प प्रमाणात क्रीमसदृश पदार्थ असतात.
हायड्रोजेनेटेड फॅटस्‌‍ म्हणजेच आपण रोज ऐकतो ते ट्रान्स फॅटस्‌‍, जे हृदयासाठी अतिशय घातक असतात. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते, हृदयरोगाचा धोका वाढतो आणि लहान वयातच लठ्ठपणा व हार्मोनल समस्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण होतो. या बिस्किटांमध्ये आर्टिफिशियल रंग व फ्लेवर्स देखील असतात. यामुळे लहान मुलांमध्ये ॲलर्जी, चिडचिडेपणा, वागण्यात बदल अशा समस्या उद्भवू शकतात.
पर्याय काय?
खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यावरील लेबल वाचणे ही आजच्या काळात अत्यावश्यक गोष्ट झाली आहे. क्रीम लिहिले आहे म्हणजे ती नैसर्गिक क्रीमच आहे, असा समज बाळगणे चुकीचे आहे. मुलांना गोड पदार्थ म्हणून बिस्किट द्यायचे असतील तर घरी बनवलेली बिस्किटे किंवा शुद्ध तूप आणि गव्हाच्या पीठापासून बनवलेले पदार्थ वापरणे जास्त सुरक्षित ठरेल. मुलांना सुद्धा शक्यतो अशा कृत्रिम पदार्थांपासून दूर ठेवले पाहिजे.

Check Also

वायरलेस चार्जिंग ः फायद्याचे की तोट्याचे?

स्मार्टफोनच्या जगात सध्या ‌‘वायरलेस चार्जिंग‌’ हे तंत्रज्ञान वेगाने लोकप्रिय होत आहे. केबलची कटकट नसल्यामुळे अनेकजण …