लेख-समिक्षण

अझीम प्रेमजींच्या जीवनप्रवासातून काय शिकावे?

भारतीय उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे अझीम प्रेमजी हे यशस्वी उद्योजक आणि तत्वनिष्ठ विचारवंत म्हणून ओळखले जातात. यापलीकडे जाऊन ते महादानशूर म्हणूनही जगाला ते सुपरचित आहेत.आजच्या स्पर्धात्मक, वेगवान आणि अनेकदा गोंधळलेल्या जगात तरुणांनी नेमकी कोणती दिशा घ्यावी, याचे सूक्ष्म पण प्रभावी उत्तर त्यांच्या विचारांत सापडते.
यशाची व्याख्या आज बहुधा पैशात, पदात किंवा प्रसिद्धीत मोजली जाते; मात्र प्रेमजी यांचा दृष्टिकोन यापेक्षा अधिक व्यापक आहे. त्यांच्या मते यशाची खरी सुरुवात मनात होते. एखादे स्वप्न आधी आपल्या विचारांत आकार घेत नाही, तोपर्यंत ते वास्तवात उतरू शकत नाही. म्हणूनच ते तरुणांना मोठे स्वप्न पाहण्याचा सल्ला देतात. जर आपल्या ध्येयावर लोक हसत नसतील, तर ते ध्येयच अपुरे आहे, असे ते ठामपणे सांगतात. या एका वाक्यातूनच त्यांनी तरुणांना मर्यादा मोडून पुढे जाण्याची प्रेरणा दिली आहे.
तथापि, केवळ स्वप्न पाहणे पुरेसे नसते; त्यासाठी योग्य दृष्टिकोन आवश्यक असतो. कौशल्ये शिकवता येतात, विकसित करता येतात; पण दृष्टिकोन बदलणे सर्वात कठीण असते, हे त्यांनी अनुभवातून सांगितले आहे. म्हणूनच तरुणांनी केवळ ज्ञानाच्या मागे न धावता, आपल्या विचारसरणीला परिपक्व बनवण्यावर भर दिला पाहिजे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी सकारात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवणे हीच खरी ताकद आहे.
जीवनातील अपयशाबाबतही प्रेमजी यांची भूमिका स्पष्ट आणि व्यावहारिक आहे. चुका करणे ही प्रगतीची नैसर्गिक प्रक्रिया आहे; पण त्याच चुका पुन्हा करणे ही निष्काळजीपणाची खूण आहे. त्यामुळे प्रत्येक अपयशातून शिकून पुढे जाणे, हेच यशस्वी होण्याचे खरे सूत्र आहे. तरुण वयात अपयशाची भीती अनेकांना थांबवते; पण प्रेमजी यांच्या विचारांतून ही भीती दूर होते आणि प्रयत्न करण्याची नवी ऊर्जा मिळते.
यशाच्या प्रवासात प्रामाणिकपणाला त्यांनी अत्यंत महत्त्व दिले आहे. सत्याचा मार्ग कठीण असतो, कधी कधी तो एकटेपणाही देतो; पण शेवटी तोच मार्ग सन्मानाकडे घेऊन जातो. आजच्या काळात शॉर्टकट्स आणि तात्पुरत्या फायद्यांचा मोह वाढलेला असताना, हा विचार तरुणांसाठी अधिकच महत्त्वाचा ठरतो.
पैशाबाबतही त्यांची भूमिका संतुलित आहे. पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही, पण तो इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता देतो, असे ते सांगतात. त्यामुळे यश मिळाल्यानंतर समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. स्वतःच्या यशाचा आनंद घेत असताना, त्या यशामागे उभ्या असलेल्या लोकांना विसरू नये, ही त्यांची शिकवण तरुणांना अधिक संवेदनशील बनवते.
आजचा तरुण अनेक संधी आणि तितक्याच आव्हानांच्या वळणावर उभा आहे. अशा वेळी अजीम प्रेमजी यांचे विचार केवळ प्रेरणा देत नाहीत, तर योग्य दिशाही दाखवतात. मोठे स्वप्न पाहण्याची हिंमत, सकारात्मक दृष्टिकोन, चुका मान्य करून पुढे जाण्याची तयारी आणि मूल्यांवर आधारित यशाची जाणीवया चार गोष्टी आत्मसात केल्या, तर हरलेली बाजीही जिंकता येते, हे त्यांच्या जीवनातून आणि विचारांतून स्पष्ट होते.

Check Also

वायरलेस चार्जिंग ः फायद्याचे की तोट्याचे?

स्मार्टफोनच्या जगात सध्या ‌‘वायरलेस चार्जिंग‌’ हे तंत्रज्ञान वेगाने लोकप्रिय होत आहे. केबलची कटकट नसल्यामुळे अनेकजण …