विलियम शेक्सपिअरने त्याच्या ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ या जगप्रसिद्ध नाटकात ‘नावात काय आहे?’ असा प्रश्न विचारला होता. त्या नाटकाच्या संदर्भात त्याचे हे विधान कदाचित योग्यही असेल, परंतु चित्रपटसृष्टीच्या बाबतीत हे विधान अनेकदा चुकीचे ठरले आहे. कदाचित म्हणूनच निर्माते चित्रपटाच्या नावात जराही अशुभ संकेत दिसल्यास, ते नाव बदलण्यास भाग पाडतात. त्यामुळे निर्मितीपूर्वी चित्रपटाच्या नावावर मोठी कसरत केली जाते.- सोनम परब,
अलीकडेच सलमान खानने आपल्या ‘गलवान’ या आगामी चित्रपटाचे नाव बदलून ‘मातृभूमी’ असे केले आहे. या बदलामागे निर्मात्यांनी कोणतीही कारणे दिली असली तरी, जुन्या नावामागे शुभ-अशुभाचे गणित असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे इंडस्ट्रीतील काहींचे म्हणणे आहे. याचे कारण अशा प्रयोगांना चित्रपटसृष्टीत मोठा इतिहास आहे. काही चित्रपट केवळ नावामुळे चाललेले नाहीत, तर काही चित्रपटांच्या नावाचे स्पेलिंग बदलून त्यांचे नशीब पालटण्यात यश आले. बॉलिवूडच्या या झगमगत्या दुनियेत प्रत्येक कलाकार कोट्यवधींच्या कमाईचे स्वप्न पाहतो. पण इथे अंधश्र्द्धेची मुळे इतकी खोलवर रुजलेली आहेत की, शीर्षकातील एका अक्षराचा बदलही चित्रपटाचे नशीब बदलू शकतो, असा ठाम विश्वास आहे. यशाचा मंत्र केवळ प्रतिभा, पटकथा किंवा स्टार पॉवर नसून, योग्य वेळ आणि नशीब हे देखील आहे. अनेक दिग्गज आणि नवोदित कलाकार आजही विविध तोडगे आणि शुभ मुहूर्तांचा आधार घेतात. विशेष पूजा करणे, विशिष्ट मुहूर्तावर चित्रीकरण सुरू करणे किंवा नाव बदलून चित्रपट प्रदर्शित करणे ही बाब बी टाऊनमध्ये सामान्य आहे. इतकेच नव्हे तर इंडस्ट्रीमध्ये चित्रपटासाठीची काही शीर्षके जणू बदनाम आहेत. श्रद्धेच्या परिप्रेक्ष्यातून सांगायचे तर ती अपशकुनी मानली जातात. या नावांचा उल्लेख होताच निर्मात्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट पसरते. यात सर्वातील कुख्यात नाव म्हणजे ‘शहजादा’. गेल्या पन्नास वर्षांत राजेश खन्ना, अजय देवगण आणि कार्तिक आर्यन यांसारख्या ताकदीच्या नटांनी या नावावर जुगार खेळला, पण प्रत्येक वेळी बॉक्स ऑफिसवर पदरी निराशाच पडली.
या नावाचा पहिला फटका 1972 मध्ये सुपरस्टार राजेश खन्ना यांना बसल्याचे मानले जाते. त्यावेळी राजेश खन्ना हे लोकप्रियतेच्या शिखरावर होते. तरीही दिग्दर्शक कोटी कोमिनेनी यांचा ‘शहजादा’ हा रिमेक चित्रपट सपशेल अपयशी ठरला. यात मोना सिंग आणि प्रिया राजवंश मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु व्यापार विलेषकांच्या मते, बजेटच्या तुलनेत या चित्रपटाला 70 टक्के तोटा सहन करावा लागला. तेव्हापासूनच चित्रपटसृष्टीत या नावाविषयी चर्चा सुरू झाली. तब्बल चार दशकांनंतर, 2012 मध्ये अजय देवगणने पुन्हा एकदा हेच नाव आजमावून पाहिले. ‘सन ऑफ सरदार’च्या यशानंतर मनोज मुंतशीर यांच्या पटकथेवर आधारित हा ॲक्शन ड्रामा चित्रपट होता. संजय लीला भन्साळी यांच्या प्रॉडक्शनचे नाव आणि अजय देवगण, संजय दत्त, काजोल अशी तगडी स्टारकास्ट असूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला. निर्मात्यांना सुमारे 50 कोटींचा फटका बसला. समीक्षकांनी पटकथा कमकुवत असल्याचे सांगितले असले तरी, कमल जैन यांसारख्या जाणकारांच्या मते, ‘शहजादा’ या नावानेच आगीत तेल ओतण्याचे काम केले. स्वतः अजय देवगणनेही नंतर कबूल केले की, या अपयशामुळे त्याला विचार करणे भाग पडले.
सर्वात ताजा धक्का 2023 मध्ये कार्तिक आर्यनला बसला. रोहित धवन दिग्दर्शित ‘शहजादा’मध्ये कार्तिक आर्यन, क्रिती सेनन आणि तब्बू यांसारखे कलाकार होते. चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या थाटामाटात करण्यात आले, पण बॉक्स ऑफिसवर तो 60 टक्के तोट्यात गेला. दिग्दर्शक रोहित धवन यांनी ‘काही गोष्टी नियंत्रणाबाहेर असतात’ असे सांगून वेळ मारून नेली, पण चित्रपटसृष्टीत मात्र पुन्हा एकदा ‘शहजादा’च्या शापाचीच चर्चा रंगली.
केवळ ‘शहजादा’च नाही, तर बॉलिवूडमध्ये अशी अनेक शीर्षके आहेत जी ‘फ्लॉपची गॅरंटी’ म्हणून ओळखली जातात. ‘आग’ हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. 1980 च्या दशकात कमल हासन यांचा ‘आग’ चित्रपट प्रसिद्ध झाला; पण तो सुपरफ्लॉप ठरला. त्यानंतर 1999 मध्ये गोविंद आणि कॅरी अमीन यांच्या ‘आग’ने 5 कोटींचे बजेट मातीमोल केले. 2003 मध्ये संजय दत्तचा ‘आग’ चित्रपटही प्रेक्षकांनी नाकारला. अशा प्रकारे तिन्ही ‘आग’ बॉक्स ऑफिसवर जळून खाक झाले. दु
सरे एक नाव म्हणजे ‘बदला’. 1966 मध्ये मीना कुमारी यांचा ‘बदला’ फ्लॉप झाला. 1970 मध्ये धर्मेंद्र यांचा ‘बदला’ चित्रपटही बुडाला. 2019 मध्ये तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘बदला’ने यश मिळवले असले तरी, त्यापूर्वीच्या दोन अनुभवांनी चित्रपटसृष्टीला सावध केले आहे. व्यापार तज्ज्ञ सुमीत कचड यांच्या मते, वारंवार अपयशी ठरणारी नावे टाळणेच हिताचे असते. ‘खिलाडी’ हे नावही काही अंशी अपशकुनी म्हणून ओळखले जाते. अक्षय कुमारचा 1996 मधील ‘खिलाडी’ हिट झाला असला तरी, 2012 मधील ‘खिलाडी 786’ आणि 2022 मधील या मालिकेतील नवीन चित्रपटांना अपेक्षित यश मिळाले नाही. ‘धुंध’ किंवा ‘बारिश’ या नावांच्या चित्रपटांनीही अपयशाचेच विक्रम प्रस्थापित केले आहेत.
1980 मध्ये सुभाष घई यांचा ‘कर्ज’ हा चित्रपट आला, ज्यात ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते, पण तो सपशेल फ्लॉप झाला. 2002 मध्ये सनी देओल आणि शिल्पा शेट्टी यांच्या ‘कर्ज : द बर्डन ऑफ ट्रुथ’ या चित्रपटानेही केवळ 15 कोटींची कमाई केली. 2008 मध्ये हिमेश रेशमियाने ‘कर्ज’चा रिमेक आणला, तोही अपयशी ठरला. याशिवाय ‘कर्ज तेरे खून का’, ‘दूध का कर्ज’, ‘प्यार का कर्ज’ अशा नावाचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर बुडाले.
एखाद्या नावाची भीती वाटते, तेव्हा अंकशास्रतज्ज्ञांकडून त्याचे स्पेलिंग बदलून नशीब पालटवण्याचे प्रयोग बॉलिवूडमध्ये सर्रास चालतात. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ‘शोले’. या चित्रपटाचे मूळ नाव वेगळेच होते, ज्यावर अभिनेता मनोज कुमार यांनी आक्षेप घेतला होता. अखेर ‘शोले’ हे नाव निश्चित झाले आणि 1975 मध्ये या चित्रपटाने 35 कोटींची कमाई करून इतिहास घडवला. सलमान खानचा ‘राधे’ चित्रपटही मूळचा ‘राधिका’ होता, पण त्याचे नाव ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ असे करण्यात आले. आमीर खानच्या ‘लगान’ चित्रपटाचे नाव सुरुवातीला ‘सरकारी राज’ असे होते. मात्र ज्योतिष्यांनी हे नाव नकारात्मक असल्याचे सांगितल्यावर ते ‘लगान’ करण्यात आले आणि त्यानंतर या चित्रपटाला ऑस्करचे नामांकन मिळाले. ‘3 इडियट्स’चे नावही आधी ‘5 इडियट्स’ होते, जे बदलल्यावर चित्रपटाने यशाची नवी शिखरे सर केली. सलमान खानचा ‘दबंग’ चित्रपट सुरुवातीला तीन ‘जी’ लावून लिहिण्यात आला होता, पण ज्योतिषीय सल्ल्यानुसार तो दोन ‘जी’ (दबंगग) वर आणला गेला आणि त्याने 138 कोटींची कमाई केली. ‘बजरंगी भाईजान’चे नावही आधी ‘शुक्ला भाईजान’ होते. विद्या बालन म्हणते त्याप्रमाणे, चित्रपटसृष्टीत नावच खऱ्या अर्थाने ‘राजा’ असते. प्रियांका चोप्राच्या ‘मेरी कॉम’ या चित्रपटाचे नाव आधी केवळ ‘मेरी’ होते, पण नंतर पूर्ण नाव ठेवल्यामुळे हा बायोपिक यशस्वी ठरला.
बॉलिवूड केवळ नावांवरच थांबत नाही. चित्रीकरणापूर्वी विशेष पूजा करणे, क्लॅपबोर्डवर ‘मां भगवती’ लिहिणे, दक्षिण दिशेला तोंड करून पहिला शॉट न घेणे, अशा अनेक प्रथा पाळल्या जातात. अमिताभ बच्चन यांच्या ‘कुली’ चित्रपटातील अपघातानंतर या गोष्टींचे प्रमाण अधिक वाढले. शाहरुख खानचा काळा चष्मा असो वा सलमान खानचे ब्रेसलेट, प्रत्येकजण आपले ‘लकी चार्म’ जपत असतो. मात्र, या सर्वांमध्ये नावाचे स्थान सर्वोच्च आहे. ट्रेड ॲनॅलिस्ट अक्षय जितेश यांच्या मते, गेल्या 20 वर्षांतील 40 टक्के चित्रपट फ्लॉप होण्यामागे नावाचा दोष असल्याचे मानले जाते. डिजिटल युगातही ही परंपरा कायम आहे. आता तर निर्माते नाव ठेवण्यापूर्वी त्याची रीतसर चाचणी करतात आणि ज्योतिषीय सल्ला घेतात. हा विज्ञानाचा भाग आहे की अंधश्र्द्धेचा? यावर बॉलिवूडचे उत्तर एकच आहे दोन्ही!
पांचजन्य वृत्तपत्र