आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय वाढल्यानंतर स्रियांचे केस पांढरे होत असत; पण आज अनेक महिला वयाच्या साठीसमीप असतानाही त्यांचे केसे काळे आहेत. याउलट अगदी कॉलेजगोईंग तरुणींपासून 30-35 च्या वयातील मुली केस पांढरे होऊ लागल्यामुळे अनेक प्रकारची औषधे घेताना दिसताहेत.
यामागे चुकीची जीवनशैली, अस्वास्थ्यदायक आहार, तणाव, प्रदूषण आणि केमिकलयुक्त उत्पादनांचा अधिक वापर ही कारणे जबाबदार असतात. पांढरे केस झाकण्यासाठी अनेक जणी हेअर कलरचा वापर करतात. मात्र अशा प्रकारची उत्पादने कालांतराने केसांना हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत काय करावे? याबाबत आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक उपाय शेअर केला आहे. डॉ. जैदी सांगतात की, आयुर्वेदात एक खास उपाय आहे, जो पांढऱ्या केसांच्या समस्येला मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. यासाठी तुम्ही घरीच एक खास तेल तयार करून केसांना लावू शकता. हे तेल तयार करण्यासाठी तुम्हाला 200 मिलिलीटर मोहरीचे तेल, 20 ग्रॅम भृंगराज, 20 ग्रॅम जटामांसी, 5 ग्रॅम सुका आवळा आणि 25 ग्रॅम मेथी दाण्यांची गरज लागेल.
कसे तयार करावे?
यासाठी सर्वप्रथम एका काचेच्या स्वच्छ बरणीत मोहरीचे तेल भरून घ्या. आता भृंगराज आणि जटामांसीचे छोटे तुकडे करून तेलात टाका. सुके आवळे आणि मेथी दाणे थोडेसे कुटून त्या तेलात मिसळा. हे सर्व केल्यानंतर ही बरणी 10 ते 12 दिवस उन्हात ठेवा. यानंतर हे तेल लोखंडाच्या कढईत मंद आचेवर थोडं गरम करा. थोडंसं शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. तेल थंड झाल्यावर ते साठवून ठेवू शकता.
कसे वापरावे?
©डॉ. जैदी सुचवतात की, सुरुवातीच्या एका महिन्यापर्यंत हे तेल रोज रात्री केसांच्या मुळांमध्ये लावा.
©एक महिन्यानंतर हे तेल एक दिवसाआड लावा.
©तेल संपूर्ण रात्री केसांमध्ये राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्य सल्फेट-मुक्त शाम्पूने केस धुवा.
©घराबाहेर जाताना डोकं झाकून ठेवा.
कसा होतो परिणाम?
डॉ. जैदी सांगतात की, जर तुमचं वय 30-35 वर्षांपेक्षा कमी असेल, तर या उपायामुळे पांढरे केस हळूहळू पुन्हा काळे होऊ शकतात. वय अधिक असले तरीही या उपायामुळे पुढे आणखी केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबू शकते. या उपायाचा नियमितपणे उपयोग केल्यास 2 ते 3 महिन्यांतच तुम्हाला फरक जाणवू लागेल. हे तेल पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि कोणतेही दुष्परिणाम न देता फायदा करून देणारे आहे. त्यामुळे तुम्हीही हा उपाय करून पाहू शकता.
Check Also
जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?
बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू …
पांचजन्य वृत्तपत्र