देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या सुखोई विमान दुर्घटनेत हवाई दलाच्या दोन वैमानिकांना वीरमरण आले. त्याआधी रांचीजवळ झालेल्या एअर ॲम्ब्युलन्सच्या अपघातात रुग्णासह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या काही आठवड्यांपूर्वी बारामतीमध्ये (महाराष्ट्र) चार्टर विमान कोसळून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाले. तसेच, गेल्या वर्षी जून महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर कोसळल्याने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 241 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते.
गेल्या काही आठवड्यांत भारतातील उड्डाण प्रशिक्षण संस्था (ए़फटीओ) आणि छोट्या प्रशिक्षण विमानांशी संबंधित अनेक घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसल्याने लोकांचे याकडे लक्ष गेले नाही. यंदा जानेवारीत ’इंडियावन एअर’च्या सेसना ग्रँड सी208बी विमानाने ओडिशामधील राउरकेला येथे आपत्कालीन लँडिंग केले. त्यानंतरच्या महिन्यात ’रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी’चे 50 वर्षांहून अधिक जुने ’सेसना 172’ हे प्रशिक्षण विमान इंधन संपल्यामुळे कर्नाटकमध्ये अचानक जमिनीवर उतरवण्यात आले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चार दिवसांच्या आत झालेल्या दोन क्रॅश रिपोर्टनंतर 2023 मध्ये या अकॅडमीच्या सर्व केंद्रांवरील उड्डाण प्रशिक्षण उपक्रम अनिश्चित काळासाठी निलंबित केले होते.
अनुभवी कमांडर आणि जुन्या प्रशिक्षकांच्या मते, 1980 च्या दशकात उड्डाण प्रशिक्षणासाठी भारत हे जगातील पसंतीचे ठिकाण होते. मद्रास, दिल्ली आणि देशातील इतर फ्लाइंग क्लबमध्ये श्र्ीलंका, इराण, भूतान, जॉर्डन, मलेशिया यांसह अनेक देशांतील प्रशिक्षणार्थी येत असत. मात्र, 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून हे चित्र पालटले आहे. आता भारतीय प्रशिक्षणार्थी श्र्ीलंकेपासून फिलीपिन्स आणि थेट मोंटेनिग्रोसारख्या देशांत प्रशिक्षणासाठी जात आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की, देशात दरवर्षी दिल्या जाणाऱ्या 1,000 व्यावसायिक पायलट परवान्यांपैकी 700 परवाने अशा व्यक्तींना मिळत आहेत, ज्यांनी भारताबाहेर आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. मे 2025 मध्ये ए़फटीओ विमानांच्या अपघातांबाबत तपास मंडळाने दिलेल्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 13 वर्षांत ए़फटीओ विमानांचे 38 अपघात झाले, त्यांपैकी 14 प्रकरणांत प्रशिक्षणार्थींचा मृत्यू झाला. 2013 ते 2016 या काळात पाच आणि 2017 मध्ये पाच अपघात झाले. 2020 मध्ये कोरोनामुळे उड्डाणे बंद असूनही चार अपघात झाले, ज्यात अनेकांना जीव गमवावा लागला. 2022 मध्ये सात अपघातांची नोंद झाली. विमान वाहतूक उद्योग, डीजीसीए आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील सूत्रांचे असे मत आहे की, बहुतेक अपघात शिस्तीचा अभाव आणि निश्चित केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीचे (एसओपी) पालन न केल्यामुळे झाले आहेत. प्रशिक्षकांकडून प्रशिक्षणार्थींना होणारा त्रास आणि गैरवर्तणुकीचे अनेक आरोपही समोर आले आहेत.
’सोलो फ्लाईट’ किंवा सॉर्टी दरम्यान कॉकपिटमध्ये अनधिकृत व्यक्ती असण्याचे अहवालही मिळाले आहेत, ज्यामध्ये प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी परवानगीशिवाय मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना हवाई सफर घडवून आणतात. 2022 मध्ये अनियंत्रित एअरफील्डवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव आला होता. डीजीसीएने जानेवारीमध्ये सर्व प्रशिक्षण विमानांच्या कॉकपिटमध्ये ऑन-बोर्ड ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग उपकरणे लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कॉकपिट आणि एअर कंट्रोल टॉवरमधील संवाद रेकॉर्ड करण्यासह उड्डाणाची माहिती अचूकपणे नोंदवण्याचा सल्ला ऑपरेटरना दिला आहे. ऑक्टोबर 2025 पासून ए़फटीओ संस्थांना सतर्क ठेवण्यासाठी वर्षातून दोनदा त्यांची क्रमवारी (रँकिंग) जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे.
इतक्या उपाययोजना केल्यानंतरही, भारतातील 60 केंद्रांवर नोंदणीकृत असलेल्या 380 विमानांपैकी किती विमाने नियामक मंडळाने दिलेल्या 120 दिवसांच्या मुदतीत या नियमांचे पालन करतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. भारतातील ए़फटीओ संस्था दीर्घकाळापासून नियम मोडण्यासाठी कुख्यात राहिल्या आहेत आणि ऑपरेटर व अधिकारी यांच्यात मजबूत साटेलोटे असल्याचे बोलले जाते. हे अभद्र युती मोडीत काढण्यासाठी केवळ परिपत्रके जारी करून चालणार नाही, तर त्यापेक्षा कठोर पावले उचलण्याची आता नितांत गरज आहे.-अंजली भार्गव
Check Also
कर्मचारी कपातीची लाट
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टने आपल्या कार्यपद्धतीत आणि मनुष्यबळ नियोजनात एक …
पांचजन्य वृत्तपत्र