लेख-समिक्षण

दहावीत शाळा सोडलेला अब्जाधिश

झिरेोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांचा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रवास कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असाच थक्क करणारा आहे. अवघ्या 17 व्या वर्षी शाळा सोडलेला एक तरुण आज 23 हजार कोटी रुपयांच्या साम्राज्याचा अधिपती बनला आहे, ही किमया त्यांच्या जिद्दीच्या आणि वेगळ्या वाटेने जाण्याच्या वृत्तीमुळे साध्य झाली आहे.
कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1986 मध्ये जन्मलेल्या निखिल यांना शालेय शिक्षणात कधीच रस नव्हता. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी जुने मोबाईल खरेदी-विक्री करण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, जेव्हा त्यांच्या आईला याबद्दल समजले, तेव्हा त्यांनी रागाच्या भरात ते सर्व मोबाईल नष्ट केले होते. ही घटना त्यांच्यासाठी एक मोठा धडा ठरली, ज्यातून त्यांनी जोखीम घेण्याची वृत्ती जोपासली.
दहावीत शाळा सोडल्यानंतर त्यांनी बेंगळुरू येथील एका कॉल सेंटरमध्ये 8,000 रुपये महिना पगारावर रात्रीच्या पाळीत काम करण्यास सुरुवात केली. याच काळात फावल्या वेळेत त्यांनी शेअर बाजारातील व्यवहारांचे बारकावे शिकून घेतले. परंपरागत शिक्षणासाठी दबाव न आणता पालकांनी त्यांना स्वतःची आवड जोपासण्याचे स्वातंत्र्य दिले. अपयशाकडे शेवट म्हणून न पाहता एक धडा म्हणून पाहण्याची दृष्टी त्यांना घरातूनच मिळाली.
2010 मध्ये निखिल यांनी त्यांचे बंधू नितीन कामथ यांच्यासोबत ‌‘जेरोधा‌’ या कंपनीचा पाया रचला. भारतातील किरकोळ ब्रोकरेज क्षेत्रात त्यांनी डिस्काउंट ब्रोकरेज मॉडेल आणले. यामुळे सर्वसामान्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करणे अत्यंत स्वस्त आणि सोपे झाले. ‌‘फोर्ब्स‌’च्या ताज्या आकडेवारीनुसार, निखिल कामथ यांची एकूण संपत्ती 2.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 23,000 कोटी रुपये) इतकी आहे. आज ते भारतातील सर्वात तरुण आणि स्वकष्टाने श्र्ीमंत झालेल्या अब्जाधीशांपैकी एक म्हणून ओळखले जातात. शेअर बाजारातील त्यांच्या धोरणात्मक दूरदृष्टीने आज भारतीय ब्रोकरेज क्षेत्राचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला आहे, हे खरे नाही काय?

Check Also

एका स्वप्नाचा ध्यास

आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक …