लेख-समिक्षण

तप्त झाली वसुंधरा

जागतिक तापमानवाढीच्या भीषण वास्तवाचे चटके आता केवळ आकडेवारीपुरते मर्यादित न राहता जनजीवनाला होरपळून काढू लागले आहेत. ‌‘एक्यूआय.इन‌’ या जागतिक संस्थेने प्रसिद्ध केलेली ताजी आकडेवारी अंगावर काटा आणणारी आहे. जगातील सर्वाधिक उष्ण 20 शहरांच्या यादीत 19 शहरे एकट्या भारतातील असावीत, ही बाब आपल्या देशासमोरील हवामान संकटाची भीषणता स्पष्ट करते. या परिस्थितीला प्रामुख्याने हवामान बदल जबाबदार असला, तरी निसर्गाप्रती असलेली मानवी उदासीनता आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास हे त्यामागचे मूळ कारण आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने गारवा निर्माण केला असतानाच, अचानक आलेल्या उष्णतेच्या लाटेने सर्वांनाच चक्रावून सोडले आहे. हवामानातील हा टोकाचा बदल मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 44.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होणे, ही धोक्याची घंटा आहे. हवामान विभागाच्या निकषानुसार, जेव्हा पारा 40 अंशांच्या पुढे जातो, तेव्हा त्याला अधिकृतपणे उष्णतेची लाट मानले जाते. दुर्दैवाची बाब अशी की, एप्रिलच्या चौथ्या आठवड्यातच देशातील अनेक राज्यांनी ही सीमा ओलांडली आहे. बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सूर्यनारायणाचा प्रकोप शिगेला पोहोचला असून मध्य प्रदेशात तर पहिल्यांदाच रात्रीच्या वेळीही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम दैनंदिन व्यवहारांवर स्पष्टपणे दिसत आहे. दिल्लीतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निर्जलीकरणापासून वाचवण्यासाठी ठराविक अंतराने पाणी पिण्याची आठवण करून देणारी घंटा वाजवली जात आहे. अनेक राज्यांनी शाळांच्या वेळा बदलल्या असून कडक उन्हात मजुरांना काम करण्यास मज्जाव केला जात आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये वाहतूक पोलिसांच्या ड्युटीच्या वेळा बदलण्यात आल्या असून काही ठिकाणी चौकातील सिग्नलही बंद ठेवले जात आहेत, जेणेकरून वाहनधारकांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागणार नाही. आग्रा येथील ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना उन्हाचा तडाखा बसून ते बेशुद्ध पडल्याच्या बातम्याही समोर येत आहेत, जे या संकटाची दाहकता अधोरेखित करतात.
तापमानात होणाऱ्या या अनपेक्षित वाढीमागे अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे आहेत. हिमालयातील कमी झालेली बर्फवृष्टी, समुद्राच्या पृष्ठभागाचे वाढलेले तापमान आणि जंगलांचा घटता विस्तार यामुळे वातावरणातील नैसर्गिक थंडावा निर्माण करणारी यंत्रणा कोलमडली आहे. कोरड्या हवेमुळे ढग निर्मितीला अडथळा येत असून पावसाची शक्यता मावळत आहे. मान्सूनपूर्व काळात जमिनीवर थेट पडणारी तीव्र सूर्यकिरणे ही परिस्थिती अधिक बिकट करत आहेत. कार्बन उत्सर्जनातील वाढ आणि शहरीकरणाच्या नावाखाली चाललेली वृक्षतोड यामुळे आगामी काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारता अधिक वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. भविष्यातील हे संकट टाळायचे असेल, तर आता केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून चालणार नाही, तर पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक आणि ठोस पावले उचलणे ही काळाची गरज बनली आहे. – – अपर्णा देवकर

Check Also

दिलासादायक माघार

केंद्र सरकारने बहुचर्चित ‌‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026‌’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …