मेकअप उठावदार होण्यासाठी तो शास्रशुद्ध पद्धतीने करणे गरजेचे असते. बेस नीट लावला गेला असेल तरच मेकअप अधिक काळ टिकतो. या बेसमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे फेस प्रायमर. यामुळे त्वचा केवळ गुळगुळीतच बनत नाही तर फाउंडेशनही बराच वेळ टिकून राहण्यास मदत करतो. प्रायमर पोर्स कमी दिसण्यास मदत करतो तसेच तेलकटपणा नियंत्रित करण्यासही प्रभावी ठरतो, पण बेसच नीट बसला नाही तर संपूर्ण मेकअप खराब होऊ शकतो.
प्रायमर लावण्यापूर्वी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य क्लिंझरने चेहरा स्वच्छ धुवा. जर तुम्ही थेट प्रायमर लावला तर त्वचेवर असलेली धूळ, मळ आणि तेल मेकअप व्यवस्थित बसू देणार नाहीत, उलट पिंपल्स व पुरळ येण्याचा धोका वाढेल. त्यामुळे फेसवॉश किंवा क्लिंझिंग वाईप्सने चेहरा धुवून त्यानंतर हलका मॉइश्चरायझर लावा.
त्वचेच्या प्रकारानुसार योग्य प्रायमर निवडणे आवश्यक आहे. तेलकट त्वचेसाठी मॅट फिनिश आणि ऑइल-फ्री प्रायमर वापरा. यामुळे अतिरिक्त तेल जमा होणार नाही आणि मेकअप टिकून राहील. ड्राय स्किनसाठी हायड्रेटिंग व क्रीमी टेक्स्चरचा प्रायमर उत्तम ठरतो. कारण तो त्वचेला ओलावा देतो.
कॉम्बिनेशन स्किनसाठी टी-झोनवर मॅट प्रायमर आणि उर्वरित चेहऱ्यावर हायड्रेटिंग प्रायमर वापरा, ज्यामुळे बॅलन्स राखला जातो व मेकअप सुंदरपणे सेट होतो.
प्रायमरचे काम बेस तयार करणे आहे, लेयर जाड करणे नाही. संपूर्ण चेहऱ्यासाठी मटाराएवढे प्रमाण पुरेसे असते. जास्त प्रमाणात प्रायमर लावल्यास मेकअपवर स्लिपरी लेयर तयार होऊ शकते आणि पोर्स बंद होऊन पिंपल्स येऊ शकतात. बहुतेक जणी प्रायमर लावून लगेच फाउंडेशन लावतात, पण त्याला त्वचेत व्यवस्थित सेट होण्यासाठी किमान पाच मिनिटे द्यायला हवेत.
इतर कोणत्याही स्किनकेअर उत्पादनाप्रमाणे प्रायमरही कालबाह्य होऊ शकतो. जुना प्रायमर वापरल्याने त्वचेवर ॲलर्जी, लालसरपणा आणि पुरळ येऊ शकतात. त्यामुळे खरेदी करताना आणि वापरण्यापूर्वी नेहमी एक्सपायरी डेट तपासा.
प्रायमर आणि मेकअप रात्रीभर चेहऱ्यावर ठेवणे त्वचेसाठी घातक आहे. झोपण्यापूर्वी क्लेंझर किंवा मेकअप रिमूव्हरने चेहरा स्वच्छ धुवा, ज्यामुळे पोर्स बंद होणार नाहीत आणि त्वचा ताजी राहील.
Check Also
अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या घातक सवयी
अँड्रॉइड फोन गेल्या दोन दशकांपासून आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, तंत्रज्ञान कितीही पुढारले …
पांचजन्य वृत्तपत्र