लेख-समिक्षण

बाजारातील घसरणीने भयकंप कशाला?

भू-राजकीय संकटामुळे अनेकदा शेअर बाजारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आणि मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळतात. गेल्या दोन महिन्यांपासून इराण युद्धामुळे याचा अनुभव अनेक गुंतवणूकदार घेत आहेत. वास्तविक, या घसरणीचा अर्थव्यवस्थेच्या पायाभूत रचनेवर फारसा परिणाम होत नाही. शेअर बाजार प्रामुख्याने कंपन्यांची कमाई, व्याजदर आणि शेअर्सचे मूल्यांकन या मूलभूत गोष्टींवर चालतो. या गोष्टी भू-राजकीय संकटामुळे कायमस्वरूपी बदलत नाहीत. उदाहरणार्थ, रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात ऊर्जेच्या किमती वाढल्या आणि महागाई वाढली, तरीही भारतीय कंपन्यांच्या व्यापाराची दिशा बदलली नाही. बँकिंग क्षेत्राने कर्ज देणे सुरू ठेवले, आयटी कंपन्यांच्या सेवा सुरू राहिल्या आणि ग्राहकांनी वस्तू खरेदी करणे थांबवले नाही.
संकट आणि आर्थिक संरचना यातील फरक ः भू-राजकीय संकटे ही प्रामुख्याने ‌‘सेंटिमेंट शॉक‌’ म्हणजेच केवळ मानसिक धक्का देणारी असतात. याउलट 2008 चे जागतिक आर्थिक संकट हे केवळ भू-राजकीय नव्हते, तर ते अर्थव्यवस्थेच्या पायाभूत रचनेवर झालेले आघात होते. त्यामुळे त्यातून सावरण्यासाठी देशाला अनेक वर्षेलागली. मात्र, भू-राजकीय संकटांमध्ये कंपन्या स्वतःला परिस्थितीनुसार जुळवून घेतात आणि पुन्हा नफ्यात येतात. टीव्ही न्यूज चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे परिस्थिती गंभीर वाटू शकते, पण अशा काळात आपल्या गुंतवणुकीच्या नियोजनावर ठाम राहणे आणि शिस्त पाळणे हाच योग्य मार्ग आहे.
ऐतिहासिक घटना आणि बाजाराची भरारी ः गेल्या काही दशकांमध्ये अनेक मोठी संकटे आली, पण बाजार दरवेळी सावरला आहे. 1998 च्या रशियन कर्ज संकटानंतर अवघ्या सहा महिन्यांत बाजार पूर्वपदावर आला आणि पुढील पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 15 टक्के वार्षिक परतावा मिळाला. 2001 च्या अमेरिकेवरील 11 सप्टेंबरच्या हल्ल्‌‍यानंतर निफ्टी दोन आठवड्यांत 17 टक्क्‌‍यांनी घसरला होता, पण डिसेंबरपर्यंत तो पुन्हा पूर्वपदावर आला. तसेच 2016 चा सर्जिकल स्ट्राईक किंवा 2019 चा बालाकोट एअरस्ट्राईक यांसारख्या घटनांनंतर बाजार काही दिवसांतच सावरला. 2020 च्या कोरोना संकटात तर बाजार 32 टक्क्‌‍यांनी कोसळला होता, पण अवघ्या चार महिन्यांत त्याने पुन्हा मोठी झेप घेतली.
संकटात दडलेली संधी आणि ॲसेट अलोकेशन ः तज्ज्ञांच्या मते, शिस्तबद्ध गुंतवणूकदारांसाठी अशी संकटे ही गुंतवणुकीची मोठी संधी असू शकतात. जेव्हा बाजार कोसळतो, तेव्हा पोर्टफोलिओमधील इक्विटीचा हिस्सा कमी होतो. अशा वेळी आपल्या नियोजित ‌’ॲसेट अलोकेशन‌’नुसार (उदा. 65% इक्विटी, 25% डेट आणि 10% सोने) पुन्हा गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. जेव्हा इतर गुंतवणूकदार भीतीपोटी शेअर्स विकत असतात, तेव्हा कमी किमतीत शेअर्स खरेदी करण्याची ही उत्तम वेळ असते. भू-राजकीय संकटे ही बाजाराच्या दीर्घ प्रवासात केवळ ‌‘स्पीड ब्रेकर‌’प्रमाणे असतात, हे लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी आपला संयम सोडू नये.– जान्हवी शिरोडकर

Check Also

नवी आव्हाने

निवडणुकीवर आधारित लोकशाहीत प्रतिनिधित्वाचा मूलभूत सिद्धांत हा लोकसंख्येच्या प्रमाणबद्धतेवर अवलंबून असतो. ‌‘एक व्यक्ती, एक मत …