दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ’रामायण’ हा चित्रपट सध्या जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. लास वेगास येथे पार पडलेल्या ’सिनेमाकॉन’ या जागतिक चित्रपट परिषदेत या चित्रपटाचे सुमारे 20 मिनिटांचे न पाहिलेले फुटेज निवडक उपस्थितांना दाखवण्यात आले. या फुटेजला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड दाद मिळाली असून, चित्रपटाचा भव्य आवाका पाहून उपस्थित थक्क झाले आहेत. या विशेष प्रदर्शनानंतर असे समोर आले आहे की, चित्रपटाचे व्हिज्युअल्स आणि सादरीकरण अत्यंत उच्च दर्जाचे असून ते पौराणिक कथा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अद्भूत संगम आहे. या चित्रपटासाठी निर्माते ‘वॉर्नर ब्रदर्स’ या जगप्रसिद्ध स्टुडिओशी जागतिक वितरणासाठी चर्चा करत आहेत. हा करार झाला, तर ‘रामायण’ हा जागतिक स्तरावर 4,500 हून अधिक पडद्यांवर प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरू शकतो. मात्र, अद्याप निर्मात्यांनी या वितरणाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
केवळ प्रदर्शनच नव्हे, तर या चित्रपटाला ’ऑस्कर’च्या शर्यतीत उतरवण्याचीही तयारी सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या महाकाय बजेटमध्ये बनत असलेल्या या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामचंद्रांच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. – किर्ती कदम
Check Also
‘चांद मेरा दिल’चे पोस्टर रिलीज
बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने आपल्या आगामी ’चांद मेरा दिल’ या चित्रपटाचे नवीन …
पांचजन्य वृत्तपत्र