भारतीय संगीतात अशी संकल्पना आहे की, जो स्वर अतिशय निर्मळ आणि स्वयंभू असतो, त्याला ‘गंधार’ म्हणतात. आशाताईंचा आवाज म्हणजे तोच ‘स्वयंभू गंधार’ होता. एखाद्या कठीण चालीचे सोने कसे करावे, हे केवळ त्यांनाच ठाऊक होते. ‘भुई तन मन’, ‘साकार गंधार’ किंवा ‘कुठे न दीप काजवा’ यांसारखी गाणी रेकॉर्ड करताना त्यांनी घेतलेल्या ताना आणि दिलेले भाव पाहून मी थक्क व्हायचो. रेकॉर्डिंग संपल्यावर मी अनेकदा त्यांच्या पाया पडलो आहे. त्यांच्या त्या आशीर्वादाची शिदोरी माझ्यासाठी अलौकिक आहे.- श्रीधर फडके, ज्येष्ठ संगीतकार व गायक
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वियोगातून स्वरसृष्टी अजून नीटशी सावरलेलीही नसतानाच आशाताईंनी जगाचा निरोप घेतला आहे. स्वरसंगीताच्या क्षेत्रातल्या एका महान पर्वाची अखेर त्यांच्या जाण्याने झाली आहे. व्यक्तिशः माझ्यासाठी त्यांचा वियोग प्रचंड धक्कादायक आहे. आशाताई आणि बाबूजी यांच्यातील सांगीतिक मैत्र हे मराठी संगीत क्षेत्रातील एक सुवर्णयुग होतं. त्या काळापासून आशाताई आमच्या घरचा एक अविभाज्य भाग होत्या. बाबूजींच्या संगीतात शब्दांना आणि भावनेला खूप महत्त्व असायचे आणि आशाताईंनी ते नेमकेपणाने टिपले. त्यांच्या आवाजातील लवचिकता आणि कोणत्याही शैलीत स्वतःला झोकून देण्याची वृत्ती थक्क करणारी होती. खरे तर आशाताई आमच्या घरी आल्या त्या माझ्या आईमुळे, ललिताबाईंमुळे. तो काळ आशाताईंच्या संघर्षाचा होता. माझी आई तेव्हा हिंदी चित्रपटांत गात असे. एकदा लोकलने प्रवास करताना अंधेरी स्टेशनवर आशाताई डब्यात चढल्या आणि आईसमोर येऊन बसल्या. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणाल्या, ललिताबाई, मी लताची बहीण. तुम्ही फडके साहेबांना सांगा का मला गाण्याची संधी देण्याबद्दल? आईने हे बाबूजींना सांगितले आणि त्यानंतर बाबूजींनी आशाताईंना बोलावले. तिथून जो प्रवास सुरू झाला, तो पुढे अनेक दशके अविरत चालला.
बाबूजींच्या चालींमध्ये एक प्रकारची शिस्त आणि शब्दांचे वजन असायचे. आशाताईंनी स्वतः एकदा सांगितले होते की, त्या केवळ बाबूजींचे गाणे ऐकत नसत, तर ते आत्मसात करत असत. ‘स्वयंवर झाले सीतेचे’ किंवा ‘थकले रे नंदलाल’ सारखी गाणी गाताना, बाबूजींचे हात कसे हलतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतात, हे त्या बारकाईने टिपायच्या. बाबूजींचा शब्दांच्या उच्चारावर मोठा कटाक्ष असे. ‘स्वयंवर झाले सीतेचे’ मधील ‘गाली लज्जेचे’ या शब्दातील जो ‘गाली’ शब्द आहे, तो त्यांनी ज्या प्रकारे वळवून घेतला होता, तो आशाताईंनी अत्यंत कौशल्याने अजरामर केला. गाणं कसं गायलं पाहिजे, गाताना हाताच्या मुद्रा कशा असाव्यात, चेहऱ्यावर हावभाव कसे असावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. आशाताई जेव्हा स्टुडिओत येत, तेव्हा संपूर्ण वातावरण चैतन्यमय व्हायचे. कामाच्या बाबतीत त्या अतिशय शिस्तप्रिय होत्या, पण तितक्याच प्रेमळही. बाबूजींना त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, हे त्या केवळ एका नजरेतून ओळखत असत. त्यांच्या आवाजात एक प्रकारची ‘खोडकर’ छटा जशी होती, तसाच एक खोलवर जाणारा कारुण्यभावही होता. ‘तुझ्या गळा माझ्या गळा’, ‘आज कुणीतरी यावे’, ‘धुंद एकांत हा’, आणि ‘आज चांदणे उन्हात हसले’ यांसारखी गाणी ऐकताना आजही असंख्य मने स्तब्ध होऊन एका वेगळ्या विश्वात जातात. या गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी बाबूजी अतिशय चोखंदळ असत. आशाताईंच्या आवाजातील जो मखमलीपणा होता तो बाबूजींना खूप आवडायचा. त्या म्हणत असत की, बाबूजींकडून गाणे शिकणे म्हणजे एका शाळेत तालीम घेण्यासारखे असायचे. वडिलांनंतर जेव्हा मी संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा त्यांनी मला दिलेल्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची शिदोरी आजही माझ्यासोबत आहे.
‘ऋतू हिरवा’ या अल्बमच्या वेळी मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तब्बल 21 वर्षांनंतर ‘साकार गंधार’च्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकत्र आलो. आशाताईंसोबत काम करताना मनावर नेहमीच एक प्रकारचे दडपण असायचे. हे दडपण त्यांच्या मोठेपणाचे नसून, त्यांच्या गाण्याप्रती असलेल्या निष्ठेचे असायचे. माझ्या संगीत कारकिर्दीतील ’ऋतू हिरवा’ हा अल्बम एक मैलाचा दगड ठरला. पण या आल्बममागे सात वर्षांची प्रतीक्षा होती. सुरुवातीला ही गाणी मी लतादीदींना ऐकवली होती. त्यांना ती आवडलीही, पण काही कारणास्तव त्यांचे रेकॉर्डिंग होऊ शकले नाही. मी तब्बल सात वर्षेथांबलो होतो. शेवटी 1989 मध्ये मी आशाताईंकडे गेलो. त्यांना सर्व काही प्रामाणिकपणे सांगितले की दीदींकडे ही गाणी आधी गेली होती. त्यांनी चाली ऐकल्या आणि क्षणभर माझ्याकडे नजर रोखून बघत म्हणाल्या, श्रीधर, गाणी कठीण आहेत रे, पण मी गाईन. फक्त मी दीदींना सांगून मगच हे गाणे रेकॉर्ड करेन. जेव्हा ‘ऋतू हिरवा’चे रेकॉर्डिंग झाले, तेव्हा आशाताईंनी त्या गाण्यांचे अक्षरशः सोने केले. ‘भोगले जे दुःख त्याला’ हे गाणे गाताना मी त्यांना म्हटले होते की, ताई, तुमच्या आयुष्यातील जे काही चढ-उतार आहेत, त्याचे प्रतिबिंब या गाण्यात आहे. त्यांनी ते इतक्या भावूकपणे गायले की आजही ते ऐकताना अंगावर काटा येतो. ‘ऋतू हिरवा’ इतका लोकप्रिय झाला होता की, त्याच्या तोडीचे किंवा त्यापेक्षाही चांगले संगीत आपल्याला द्यायचे आहे, हा विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता. भारतीय संगीतात अशी संकल्पना आहे की, जो स्वर अतिशय निर्मळ आणि स्वयंभू असतो, त्याला ‘गंधार’ म्हणतात. आशाताईंचा आवाज म्हणजे तोच ‘स्वयंभू गंधार’ होता. शांताबाई शेळके यांनी लिहिलेले ‘साकार गंधार’ हे गाणे जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ऐकले, तेव्हा त्यांनी मला लगेच अनुमती दिली.
आशाताईंना गाणे शिकवणे हा माझ्यासाठी एक मोठा अनुभव असायचा. त्या अनेकदा गमतीने म्हणायच्या, हा श्रीधर मला खूप त्रास देतो, तानांच्या बाबतीत तो इतका कडक आहे की मी कधीकधी डोक्याला हात लावते! पण हे म्हणताना त्यांच्या डोळ्यांत तोच जिव्हाळा असायचा जो बाबूजींच्या वेळी होता. बाबूजी अतिशय शांतपणे शिकवायचे, तर मी कदाचित अधिक आग्रह धरायचो. पण त्या मोठ्या मनाने माझे ऐकून घ्यायच्या आणि माझ्या मनात असलेली चाल हुबेहूब गाऊन दाखवायच्या. एखाद्या कठीण चालीचे सोने कसे करावे, हे केवळ त्यांनाच ठाऊक होते. ‘भुई तन मन’, ‘साकार गंधार’ किंवा ‘कुठे न दीप काजवा’ यांसारखी गाणी रेकॉर्ड करताना त्यांनी घेतलेल्या ताना आणि दिलेले भाव पाहून मी थक्क व्हायचो. रेकॉर्डिंग संपल्यावर मी अनेकदा त्यांच्या पाया पडलो आहे, कारण त्यांच्या आवाजातील ती ऊर्जा आणि स्वरांचा अचूकपणा पाहून मन भरून यायचे. त्या नेहमी म्हणायच्या, शब्द हा आत्मा आहे आणि चाल हे शरीर. त्या शरीराला सजवण्याचे काम संगीतकाराचे असते. त्यांनी माझे प्रत्येक संगीत साध्या शब्दांतून थेट रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचवले.त्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंच गाणं नव्हतं किंवा हा आवाज चैतन्य निर्माण करु शकत नाही अशी कुठलीच मैफिल नव्हती. लावणी, ठुमरी. गझल, अभंग असे असंख्य गानप्रकार त्यांच्या गळ्यातून निघाले.
आशा भोसले यांनी ‘माझा बाळ’ या चित्रपटातून चित्रपटगीतांना सुरुवात केली. त्यावेळी लतादीदी, शमशाद बेगम, गीता दत्त यांच्यासारख्या गायिकांचं साम्राज्य होतं. पण आशाताईंनी स्वत:ची वेगळीच शैली निर्माण केली. त्यांचं हे वेगळं अस्तित्त्व त्यावेळच्या संगीतकारांना भावलं. त्यामुळेच लता मंगेशकर आणि इतर गायिकांप्रमाणेच त्यांना गाणी मिळत गेली. स्वत:च्या घरातील विपरित परिस्थितीशी सामना करत आशाताईंनी गानक्षेत्रातील आव्हानही मोठ्या ताकदीने पेललं.
आशाताईंचा स्वभाव ‘डाऊन टू अर्थ’ होता. त्यांच्या वागण्यात कधीही आपल्या स्वरसामर्थ्याचा, केलेल्या कामाचा अहं दिसला नाही. अत्यंत साधेपणाने त्या प्रत्येक व्यक्तीशी वागत. बा. भ. बोरकर, शांता शेळके, आरती प्रभु, ग. दि. माडगुळकर, सुरेश भट, सुुधीर मोघे अशा नामवंत कवींबरोबरच त्यांनी सौमित्रसारख्या कवींच्या कविता आशाताईंच्या आवाजात रसिकांसमोर आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईनी सुरेल न्याय दिला. हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर मधुबाला, मिनाकुमारीपासून अगदी अलीकडच्या नायिकांपर्यंत त्यांनी अनेकींसाठी आपला आवाज दिला आहे. त्यांनी 14 भाषांमध्ये 12000 हून अधिक गाणी गायली आहेत. सर्व प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई तेवढ्याच ताकदीने गाऊ शकत, हे शतपैलुत्व अलौकिक होतं. अभिजात संगीताला स्थळ, काळ, वेळेचं बंधन नाही तसंच आशा भोसले यांच्या आवाजालाही कशाचंच बंधन नव्हतं. आशाताईंसारखी अष्टपैलू गायिका होणे केवळ अशक्य आहे. त्यांच्या स्वरांनी मराठी मनावर जे अधिराज्य गाजवले आहे, ते शब्दांच्या पलीकडचे आहे.
(शब्दांकन ः विधिषा देशपांडे)
(आदित्य फीचर्स)
Check Also
‘हेराफेरी-3’चे भवितव्य टांगणीला
हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘हेरा फेरी’ या चित्रपट मालिकेच्या तिसऱ्या भागावरून सध्या मोठा कायदेशीर …
पांचजन्य वृत्तपत्र