लेख-समिक्षण

पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत

पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. सुमारे 1 तास 45 मिनिटे चाललेल्या या बैठकीत सरकारने विरोधी पक्षांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना देशात पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट केले. घाबरण्याचे कारण नाही. तसेच स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील परिस्थितीबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली.
या बैठकीला सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीचे मंत्री अमित शाह, एस. जयशंकर आणि निर्मला सीतारामन यांच्यासह जेपी नड्डा आणि किरेन रिजिजू हेही उपस्थित होते. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी जागतिक परिस्थिती आणि पश्चिम आशियातील संकटाबद्दल सविस्तर माहिती दिली. काँग्रेसचे तारिक अन्वर आणि मुकुल वासनिक, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव आणि बीजेडीचे सस्मित पात्रा हेही उपस्थित होते.
बैठकीत सरकारने सांगितले की, देशात सध्या पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कोणतीही कमतरता नाही, पुरवठाही पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. काही ठिकाणी कमतरतेच्या बातम्या येत असल्या तरी त्याचे मुख्य कारण सप्लाय चेनमधील अडचणी आहेत. बैठकीत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ येथील परिस्थितीबाबत चर्चा झाली. सरकारने माहिती दिली की, आतापर्यंत भारताची चार जहाजे सुरक्षितपणे त्या भागातून बाहेर पडली आहेत, आणखी काही जहाजे लवकरच बाहेर पडतील. अनेक देशांची जहाजे अजूनही त्या भागात अडकलेली आहेत, मात्र भारताची जहाजे सुरक्षित बाहेर येत आहेत. या घटनेला भारताच्या राजनैतिक आणि धोरणात्मक यश म्हणून पाहिले जात आहे.
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीतील चर्चेविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, या बैठकीला सर्वांनी उपस्थिती लावली आणि सक्रिय सहभाग नोंदवला. सर्व पक्षांच्या नेत्यांनी माहितीची देवाणघेवाण केली आणि आपापल्या पक्षांच्या वतीने आपल्या चिंता व्यक्त केल्या. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघषामुर्ळे पश्चिम आशियात निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतावर कसा परिणाम होईल आणि भारतीय जनतेसाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत, याविषयी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अनेक प्रश्न विचारले. सरकारने या सर्व प्रश्नांना अत्यंत सविस्तर आणि सखोल उत्तरे दिली. मला हे सांगताना समाधान वाटते की, संपूर्ण विरोधी पक्षाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली आहेत. शेवटी, विरोधी पक्षातील सर्व सहकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, या संकटाच्या काळात सरकारने जो काही निर्णय घेतला, किंवा सध्याच्या परिस्थितीनुसार जी काही पावले उचलली, त्या सर्वांना ते एकजुटीने पाठिंबा देतील.
मंत्री रिजिजू पुढे म्हणाले की, सरकारच्या वतीने विरोधी पक्षांच्या ज्या काही शंका होत्या किंवा जो काही संभ्रम होता, त्या सर्वांचे सरकारने अत्यंत स्पष्टपणे निरसन केले. बैठकीच्या शेवटी विरोधी पक्षांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नमूद केली; ती म्हणजे, ही सर्वपक्षीय बैठक आयोजित केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. त्यांनी हे देखील ठामपणे सांगितले की, अशा कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे. पंतप्रधान मोदींनी संसदेच्या माध्यमातून असे आवाहन केले आहे की, कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय संसदेने एकजुटीने उभे राहिले पाहिजे. मला असे वाटते की, बैठकीच्या शेवटी आपले मत व्यक्त करताना विरोधी पक्षाने एक प्रकारची परिपक्वता दर्शवली आहे; ती म्हणजे, कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत सरकार उचलत असलेल्या पावलांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतील.

Check Also

तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …