दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता किरण अब्बावरम याच्या आगामी भव्य पॅन-इंडिया चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ’किरण अब्बावरम 15’ असे तात्पुरते नाव असलेल्या या चित्रपटासाठी झी स्टुडिओज आणि निर्माती प्रेरणा अरोरा यांनी हातमिळवणी केली असून, हा एक भव्य ’मायथो-फँटसी’ विषयावर आधारित चित्रपट असणार आहे.
या पोस्टरमध्ये किरण अब्बावरम एका गूढ जंगलात योद्ध्याच्या भूमिकेत दिसत आहे, तर पार्श्वभूमीला आकाशात एक अवाढव्य दैवी चेहरा दिसून येतो. हे पोस्टर चित्रपटाची भव्यता, नियती आणि एका महाकाव्याचा आभास करून देते. भारतीय अध्यात्मिक प्रतिमांचा वापर करून हा चित्रपट जागतिक स्तरावरील दृष्य अनुभवासाठी सज्ज असल्याचे दिसून येते.
या चित्रपटाबद्दल सांगताना निर्मात्यांनी स्पष्ट केले की, हा चित्रपट काळ आणि नियतीच्या पलीकडे असलेल्या एका प्राचीन शक्तीने निवडलेल्या रक्षकाची कथा आहे, जो जगाचे नियम बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीची वर्णी लागणार असून तिचे नाव लवकरच जाहीर केले जाईल. चित्रपटाच्या संगीतासाठी निर्माते हॉलिवूडमधील नामांकित संगीतकार आणि भारतातील दिग्गज प्रतिभा यांच्याशी चर्चा करत आहेत. भारतीय पारंपरिक ध्वनी आणि पाश्चात्य सिम्फनी यांचा मेळ घालून एक जागतिक दर्जाचे पार्श्वसंगीत देण्याचा त्यांचा मानस आहे. – अपर्णा देवकर
Check Also
‘हेराफेरी-3’चे भवितव्य टांगणीला
हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘हेरा फेरी’ या चित्रपट मालिकेच्या तिसऱ्या भागावरून सध्या मोठा कायदेशीर …
पांचजन्य वृत्तपत्र