आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक वेगळे शिखर गाठले आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महानगराचे पाठबळ नसताना केवळ एका स्वप्नाचा ध्यास घेऊन त्यांनी ‘ब्लूम’ या ब्रँडची उभारणी केली. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली असून, अनेक नवउद्योजकांसाठी त्यांचा हा प्रवास दीपस्तंभासारखा ठरत आहे.
सुष्मिता यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण 2018 मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर त्यांना गुडगावमधील एका कंपनीकडून 25 हजार रुपये पगाराची नोकरी चालून आली होती. मात्र, एका मोठ्या शहरात इतक्या कमी पगारात गुजराण करणे कठीण जाईल, हे ओळखून त्यांनी तो प्रस्ताव नाकारला आणि त्या आपल्या गावी परतल्या. नोकरी नाकारून स्वतःचे काहीतरी सुरू करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. महाविद्यालयात असताना आपल्या पॉकेटमनीसाठी वसतिगृहातील खोलीतून त्या दागिने पुनर्विक्रीचे काम करायच्या. याच अनुभवाला त्यांनी आपल्या करिअरची पायाभरणी मानले.
सुरुवातीला कोणत्याही भांडवलाशिवाय त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून दागिन्यांच्या विक्रीला सुरुवात केली. इन्स्टाग्रामवर दागिन्यांची छायाचित्रे टाकून मिळणाऱ्या ऑर्डरनुसार त्या आपला नफा जोडून विक्री करू लागल्या. जसा नफा वाढला, तसा त्यांनी स्वतःचा साठा खरेदी करण्यास सुरुवात केली. 2021 मध्ये जयपूरला जाऊन त्यांनी बाजारपेठेचा सखोल अभ्यास केला आणि 2022 मध्ये ‘ब्लूम’ या नावाने स्वतःची वेबसाइट सुरू केली. त्यांच्या व्यवसायाला खरी गती मिळाली ती एका रियालिटी शोमुळे. ‘बिग बॉस 14’ मध्ये निक्की तांबोळीने त्यांचे कानातले परिधान केले आणि बघता-बघता त्यांचा सर्व साठा काही दिवसांतच संपला.
या ब्रँडचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे संपूर्ण कामकाज महिलांच्या हातांत आहे. आसाममधील त्यांच्या केंद्रातून उत्पादन, पॅकेजिंग आणि व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी महिलाच सांभाळतात. सुष्मिता स्वतः जयपूरला जाऊन दागिन्यांचे डिझाइन निश्चित करतात. सध्या त्यांच्याकडे 1500 पेक्षा जास्त उत्पादनांची श्र्ेणी उपलब्ध असून, चांदी आणि जर्मन सिल्व्हरपासून बनवलेले त्यांचे दागिने नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन तरुणींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.
कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महानगराचे पाठबळ नसताना केवळ एका स्वप्नाचा ध्यास घेऊन सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर ‘ब्लूम’ या ब्रँडला यशाच्या शिखरावर पोहोचविले, हे खरे नाही काय?
Check Also
शाश्वत भविष्यासाठी तरुणीची आदर्श मोहीम
आपल्या आजीच्या पाऊलावर पाऊल ठेवत बंगळुरू येथील 15 वर्षांच्या मान्या हर्षा हिने पर्यावरण संवर्धनाचा एक …
पांचजन्य वृत्तपत्र