लेख-समिक्षण

वांगचुकांच्या सुटकेचा अर्थ

लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) अटक करण्यात आली होती. मात्र, आता त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने घुमजाव केले आहे. गृहमंत्रालयाने वांगचुक यांच्यावर लादलेला एनएसए रद्द केला आहे. त्यामुळे सुमारे सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांचा सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करून सोनम यांची नजरकैद तात्काळ उठवण्याचा निर्णय घेतला. लेह जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या ‌‘सार्वजनिक सुव्यवस्था‌’ राखण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या तरतुदींनुसार 26 सप्टेंबर 2025 रोजी सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले होते. सरकार लडाखमधील विविध भागधारक आणि समुदाय नेत्यांशी सक्रियपणे संवाद साधत आहे, त्यामुळे प्रदेशातील लोकांच्या चिंता दूर होतील. मात्र सध्याचे बंद आणि निषेधाचे वातावरण समाजाच्या शांततापूर्ण स्वरूपासाठी हानीकारक आहे आणि त्याचा समाजाच्या विविध घटकांवर आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. सरकार लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यास वचनबद्ध आहे, ज्यामुळे सर्व भागधारकांशी रचनात्मक आणि अर्थपूर्ण संवाद होऊ शकेल असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. या उद्देशाच्या पूर्ततेसाठी आणि काळजीपूर्वक विचार केल्यानंतर सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून सोनम यांची नजरकैद ताबडतोब काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
लडाखच्या पर्यावरणाचे रक्षण आणि केंद्रशासित प्रदेशाला विशेष घटनात्मक दर्जा मिळवण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सातत्याने लढा दिला. काही महिन्यांपूर्वी लडाखमधील हिमनद्यांचे संरक्षण आणि या प्रदेशाला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी मोठे आंदोलन उभारले होते. त्यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा ठपका ठेवत प्रशासनाने त्यांच्यावर ‌’राष्ट्रीय सुरक्षा कायदा‌’ अंतर्गत कठोर कारवाई केली होती. या अटकेमुळे लडाखसह संपूर्ण देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पर्यावरणासाठी शांततापूर्ण लढा देणाऱ्या एका व्यक्तीवर इतका कठोर कायदा लावल्याने केंद्र सरकारच्या भूमिकेवरही टीका झाली होती. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने सोनम यांची नजरकैद तात्काळ उठवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर संघर्षाला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. हा निर्णय म्हणजे वांगचुक यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात असून, यातून लडाखमधील सामाजिक तणाव निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. सोनम वांगचुक यांनी नेहमीच विज्ञानाचा वापर सामान्य माणसाचे जगणे सुसह्य करण्यासाठी केला आहे. अशा व्यक्तीला न्याय मिळणे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. – सत्यजित दुर्वेकर

Check Also

कर्मचारी कपातीची लाट

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टने आपल्या कार्यपद्धतीत आणि मनुष्यबळ नियोजनात एक …