जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे उद्योगपती सत्यनारायण नुवाल. राजस्थानच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जागतिक स्तरावर स्फोटक आणि संरक्षण क्षेत्रातील एका महाकाय साम्राज्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
सत्यनारायण नुवाल यांचा जन्म 25 जुलै 1952 रोजी राजस्थानमधील भिलवाडा येथे झाला. त्यांचे वडील पटवारी म्हणून कार्यरत होते. घराच्या आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना 10 वी नंतर शिक्षण सोडावे लागले. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि चरितार्थासाठी त्यांनी व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात त्यांनी फाऊंटन पेनची शाई बनवणे, ट्रान्सपोर्टेशन आणि लीजिंग यांसारख्या अनेक क्षेत्रांत नशीब आजमावले. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. व्यवसायाच्या शोधात असताना त्यांच्याकडे राहण्यासाठी पैसे नसायचे, अशा वेळी त्यांनी अनेक रात्री रेल्वे स्थानकांवरील बाकावर झोपून काढल्या. 1977 मध्ये नुवाल महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आले. तिथे त्यांची भेट अब्दुल सत्तार अल्लाहभाई यांचेशी झाली. सत्तार भाईंकडे स्फोटकांचा परवाना होता, परंतु वयोमानामुळे ते हा व्यवसाय चालवण्यास असमर्थ होते. नुवाल यांनी 1000 रुपये महिना भाड्याने त्यांचा डेपो चालवायला घेतला. येथूनच त्यांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली. कोळसा खाणींमध्ये स्फोटकांना असलेली मोठी मागणी ओळखून त्यांनी आपल्या कौशल्याने या व्यवसायात जम बसवला. 1995 मध्ये त्यांनी नागपूर येथे ’सोलर इंडस्ट्रीज’ची स्थापना केली. या व्यवसायासाठी त्यांनी स्टेट बँकेकडून 60 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सुरुवातीला कोळसा कंपन्यांना स्फोटकांचा पुरवठा करणारी ही कंपनी पुढे जाऊन संरक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी करेल, अशी कोणालाही कल्पना नव्हती. 2010 मध्ये ‘सोलर इंडस्ट्रीज’ ही भारतीय संरक्षण दलांसाठी स्फोटके आणि शस्त्रास्त्रे तयार करण्याचा परवाना मिळवणारी देशातील पहिली खाजगी कंपनी ठरली. आज ही कंपनी केवळ स्फोटकेच नाही, तर ‘नागास्त्र’ सारखी ड्रोन-माउंटेड लोयटरिंग म्युनिशन्स, पिनाका रॉकेट्स आणि भार्गवास्त्रसारखी अत्याधुनिक अँटी-ड्रोन यंत्रणा तयार करत आहे.
Check Also
शून्यातून बनला कोट्याधीश…
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू …
पांचजन्य वृत्तपत्र