पहलगाम येथे झालेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना, त्याविरुद्ध भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या प्रत्युत्तरालाही आता वर्ष झाले आहे. या निमित्ताने जागतिक स्तरावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यातील विसंगती यावर सखोल भाष्य करणे गरजेचे वाटते. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीतून हे स्पष्ट झाले होते की, पहलगाम हल्ल्याची मुळे पाकिस्तानात सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांमध्ये होती. या हल्ल्याची पद्धत मुंबई आणि पुलवामा हल्ल्यांशी साधर्म्य राखणारी होती. भारताने सहा आणि सात मे रोजी केलेल्या लष्करी कारवाईचा मुख्य उद्देश हाच होता की, भारताला लक्ष्य करणाऱ्या संघटनांना धडा शिकवणे आणि पाकिस्तानातील प्रत्येक दहशतवादी तळ भारताच्या टप्प्यात आहे, याची जाणीव करून देणे. गेल्या वर्षभरात भारताने जागतिक स्तरावर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करण्यासाठी मोठे राजनैतिक प्रयत्न केले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने नागरी वस्त्यांवरील हल्ल्यांचा निषेध केला असला, तरी ही वैचारिक स्पष्टता प्रत्यक्ष कारवाईत उतरलेली दिसत नाही. पाकिस्तानात आजही दहशतवादी संरचना, प्रशिक्षण केंद्रे आणि आर्थिक मदतीचे जाळे उघडपणे कार्यरत आहे. दुर्दैवाची बाब अशी की, प्रत्येक मोठ्या हल्ल्यानंतर शक्तिशाली देश कठोर शब्दांत निषेध व्यक्त करतात, मात्र पाकिस्तानवर हे जाळे नष्ट करण्यासाठी कायमस्वरूपी दबाव निर्माण करण्यात ते अपयशी ठरतात. अनेकदा असे दिसून येते की, काही काळानंतर हेच दहशतवादी गट नवीन नावाने पुन्हा सक्रिय होतात. जागतिक राजकारणात दहशतवादाकडे पाहण्याचा दुटप्पी दृष्टिकोन हा एक मोठा अडथळा ठरत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांनी सुरुवातीला निषेध नोंदवूनही, नंतर भू-राजकीय हितसंबंधांमुळे पाकिस्तानच्या नेतृत्वाशी जवळीक साधल्याचे दिसून येते. ही विसंगती दहशतवादाविरुद्धच्या जागतिक मोहिमेला कमकुवत करते. एकीकडे दहशतवादाला जागतिक धोका मानणे आणि दुसरीकडे पाकिस्तानवर थेट कारवाई करण्यास कचरणे, यामुळे दहशतवाद्यांना स्वतःमध्ये बदल करून अस्तित्व टिकवण्याची संधी मिळते. मानवाधिकार संघटना आणि धोरण विलेषक अनेकदा मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करून शासन आणि स्थिरतेवर चर्चा करतात, ज्यामुळे उत्तरदायित्वाचा प्रश्न प्रलंबित राहतो. भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे की, दहशतवादाविरुद्धची कारवाई केवळ तात्कालिक नसावी. दहशतवादाचे आर्थिक स्त्रोत तोडणे, पायाभूत सुविधा नष्ट करणे आणि त्यांच्या वैचारिक समर्थनाला आव्हान देणे आवश्यक आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक प्रतिक्रिया नव्हती, तर ती मुळावर प्रहार करण्याची संकल्पना होती. आज सर्व पुरावे उपलब्ध असतानाही पाकिस्तानातील दहशतवादी यंत्रणा कायम आहे, ही चिंतेची बाब आहे. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय समुदाय आपली हतबलता सोडून प्रत्यक्ष कृती करत नाही, तोपर्यंत पहलगाम सारख्या संकटाची टांगती तलवार कायम राहील. केवळ समस्येची ओळख पटवून उपयोग नाही, तर तिच्या मुळावर घाव घालून ती कायमची नष्ट करणे, हाच एकमेव मार्ग आहे.- राकेश माने
Check Also
तप्त झाली वसुंधरा
जागतिक तापमानवाढीच्या भीषण वास्तवाचे चटके आता केवळ आकडेवारीपुरते मर्यादित न राहता जनजीवनाला होरपळून काढू लागले …
पांचजन्य वृत्तपत्र