लेख-समिक्षण

शून्यातून बनला कोट्याधीश…

शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‌’ऑटो बेस्ट एम्पेरिओ‌’चे संस्थापक अवनीत सिंह कोहली उर्फ सन्नी. दिल्लीतील एका सुखवस्तू व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या सन्नी यांचा प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. 1996 मध्ये ते जेव्हा आठवीत होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचा भीषण अपघात झाला आणि पुढील तीन वर्षे ते अंथरुणाला खिळून होते. उपचारांच्या खर्चामुळे घरातील सर्व मालमत्ता आणि वडिलांचा कारखाना विकावा लागला. परिस्थिती इतकी बिकट झाली की, वडिलांच्या औषधांसाठी आणि दोन वेळच्या जेवणासाठीही त्यांना संघर्ष करावा लागला.
1999 मध्ये त्यांच्या वडिलांनी आईचे दागिने विकून 20 हजार रुपये उभे केले आणि त्यातून स्टॅबिलायझर बनवण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला. सन्नी यांनी 2000 मध्ये या कामात उडी घेतली आणि व्यवसायाला गती दिली. मात्र, 2010 मध्ये दिल्लीत वीज वितरणाचे खासगीकरण झाल्यामुळे स्टॅबलायझरची गरज कमी झाली आणि हा व्यवसाय ठप्प झाला. त्यानंतर सन्नी यांनी हार न मानता जुन्या गाड्यांच्या विक्रीचे काम शिकण्याचे ठरवले. सुरुवातीला करोल बागमध्ये अनुभव घेतला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला, पण तिथे त्यांना अपयश आले. तरीही धीर न सोडता त्यांनी आलिशान (लक्झरी) गाड्यांच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.
2011 मध्ये त्यांनी ‌‘ऑटो बेस्ट‌’ नावाने अवघ्या 800 चौरस फुटांच्या जागेत दुकान थाटले. सुरुवातीला महिन्याला मोजक्याच गाड्या विकल्या जात असत, पण इंटरनेटच्या प्रसारामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठी कलाटणी मिळाली. 2013 मध्ये त्यांनी भाऊ जसप्रीत सिंह कोहली उर्फ हन्नी यांनाही व्यवसायात सामील करून घेतले आणि व्यवसायाचा विस्तार केला. त्यांनी ग्राहकांना विशेष अनुभव देण्यासाठी रेस्टॉरंटसारखे भव्य शोरूम उभारले. त्यावर अनेकांनी टीका केली. मात्र, आज त्यांची कंपनी मर्सिडीज, लँबॉर्गिनी आणि ऑडी सारख्या महागड्या गाड्यांच्या विक्रीत देशात नावाजलेली कंपनी बनली आहे.
गेल्या वर्षी त्यांच्या कंपनीने 216 कोटी रुपयांची उलाढाल केली असून, त्यांच्याकडे नेहमीच 50 ते 60 कोटी रुपयांच्या गाड्यांचा साठा उपलब्ध असतो. सध्या ते दोन कोटी रुपयांच्या कारमधून फिरतात आणि 30-30 लाख रुपयांची घड्याळे वापरतात. एकेकाळी 20 हजार रुपयांच्या नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सन्नी यांनी आपल्या मेहनतीने पुढील तीन वर्षांत 500 कोटी रुपयांच्या उलाढालीचे आणि कंपनीचा आयपीओ आणण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यांची ही यशोगाथा शून्यातून उभ्या राहिलेल्या एका साम्राज्याची साक्ष देत नाही काय?

Check Also

एका स्वप्नाचा ध्यास

आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक …