लेख-समिक्षण

सेंद्रीय उद्योगातून बनले कोट्यधीश

जयपूर येथील प्रतीक तिवारी यांनी आपली लठ्ठ पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून ‌‘रुफटॉप ऑरगॅनिक फार्मिंग‌’ क्षेत्रात पाऊल टाकले आणि आज ते कोट्यवधींची उलाढाल करणारे यशस्वी उद्योजक बनले आहेत.
प्रतीक यांचे शिक्षण 1998 मध्ये कृषी अभियांत्रिकी विषयात झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीत महिंद्रा, रिलायन्स फ्रेश, आयटीसी आणि वॉलमार्ट यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये पुरवठा साखळी आणि किरकोळ व्यापार क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. मात्र, त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींना कॅन्सरसारख्या आजारामुळे गमवावे लागले, ही एक अत्यंत वैयक्तिक आणि दुःखद घटना त्यांच्या आयुष्याला वळण देणारी ठरली. पैशापेक्षा आरोग्य जास्त महत्त्वाचे आहे, हे वास्तव त्यांना जाणवले आणि अन्नातील वाढत्या विषारी रसायनांविरुद्ध काहीतरी ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 2012 च्या अखेरीस त्यांनी वॉलमार्टमधील नोकरी सोडली. उद्योजकतेचा हा प्रवास त्यांच्यासाठी तसा नवा नव्हता, कारण 2003 मध्ये त्यांनी पहिल्यांदा स्टार्टअप सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, पण बाजारपेठेची पुरेशी समज नसल्याने तो यशस्वी झाला नव्हता. यावेळी मात्र त्यांनी पूर्ण तयारी केली होती. नोकरी सोडली तेव्हा त्यांच्याकडे भांडवल मर्यादित होते, पण पत्नीने त्यांना या कठीण काळात खंबीर साथ दिली. 2013 ते 2015 या काळात त्यांनी घराच्या छतावर दीडशेहून अधिक कुंड्या आणि चौदा सेंद्रिय घटकांचा वापर करून विविध प्रयोग केले. या परिश्र्मातून त्यांनी एक ‌‘पोर्टेबल फार्मिंग सिस्टम‌’ विकसित केली.
आज ‌‘लिव्हिंग ग्रीन ऑर्गेनिक्स‌’ हे त्यांचे स्टार्टअप एका मोठ्या अर्बन फार्मिंग व्यवसायात रूपांतरित झाले आहे. हे स्टार्टअप लोकांना घराच्या छतावर मातीशिवाय, स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली आणि अतिनील किरणांपासून संरक्षण देणाऱ्या पिशव्यांच्या मदतीने भाजीपाला पिकवण्याची सोय उपलब्ध करून देते. त्यांचे हे व्यावसायिक मॉडेल केवळ घरगुती स्तरावरच नाही, तर मोठ्या रुग्णालये, शाळा आणि हॉटेल्समध्येही लोकप्रिय झाले आहे. वित्त वर्ष 2024-25 मध्ये ‌‘ग्रीन वॉल‌’ व्यवसायातील श्रमसाध्य स्वरूपामुळे त्यांच्या उत्पन्नात घट झाली होती. मात्र, त्यांनी हार मानण्याऐवजी आपल्या व्यवसाय मॉडेलमध्ये बदल केला आणि स्केलेबल ‌‘अर्बन फार्मिंग पॅक्स‌’ वर लक्ष केंद्रित केले. या धोरणात्मक बदलामुळे 2025-26 या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न 2 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. आता प्रतीक यांचे लक्ष फ्रँचायझी मॉडेलच्या विस्तारावर आहे, जेणेकरून लोक स्वतःच्या घराच्या छतावर रसायनमुक्त, शुद्ध आणि ताजा भाजीपाला पिकवू शकतील.

Check Also

जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …