जगात सर्वाधिक उष्ण असणाऱ्या वीस ठिकाणांत भारतातील 19 ठिकाणांचा समावेश झाला आहे. या ठिकाणचे तापमान 44 ते 46.9 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविले गेले. वाढते तापमान ही केवळ हवामानाची नोंद नसून तो एक चिंताजनक विषय आहे. पूर्वी मे आणि जून महिन्यांत तापमानाचा उच्चांक नोंदला जात असताना आता एप्रिलमध्येच या तापमानाने नागरिकांना त्रस्त केले आहे. कमाल तापमानात विक्रमी वाढ होण्यामागे पर्यावरण, मानवी हालचाली किंवा जागतिक संघर्ष कारणीभूत आहे का? की हवामान बदलाचा दुष्परिणाम असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
सध्या भारतातील बहुतांश शहरांत तापमानाच्या उच्चांकाने कळस गाठला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान 45 अंशाच्या आसपास तापमान राहत आहे. शिवाय उष्मघाताचे रुग्ण वाढत असून दुपारच्या वेळेला रस्ते निर्मुनष्य दिसत आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस कमाल तापमानाने नोंदविलेला उच्चांक सर्वांनाच घाम फोडणारा अलीकडच्या काळात प्रचंड पडणारा पाऊस किंवा प्रचंड ऊन या दोन्ही टोकाच्या गोष्टी अनुभवास येत आहेत. निसर्गाच्या या गंभीर इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे पुढील पिढीला अडचणीत आणण्यासारखे आहे.
जगात सर्वाधिक उष्ण असणाऱ्या वीस ठिकाणांत भारतातील 19 ठिकाणांचा समावेश झाला आहे. या ठिकाणचे तापमान 44 ते 46.9 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविले गेले. वाढते तापमान ही केवळ हवामानाची नोंद नसून तो एक चिंताजनक विषय आहे. पूर्वी मे आणि जून महिन्यांत तापमानाचा उच्चांक नोंदला जात असताना आता एप्रिलमध्येच या तापमानाने नागरिकांना त्रस्त केले आहे. कमाल तापमानात विक्रमी वाढ होण्यामागे पर्यावरण, मानवी हालचाली किंवा जागतिक संघर्ष कारणीभूत आहे का? की हवामान बदलाचा दुष्परिणाम असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या काही दशकांत पृथ्वीचे वाढलेले तापमान. शास्त्रज्ञांच्या मते, औद्योगिक क्रांतीनंदर कार्बन उत्सर्जनात तीव्र वाढ झालेली असताना ग्रीनहाऊस उत्सर्जन कमाल पातळी गाठत आहे. एका अभ्यासानुसार, पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व आढळून आल्यानंतर वातावरणात कार्बनची पातळी सुमारे 300 पार्टिकल्स (पीपीएम) असायची ती आता 420 पेक्षा अधिक आहे.याचाच परिणाम म्हणजे उष्णतेची लाट आता पूर्वीपेक्षा अधिक उग्र, दीर्घकाळ राहणारी आणि सतत येत असल्याचे निदर्शनास येत आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात प्रामुख्याने गंगा नदीच्या खोऱ्यात अशा प्रकारचा हवामान बदल हा अतिशय संवेदनशील ठरू शकतो.
दुसरी बाजू म्हणजे नैसर्गिक ऋतूचक्र बदलणे. प्रशांत महासागराचे तापमान असामान्य रुपाने वाढते तेव्हा त्याचा प्रभाव जागतिक हवामान प्रणालीवर पडतो. भारताचा विचार केल्यास मॉन्सून कमकुवत होतो आणि उन्हाळा अधिक काळ राहतो. 2026 मध्ये अल नीनोची स्थिती निर्माण होत असेल तर सध्याची स्थिती पुढील काळात आणखी भयावह होऊ शकते. आता प्रश्न पडतो जागतिक संघर्षाचा. युद्ध आणि भू राजनिती तणावामुळे देखील वातावरण गरम होत आहे का? अर्थात प्रत्यक्ष रुपाने नाही तर पण अप्रत्यक्ष रुपाने होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. रशिया-युक्रेन, अमेरिका- इस्राईल व इराण संघर्षाने इंधन संकटाला खतपाणी घातले आहे. त्यामुळे अनेक देशांनी स्वच्छ ऊर्जेऐवजी कोळसा अणि अन्य जीवाश्म इंधनाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. साहजिकच जागतिक कार्बन उत्सर्जनात वाढ होत हवामान बदलाची परिणामकता अधिक तीव्र होत आहे. याशिवाय युद्धामुळे पर्यावरण हानी, जंगलतोड आणि औद्योगिक प्रदूषण देखील वाढते. अर्थात प्रत्येक असामान्य उष्णतेला संघर्षाशी जोडणे चुकीचे राहू शकते. हवामान ही गुंतागुंतीची प्रणाली असून त्यात स्थानिक घटक देखील कारणीभूत असतात. त्यात शहरीकरण, कृषी भूमी कमी होणे, विकासाच्या नावाखाली होणारे कामे यावरून संपूर्ण जगात दररोज 25 ते 30 हजार हेक्टरवरील जंगल नष्ट होत आहेत. म्हणजे दररोज सुमारे 4.1 कोटी झाडे तोडली जात आहेत. जगात सर्वाधिक जंगलतोड होणाऱ्या देशांची यादी पाहिली तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
वेस्टर्न डिस्टबर्न्सचे कमी प्रमाण देखील हवामान बदलात महत्त्वाची भूमिका बजावते. उत्तर भारतात सिमेंटचे जंगल वेगाने वाढत असल्याने जमीन अधिक उष्ण होत आहे. त्यामुळे शहरात तापमानाची पातळी वाढलेली दिसून येते. सध्याची स्थिती इशाराा देणारी आहे. एप्रिल महिन्यांतच तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या आसपास राहत असेल तर मे आणि जूनमध्ये त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा उष्णतेची लाट अधिक दिवस पाहवयास मिळू शकते. आगामी महिन्यात उष्णता आणखी वाढू शकते. एप्रिल ते जून या महिन्यात देशातील अनेक भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहू शकते. प्रामुख्याने पूर्व, मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट अधिक काळ राहिल. ओडिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेशसारख्या राज्यांत त्रासदायक उष्णता पाहवयास मिळेल. याशिवाय गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात देखील उन्हाळा अधिक घाम आणणारा राहू शकतो.
भारताच्या उत्तर प्रदेशात प्रामुख्याने बुंदेलखंडसारख्या भागात उष्णतेचा प्रभाव थेटपणे पिकपाणी, मानवी आरोग्यावर पडू शकतो. काही वर्षांपूर्वी बुंदेलखंडमध्ये रेल्वेने पाणी पाठवावे लागले होते. महाराष्ट्रात देखील पश्चिम महाराष्ट्रातून मराठवड्यात रेल्वेने पाणी पाठविण्यात आले होते. त्यामुळे समाज आणि नागरी व्यवस्था वेळीच जागी झाली नाही तर असेच चित्र पुन्हा पाहवयास मिळू शकते. म्हणूनच अधिक उष्णता राहिल्यास त्याचा थेट परिणाम मानवी जीवन आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडू शकतो.
पर्वतीय राज्य देखील उष्णतेने हैराण झाले आहेत. उत्तराखंडमध्ये उष्णता वाढली असून त्यांनी यापूर्वी एवढ्या तीव्रतेचा उन्हाळा पाहिलेला नव्हता. हरिद्वार, काशीपूर, रुरकी, बाजपूर, रुद्रपूर येथे तापमान 43 अंशांवर पोचले तर खटीमा, रामनगर येथेही 42 अंशाच्या आसपास पारा राहत आहे. राजधानी डेहराडून येथेही घाम आणणाऱ्या उन्हाने नागरिक वैतागले आहेत.डेहराडूनच्या हवामान केंद्राने सखल भागातील जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या परिस्थितीवर सरकारी यंत्रणेचे उपाय पुरेसे ठरणार नाहीत. सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर देखील प्रयत्न करणे तितकेच आवश्यक आहेत. क्लिन एनर्जीला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. झाडांची लागवड, पाणी संरक्षण, शहरी नियोजनात हरित क्षेत्राची वाढ करणे यासारखी पावले उचलावी लागणार आहेत. त्याचवेळी जागतिक पातळीवरही सहकार्य आणि शांतता असणे देखील गरजेचे आहे. कारण संघर्ष हा केवळ मानवी जीवनावर परिणाम करत नाही तर पर्यावरण संतुलन ढासळण्याचे काम देखील करतो. एकुणातच एप्रिल महिन्यातींल विक्रमी तापमान निसर्गाचा इशारा असून आपण आपल्या वर्तनात वेळीच बदल केला नाही तर आगामी काळात सध्याची वाटणारी असामान्य स्थिती ही सामान्य रुप धारण करेल.
ज्येष्ठ, लहान मुले आणि आजारी लोकांना सध्याची स्थिती नाजूक ठरू शकते. प्रचंड उष्णता आणि लाटेमुळे शरीरातून गरजेपेक्षा अधिक पाणी निघून गेल्याने ऊर्जा कमी होऊ शकते. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. परिणामी चक्कर येणे, मळमळ, थकवा जाणवू शकतो. दीर्घकाळ उन्हात राहिल्याने स्नायूला देखील कडक होऊ शकतात. गंभीर स्थितीत शरीराचे तापमान 40 अंशापेक्षा अधिक राहू शकते आणि तो जीवघेणा ठरू शकतो. लहान मुले, ज्येष्ठ आणि आजारी लोकांना या स्थितीचा अधिक धोका आहे. दुपारी बारा ते तीनच्या वेळेस घराबाहेर पडण्याचे टाळायला हवे. हलके आणि सैल सुती कपड्याचा पेहराव करावा. डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल असणे आवश्यक आहे.-रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक
Check Also
विचित्र कोंडीत आखाती युद्ध
आखाती युद्धाला 55 दिवस झाले आहेत आणि युद्ध एकाच वेळी शांतता आणि संघर्ष या विचित्र …
पांचजन्य वृत्तपत्र