लेख-समिक्षण

कसोटी सामूहिक संयमाची

आपण सर्वजण कधी ना कधी वैयक्तिक आणि कौटुंबिक संकटांतून जातो, त्यांचा सामना करतो, त्यातून शिकतो आणि पुढे जातो. समाजाकडूनही हीच अपेक्षा असते. परंतु काय ही अपेक्षा बहुतेकदा पूर्ण होत नाही. याचे कारण सामूहिक परिणाम करणारी एखादी गोष्ट घडते किंवा संकट येते तेव्हा अविश्वासाचे, भीतीचे आणि लोभाचे चित्र सर्वदूर दिसते. त्यामुळेच एखादी अफवा पसरते आणि आपण विचार न करता तिच्या मागे धावू लागतो. प्रत्येक जण गरजेपेक्षा जास्त खरेदी करू लागला, तर खरोखर ज्याला गरज आहे त्याच्या वाट्याला काय येईल, याचा विचार कोणीच करत नाही.
असे म्हणतात की, संकटाच्या काळातच माणसाच्या खऱ्या चरित्राची ओळख पटते. ही एक परीक्षा असते. संकट वैयक्तिक असू शकते, कौटुंबिक किंवा सामाजिकही असू शकते. त्याही पलीकडे जाऊन विचार केला तर ते देशावरचेही असू शकते. आपण सर्वजण कधी ना कधी वैयक्तिक आणि कौटुंबिक संकटांतून जातो, त्यांचा सामना करतो, त्यातून शिकतो आणि पुढे जातो. समाजाकडूनही हीच अपेक्षा असते. परंतु काय ही अपेक्षा बहुतेकदा पूर्ण होत नाही. शिकण्यासारखे खूप काही असते, पण कोणी शिकायला तयार हवे ना! मागे वळून पाहिले तर लक्षात येते की, शिकण्याची तसदी कदाचितच कोणी घेत असेल.
असो, सध्या स्वयंपाकाच्या गॅसच्या बातम्यांचा काळ आहे. सरकारकडून तर सांगितले जात आहे की कोणतेही संकट नाही. सर्व काही सुरळीत आहे, साठा भरपूर आहे. हो, हे मात्र नक्की सांगितले गेले आहे की, शेकोटी आणि चुलीसाठी लाकूड-कोळशाची सोय करून ठेवा. पण नुसते सांगून काय होते? गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लोक उन्हात तासनतास उभे राहून बेशुद्ध पडत आहेत. ऑनलाईन बुकिंग गूढ पद्धतीने बंद आहे. संकेतस्थळावर तक्रारी नोंदवल्या जात नाहीत. गॅस नाहीये आणि आहे सुद्धा! वरचे पैसे मोजा, सर्व काही उपलब्ध आहे.
लोकांचे तरी काय बोलावे? घरात गॅस आहे, कदाचित महिनाभर पुरेल इतका साठाही आहे. पण नाही, त्यांना अजून हवाय. सिलिंडरवर सिलिंडर जमा केले जात आहेत. सामान्य माणूस एक-दोनच्या जुळवाजुळवीत आहे, पण खास लोक डझनभर सिलिंडर साठवत आहेत. वाटण्यासाठी नाही, तर विकण्यासाठी! अशांना आपल्या स्वयंपाकघराची चिंता नाही, तर संकटात कमाई करण्याची पडली आहे. एका सिलिंडरवर हजार-दोन हजार अतिरिक्त कमवण्याची हीच तर संधी आहे. ‌’आपत्तीत इष्टापत्ती‌’ (आपदा में अवसर) आपण कसे विसरू शकतो? ज्यांना सिलिंडर मिळत नाहीयेत, ते इंडक्शन आणि चुलींवर नशीब आजमावत आहेत. ऑनलाईन तुटवडा निर्माण झाला आहे. दुकानांमधून लोक डझनांनी खरेदी करत आहेत.
असे दृश्य आपण काही पहिल्यांदाच पाहत नाही आहोत. ठराविक काळाने हे चित्र पाहायला मिळतेच. अनेकांना आठवत असेल, मागील काळात मीठ संपण्याची अफवा पसरली होती, तेव्हा लोक पोती भरभरून मीठ खरेदी करू लागले होते. नव्या पिढीला कदाचित ठाऊक नसेल, पण जुन्या पिढीच्या आठवणीत आजही ताजे असेल की, सत्तर आणि ऐंशीच्या दशकात रॉकेल आणि साखरेसाठी अशाच रांगा लागायच्या. रेशन दुकानांसमोर सकाळपासूनच लोक डबे आणि पोती घेऊन उभे राहायचे की आपला नंबर कधी येईल आणि दोन-चार किलो साखर कधी मिळेल. ‌‘आज साखर आली आहे‌’ ही बातमी पसरताच गर्दी उसळायची. कांद्याचीही तीच कहाणी आहे, जी वारंवार पुनरावृत्ती झाली आहे. कांद्याचे दर वाढणार आहेत किंवा तुटवडा होणार आहे ही बातमी पसरताच लोक पोती भरून कांदा घरात साठवू लागतात. विक्रेते तर मालाचा पुरवठा रोखण्यासाठी निमित्तच शोधत असतात. कधी युद्ध, कधी हवामान तर कधी दुसरे काही.
नोटबंदी तर सर्वांनाच आठवत असेल. बँका आणि एटीएमबाहेर लागलेल्या लांब रांगा अजून फार जुन्या झालेल्या नाहीत. लोकांकडे जेवढे पैसे होते, त्यापेक्षा जास्त काढून घेण्याची धडपड सुरू होती. लोक जीवाचा विचार न करता वीस-वीस तास रांगांमध्ये झुंजत राहिले. कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांत दुकानांवर पीठ, तांदूळ, डाळ, सॅनिटायझर आणि मास्क गरजेपेक्षा कित्येक पटीने जास्त खरेदी केले जात होते. अनेक घरांमध्ये महिन्याभराचा रेशन साठा जमा झाला, तर दुसरीकडे लोक दैनंदिन वस्तूंसाठी वणवण फिरत राहिले. गावाशी संबंधित असणाऱ्यांना ठाऊक आहे की, प्रत्येक हंगामात कधी बियाणे, कधी खत तर कधी डिझेलसाठी कशी महाभारत घडते. आता तर हे सर्व नित्याचेच झाले आहे.
खरे तर संकट जेवढे खरे असते, त्यापेक्षा मोठे संकट आपल्या मनात असते. अविश्वासाचे, भीतीचे आणि लोभाचे. अफवा पसरते आणि आपण विचार न करता तिच्या मागे धावू लागतो. जर प्रत्येक जण गरजेपेक्षा जास्त खरेदी करू लागला, तर खरोखर ज्याला गरज आहे त्याच्या वाट्याला काय येईल, याचा विचार कोणीच करत नाही.
समस्या केवळ व्यवस्थेची नाही, तर समाजाचीही आहे. सरकारे कितीही विश्वास देवोत, नियोजन करोत, पण जोपर्यंत आपण स्वतः आपली जबाबदारी समजणार नाही, तोपर्यंत अशी परिस्थिती वारंवार निर्माण होत राहील. कधी युद्ध होईल, कधी नैसर्गिक आपत्ती येईल, तर कधी दुसरे काही. संकटात ‌’संयम‌’ हाच सर्वात मोठा उपाय असतो. संकटात ‌’एकजूट‌’ आणि ‌’सहानुभूती‌’ हे मोठे आधार असतात. पण दुर्दैवाने याच गोष्टी सर्वात दुर्मिळ ठरल्या आहेत. खरी परीक्षा इथेच असते. संकटाच्या वेळी आपण आपल्या वाट्यापेक्षा जास्त उचलणारे बनतो की दुसऱ्याच्या वाट्याचे रक्षण करणारे? समाजाचे चरित्र अशाच प्रसंगी ठरते. इंग्रजीमध्ये ‌’इम्पॅथी‌’ (एारीिंहू) असा एक शब्द आहे म्हणजेच सहानुभूती किंवा करुणा. त्याचा अर्थ इतकाच की, आपण इतरांशी तसाच व्यवहार करावा जसा आपण स्वतःसाठी अपेक्षित धरतो. खेद आहे की तसे घडत नाही. दोष कोणा एकाचा नाही आणि सर्वांचाच आहे. आपल्यापैकीच कितीतरी लोक धार्मिक आयोजनांत आणि सणासुदीला लंगर किंवा भंडारे घालताना थकत नाहीत; फक्त यासाठी की, तेव्हा आपली ग्रहशांती आणि पुण्याचा सोपा मार्ग दिसतो. पण त्यानंतर? तीच साठेबाजी आणि नफेखोरी?
सत्य तर हे आहे की, खरी कमतरता गॅस, मीठ किंवा पेट्रोलची नसते, तर ती सहानुभूती, एकजूट, विश्वास, संयम, धाडस, सामाजिक जबाबदारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‌’आदर्श‌’ प्रस्थापित करणाऱ्यांची असते. आणि जोपर्यंत या गोष्टींचा साठा वाढणार नाही, तोपर्यंत प्रत्येक काही दिवसांनी आपण असेच रांगेत उभे राहून, आपली कोठारे भरताना आणि त्रासामध्ये कमाई करताना दिसू.
समाजाची खरी ओळख आणि खरी परीक्षा त्याच्या उत्सवांतून नाही, तर त्याच्या संकटातून होते. उत्सवात सर्वच एकत्र उभे राहतात. पण संकटातच कळते की, कोण आपल्या वाट्यापेक्षा जास्त उचलून घेतो आणि कोण आपल्या वाट्याचा छोटासा भागही दुसऱ्यासाठी सोडून देतो. असो, आजचे संकट उद्या नक्कीच दूर होईल; पण तेव्हा स्वतःला नक्कीच विचारून पहा की, आपण या परीक्षेत उत्तीर्ण झालो का? नसेल तर नेमके कधीपर्यंत वारंवार नापास होत राहणार आहोत आपण? कोण आपल्याला या परीक्षेत यशस्वी करेल?-योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक, लखनऊ

Check Also

बच्चू कडू यांची ‌‘प्रहार‌’ इतिहासजमा

विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती …