लेख-समिक्षण

युद्धाचे चटके

जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेली अमेरिका आणि नेहमीच लष्करी संघर्षाच्या तयारीत असलेला इस्रायल यांनी एकमेकांच्या साथीने इराणवर केलेल्या युद्ध हल्ल्यामुळे आधीच होरपळलेल्या जगाला युद्धाचे चटके अधिकच तीव्रतेने जाणवणार आहेत. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाने जगाला हादरवून सोडले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील छोटा लष्करी संघर्षही समोर आला होता. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील लष्करी संघर्ष दीर्घकाळ सुरू आहे. सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुद्धा युद्धसदृश परिस्थिती आहे. हे सर्व कमी होते म्हणून की काय आता इस्रायलने इराणवर घातक हल्ले करून जगाला आणखी एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे. अर्थात, अमेरिकेच्या पुढाकाराने आणि सहकार्यानेच इस्रायलने हे हल्ले केले असल्याने या हल्ल्यांमागे अमेरिकेचा मेंदू आहे हे उघड आहे. खरे तर एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये जिनेव्हा येथे शांतता चर्चा सुरू असतानाच अशा प्रकारचे हल्ले करण्यात आले. या चर्चेतून काय निष्पन्न होत आहे याची वाट पाहण्याची तसदीही अमेरिका आणि इस्रायल यांनी घेतली नाही. अर्थात, या दोन्ही देशांना कोणत्या ना कोणत्या कारणाने इराणवर हल्ला करण्याची संधी हवीच होती. गेल्या वर्षीसुद्धा जून महिन्यामध्ये जे बारा दिवसांचे युद्ध झाले तेव्हासुद्धा या दोन देशांनी अशाच प्रकारे संधी मिळताच इराणला टार्गेट केले होते. इराणने आपला आण्विक कार्यक्रम थांबवावा आणि इराणी जनतेने आपले नेते बदलावेत या मागण्या अमेरिकेने कायम समोर ठेवल्या आहेत. पण इराणने कधीही अमेरिकेच्या या मागणीला महत्त्व दिलेले नाही. गेल्या काही वर्षांमध्ये उलट इराणने आपला आण्विक कार्यक्रम तीव्रतेने राबवला आहे. या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या युरेनियम या इंधनाचा साठा इराणकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. जरी आम्ही अण्वस्त्र निर्मिती करत नाही असे इराणने जाहीर केले असले, तरी इस्रायल आणि अमेरिकेचा त्यावर विश्वास नाही. प्रादेशिक शांततेसाठी इराणने आपला आण्विक कार्यक्रम थांबवावा अशी मागणी सातत्याने या दोन देशांकडून करण्यात येत होती. इराणने या मागणीला महत्त्व न दिल्यानेच योग्य संधी साधून अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हल्ला केला. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या पूर्ण कुटुंबाचा बळी गेला असल्याने इराणमध्ये सत्तांतर करण्यासाठी अमेरिकेने युद्धनीती वापरली आहे. अर्थात, ह्या युद्धाचे चटके फक्त या दोन देशांना बसत नाहीत तर इतरही अनेक देशांना होरपळ जाणवणार आहे.जागतिक पातळीवर शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने करत असल्याबद्दल आपल्याला नोबेल पुरस्कार दिला जावा अशी मागणी करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनीच या नवीन युद्धाला सुरुवात केली आहे हा विरोधाभासही लक्षात घेण्यासारखा आहे. नेहमीसारखे युनोच्या सुरक्षा समितीने या संघर्षाला सुरुवात झाल्यानंतर तातडीने बैठक घेऊन या संघर्षाचा निषेध केला असला, तरी त्या पलीकडे सुरक्षा समिती काही करू शकेल असे वाटत नाही. साहजिकच आणखी काही दिवस जगाला या युद्धाच्या चटक्यांनी होरपळावे लागणार आहे.– अपर्णा देवकर

Check Also

कर्मचारी कपातीची लाट

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टने आपल्या कार्यपद्धतीत आणि मनुष्यबळ नियोजनात एक …