लेख-समिक्षण

वाढत्या बंडखोरीची काँग्रेसला डोकेदुखी

एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या दहा राज्यांतील 37 जागा रिक्त होत असून यासाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेतील संख्याबळ पाहिल्यास अलीकडच्या काळात भाजपच्या स्थितीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. खरी समस्या तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांची आहे. काही जागांवर काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकू शकतो, परंतु क्रॉस व्होटिंग म्हणजेच मतविभाजनामुळे काही जागा गमावण्याची नामुष्की काँग्रेसवर मागील काळातही ओढवली आहे. त्यामुळे देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला एखादी जागा जिंकण्यापेक्षा क्रॉस व्होटिंग कशी रोखली जाईल यावरच भर द्यावा लागणार आहे.
ऐक्य दाखविण्याची संधी
यावर्षी पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम, पुदुच्चेरीत विधानसभा निवडणुका होत आहेत. तत्पूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसला देशभरात ऐक्याचा संदेश द्यावा लागणार आहे आणि पक्षात सर्वकाही ठीक असल्याचे जनतेपर्यंत पोचवावे लागणार आहे. शिवाय ही निवडणूक विरोधी पक्षाच्या ऐक्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाची आहे. राज्यसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना त्यांचे सर्व आमदार, खासदारांना एकत्र ठेवण्याचे देखील आव्हान असते. मागील वेळी काँग्रेसला हरियानात मतविभाजनाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि त्याच्या घटक पक्षांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. काही जागांचे निकाल निश्चित मानले जात आहेत, त्याचवेळी मतांची फाटाफूट रोखली नाही तर काही ठिकाणी पराजय निश्चितच आहे. हरियानातील भाजपचे खासदार किरण चौधरी आणि रामचंद्र जांगरा यांचा कार्यकाळ नऊ एप्रिल रोजी संपत आहे. 90 सदस्यांच्या हरियाना विधानसभेत एक जागा भाजप आणि एक जागा काँग्रेसच्या खात्यात जावू शकते. परंतु इथे आतापासून राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये मतविभाजनामुळे काँग्रेसचे अजय माकन यांचा पराभव झाला होता तर भाजप आणि जेजेपीच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांचा विजय झाला होता. हरियानात राज्यसभेच्या एका जागेवरील विजयासाठी 31 आमदारांचा पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. भाजपकडे 48 आणि कॉग्रेसकडे 37 आमदार आहेत.
हिमाचल आणि बिहारमधील पेच
68 सदस्यीय हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत राज्यसभेच्या एका जागेसाठी मतदान होणार आहे. 40 आमदार असतानाही काँग्रेसला सावध राहावे लागणार आहे. 2024 मध्ये बहुमत असतानाही कॉग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी पराभूत झाले होते. तेव्हा काँग्रेसचे काही आमदार आणि अपक्षांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केले होते. अजूनही भाजपकडे 28 आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला सिंघवी यांच्यासारख्या निकालाची यावेळी पुनरावृत्ती तर होणार नाही ना? या विचाराने ग्रासले आहे.
बिहारमध्ये पाच जागांसाठी मतदान होणार आहे. 243 जागांच्या विधानसभेतून एक जागा जिंकण्यासाठी 41 आमदारांचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे. एनडीएचे 202 आमदार असल्याने चार जागा तर निश्चित आहेत. परंतु 35 आमदार पाठिशी असलेली ‌‘इंडिया‌’ आघाडी ही स्वबळावर आतापर्यंत एकही जागा जिंकू शकली नाही. अशावेळी पाच आमदार असलेल्या एमआयएमची भूमिका ही मोलाची ठरते. या ठिकाणी संपूर्ण विरोधक एकटवले तर कदाचित एक जागा पारड्यात पडू शकते. अशावेळी राजद, कॉग्रेस, डावी आघाडी आणि अन्य घटक पक्षांची मदत मिळणे आणि त्यांच्यात ऐक्य राहणे गरजेचे आहे.-जगदीश काळे

Check Also

कर्मचारी कपातीची लाट

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टने आपल्या कार्यपद्धतीत आणि मनुष्यबळ नियोजनात एक …