बॉलीवूड अभिनेता इमरान खान याने अलीकडेच लोकमनातील एका विषयाची तार छेडली आहे. हा विषय म्हणजे सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान या खानावळींनी वयाची साठी ओलांडत आली तरी किती दिवस नायकाची व्यक्तिरेखा साकारायची? आणखी किती दिवस त्यांना प्रेक्षकांनी पडद्यावर नायकाच्या रुपात पाहायचे? या तिन्ही स्टार्सनी आता आता आपल्या वयाला साजेसा आणि वास्तववादी अभिनय करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्लाही त्याने दिला आहे. इतकेच नव्हे तर साठी-सत्तरीतल्या नायकाची कथा पाहण्यात आजच्या तरुणांना फारसा रस नाहीये असे मतही त्याने परखडपणाने मांडले आहे. इम्रानने मांडलेले मत अतिशय योग्य आहे. विशेषतः नायिकांना जो वयाचा निकष लावून मागे ढकलले जाते, तोच निकष पुरुषांना लावला जात नाही, ही यातील विसंगती स्री-पुरुष असमानतेचे ढळढळीत उदाहरण आहे. – सोनम परब
अभिनेता इम्रान खान याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख, सलमान आणि आमिर या ‘खानत्रयींना’ वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकांमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला आहे. इम्रानच्या मते, हे तिन्ही स्टार्स आता वयाच्या साठीत पोहोचले असून, त्यांनी आता आपल्या वयाला साजेसा आणि वास्तववादी अभिनय करण्यावर भर द्यायला हवा. सदर मुलाखतीत तो म्हणाला, काही विशिष्ट वर्षेतुम्ही ‘लीडिंग मॅन’ किंवा नायक म्हणून काम करू शकता, पण एक टप्पा असा येतो जिथे तुम्ही अशा भूमिकांसाठी सक्षम राहत नाही. तिन्ही खान्सनी 30 वर्षांहून अधिक काळ अभूतपूर्व स्टारडम उपभोगले आहे, ज्याची बरोबरी करणे अशक्य आहे. पण वय वाढणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यानुसार भूमिका बदलणे हा प्रत्येक कलाकाराच्या प्रवासाचा भाग असायला हवा. इम्रानच्या मते, प्रेक्षक नेहमी स्वतःला पडद्यावरील पात्रांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात. तरुण पिढीला त्यांच्याच वयाचे आणि अनुभवाचे प्रतिनिधित्व करणारे कलाकार अधिक जवळचे वाटतात. एखाद्या 70 वर्षांच्या व्यक्तीची (भविष्यातील संदर्भाने) नायकाची कथा पाहण्यात आजच्या तरुणांना फारसा रस नसावा, असे त्याने नमूद केले. त्याची विधाने सिनेसृष्टीत वादळ उठवणारी आहेत.
इम्रानने मांडलेले मत अतिशय योग्य आहे. विशेषतः नायिकांना जो वयाचा निकष लावून मागे ढकलले जाते, तोच निकष पुरुषांना लावला जात नाही, ही यातील विसंगती स्री-पुरुष असमानतेचे ढळढळीत उदाहरण आहे.
बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते याचे खापर नेहमीच ‘ही स्क्रिप्टची मागणी होती’ असे म्हणून पटकथेवर फोडतात. त्यांचे एक साधे तर्कशास्त्र आहे की, पडद्यावर पुरुषांचे वय स्त्रियांच्या तुलनेत संथ गतीने वाढते. लग्नानंतर अभिनेत्रींचे लक्ष कुटुंबाकडे वळते आणि त्यांच्या चेहऱ्यावर मॅच्युरिटी येते, असा दावा व्यापार विलेषकांकडून केला जातो. हॉलिवूडची परिस्थिती तर यापेक्षाही गंभीर आहे. डेन्झेल वॉशिंग्टन, हॅरिसन फोर्ड, जॉनी डेप, टॉम क्रूझ आणि ब्रॅड पिट यांसारखे जागतिक कीर्तीचे नट आजही आपल्यापेक्षा खूपच लहान असलेल्या नायिकांसोबत काम करताना दिसतात. लिआम नीसन यांनी 60 व्या वर्षी 29 वर्षांच्या ऑलिव्हिया वाइल्डसोबत काम केले, तर 50 वर्षांचे टॉम क्रूझ 33 वर्षांच्या ओल्गा कुरिलेंकोसोबत रोमान्स करताना दिसले. ब्रॅड पिट यांनीही पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना स्वतःपेक्षा बऱ्याच लहान असलेल्या मिरेली एनोससोबत ‘वर्ल्ड वॉर झेड’मध्ये स्क्रीन शेअर केली होती. हॉलिवूडमध्येही नायिकांचे वय 35 झाले की त्यांना मुख्य भूमिकांमधून बाद केले जाते. तिथे पटकथा लिहिणारे बहुतांश पुरुष असल्याने, नायिकेचे पात्र नेहमीच 28 ते 32 वयोगटातील आणि अत्यंत सुंदर असावे लागते, असा एक अलिखित नियमच आहे. जेव्हा एखादा मोठा अभिनेता 20 दशलक्ष डॉलर्स मानधन घेतो, तेव्हा निर्माते महागड्या अभिनेत्रीऐवजी स्वस्त आणि तरुण नायिकेला प्राधान्य देतात.
मग या ज्येष्ठ अभिनेत्रींचे नक्की काय होते? भारतात या अभिनेत्री एकतर रिॲलिटी शोच्या परीक्षकाच्या खुर्चीवर दिसतात किंवा कॉर्नफ्लेक्सच्या जाहिरातींमध्ये ‘मॉम’ म्हणून झळकतात.जुही चावला, सोनाली बेंद्रे यांसारख्या अभिनेत्रींनी याच वाटेचा स्वीकार केल्याचे दिसून आले. हॉलिवूडमध्ये ‘घोस्ट’ फेम डेमी मूर असो किंवा ‘प्रिटी वुमन’ ज्युलिया रॉबर्टस 35 वर्षांच्या झाल्यानंतर या अभिनेत्रींना मुख्य प्रवाहातील चित्रपटांतून जवळजवळ अदृश्य व्हावे लागले.
इमरान खानने उपस्थित केलेला मुद्दा बिलकूल रास्त आहे. हिंदी सिनेसृष्टीच्या क्षितिजावर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खान हे त्रिकूट वयाची साठी गाठत आले तरी आजही ‘लीड ॲक्टर’ म्हणून पाय रोवून उभे आहेत. यामागील सर्वात महत्त्वाचे तांत्रिक कारण म्हणजे या खान मंडळींनी निर्माण केलेली ‘ब्रँड व्हॅल्यू’ आणि त्याभोवती गुंफलेले अफाट व्यावसायिक गणित. चित्रपट व्यापार विलेषकांच्या मते, या अभिनेत्यांच्या नावावर आजही वितरक आणि प्रदर्शक कोट्यवधींची बोली लावण्यास तयार असतात. जोपर्यंत एखादा अभिनेता बॉक्स ऑफिसवर किमान शंभर ते दोनशे कोटींच्या कमाईची खात्री देतो, तोपर्यंत चित्रपट निर्माते त्यांच्यासाठी विशेष भूमिका आणि पटकथा लिहून घेतात. हे केवळ त्यांचे स्टारडम नसून ते एक प्रकारचे आर्थिक सुरक्षा कवच आहे, जे तरुण पिढीतील कलाकारांना अद्याप तितक्या ताकदीने निर्माण करता आलेले नाही.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे या तिघांनीही काळानुरूप स्वतःच्या प्रतिमेत आणि शरीरयष्टीत केलेले आमूलाग्र बदल. वयाची साठी जवळ आली असतानाही सलमान खानची पिळदार शरीरयष्टी, शाहरूख खानचा आजही टिकून असलेला ‘रोमँटिक चार्म’ आणि आमीर खानचा अभिनयातील प्रयोगशील दृष्टिकोन प्रेक्षकांना थक्क करतो. आधुनिक सिनेमॅटोग्राफी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पडद्यावर त्यांचे वय लपवणे शक्य झाले असले, तरी त्यासाठी लागणारी शारीरिक मेहनत ही सर्वस्वी त्यांची असते. ‘किंग’, ‘पठाण’ किंवा ‘टायगर 3’ सारख्या चित्रपटांमधील त्यांचे ॲक्शन सीन्स हे सिद्ध करतात की, हे तिघेही आजही तरुणांना शारीरिक सक्षमतेच्या बाबतीत तगडी टक्कर देऊ शकतात, ज्यामुळे प्रेक्षकांसाठी ते आजही ‘लार्जर दॅन लाईफ’ नायक ठरतात.
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, या खान त्रिकुटाने प्रेक्षकांच्या दोन पिढ्यांशी एक भावनिक नाते जोडले आहे. 90 च्या दशकातील प्रेक्षक आजही त्यांच्याकडे आपल्या तरुणपणाचे प्रतिनिधी म्हणून पाहतात, तर आजची नवी पिढी त्यांना ‘लिजेंड’ म्हणून स्वीकारते. भारतीय मानसिकतेत ‘नायक’ हा कायम अजिंक्य आणि चिरतरुण असावा लागतो, आणि खान मंडळींनी ही प्रतिमा अतिशय कौशल्याने जपली आहे. बॉलिवूडमधील अनेक पटकथा आजही ‘हिरो-सेंट्रिक’ म्हणजेच नायकाभोवती फिरणाऱ्या असतात. जोपर्यंत प्रेक्षक या साठ वर्षांच्या नायकांना विशी-तिशीच्या नायिकेसोबत स्वीकारत आहेत आणि टाळ्या शिट्ट्या वाजवत आहेत, तोपर्यंत हे कलाकार मुख्य भूमिकेतून निवृत्त होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
शेवटी, बॉलिवूडमधील ‘स्टार सिस्टीम’चा अभाव हे देखील त्यांच्या टिकून राहण्यामागचे एक छुपे कारण आहे. गेल्या दशकात हिंदी सिनेसृष्टीला या तिघांच्या तोडीचा एकही सार्वत्रिक सुपरस्टार लाभलेला नाही जो संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधू शकेल. दक्षिण भारतीय चित्रपटांच्या आक्रमणासमोर आजही बॉलिवूडचा किल्ला लढवण्याची ताकद या अनुभवी खानांकडेच आहे. जोपर्यंत एखादा नवा चेहरा त्यांच्या लोकप्रियतेच्या आणि व्यावसायिक यशाच्या उंचीला स्पर्श करत नाही, तोपर्यंत सिनेसृष्टीचे हे ‘टायटन्स’ मुख्य नायकाच्या भूमिकेतून पायउतार होणार नाहीत. त्यांच्याकडे असलेला प्रदीर्घ अनुभव आणि व्यावसायिक समज त्यांना आजही या स्पर्धेत अग्रस्थानी ठेवते.
अर्थात, याबाबत सिनेइंडस्ट्रीमध्ये काही आदर्श उदाहरणेही आहेत. वयानुसार स्वतःमध्ये बदल करण्याचे आणि वयाला साजेशा भूमिका स्वीकारण्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन. नव्वदच्या दशकात जेव्हा त्यांचा नायक म्हणून काळ संपत आला होता, तेव्हा ‘मोहब्बतें’ चित्रपटातील नारायण शंकरच्या भूमिकेने त्यांच्या कारकिर्दीला दुसरी इनिंग दिली. आज वयाच्या 80 व्या वर्षीही ते चित्रपटाचे केंद्रबिंदू असतात, कारण त्यांनी वयाचा स्वीकार केला.
दिलीप कुमार आणि ऋषी कपूरया दिग्गजांनीही मधल्या काळात ‘शक्ती’ किंवा ‘मुल्क’ सारख्या चित्रपटांतून आपल्या वयाला शोभतील अशा सशक्त भूमिका साकारून आपले स्थान टिकवून धरले. याउलट, ‘एव्हरग्रीन’ देव आनंद यांनी शेवटपर्यंत नायकाच्याच भूमिका करण्याचा अट्टहास धरला. त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात त्यांनी केलेले चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले, कारण साठी-सत्तरीतील देव आनंद पडद्यावर कॉलेजमधील मुलाप्रमाणे वागताना प्रेक्षकांना पचनी पडत नव्हते.
शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी 1990 पासून बॉलिवूडवर राज्य केले आहे. पण एका ठराविक वयानंतर तुम्ही ‘चॉकलेट बॉय’ किंवा ‘ॲक्शन हिरो’ म्हणून प्रेक्षकांच्या गळी उतरू शकत नाही. ‘पठाण’ आणि ‘जवान’मध्ये शाहरुखने ॲक्शनचा आधार घेतला असला तरी, ‘डंकी’मध्ये त्याने वयाचे विविध टप्पे साकारले. मात्र, आजही तो विशीतल्या नायिकांसोबत रोमान्स करताना दिसतो, तेव्हा सोशल मीडियावर टीकेची झोड उठते. आमिरने नेहमीच प्रयोगाला प्राधान्य दिले. ‘दंगल’मध्ये त्याने मुलींच्या वडिलांची भूमिका साकारून वयाचा अडसर दूर केला होता. मात्र, ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये पुन्हा तरुण दिसण्याच्या प्रयत्नात त्याला अपयश आले.
आजचा प्रेक्षक हा ’ओटीटी’ प्लॅटफॉर्ममुळे जागतिक सिनेमाशी जोडला गेला आहे. त्याला आता पडद्यावर ‘लार्जर दॅन लाईफ’ हिरोपेक्षा स्वतःशी नाते सांगणारी पात्रे आवडतात. आजचा तरुण प्रेक्षक तर्कसंगत विचार करतो. जेव्हा एखादा 60 वर्षांचा अभिनेता पडद्यावर विशीतल्या मुलाप्रमाणे गुंडांना मारतो किंवा रोमान्स करतो, तेव्हा त्याला ते कृत्रिम वाटते. तरुण पिढीला त्यांच्या समस्या, त्यांचे प्रेम आणि त्यांचे संघर्ष पडद्यावर पाहायचे आहेत. जर 70 वर्षांचा अभिनेता हे सर्व करत असेल, तर त्यामध्ये वास्तवाचा अभाव जाणवतो. म्हणूनच रणबीर कपूर, रणवीर सिंग किंवा कार्तिक आर्यन यांसारख्या अभिनेत्यांना तरुण प्रेक्षक लवकर आपलेसे करतात. मल्याळम किंवा तमिळ चित्रपटांमध्ये कलाकार वयानुसार पांढरी दाढी किंवा सुरकुत्या दाखवण्यास कचरत नाहीत, त्यामुळेच तिथे आशयघन चित्रपट तयार होतात. हॉलिवूडमध्ये रॉबर्ट डी नीरो, अल पचिनो किंवा टॉम हँक्स यांनी वयानुसार स्वतःला बदलले, म्हणूनच ते आजही जागतिक स्तरावर महान मानले जातात. हिंदी सिनेसृष्टीतही ज्येष्ठ कलाकारांनी स्वतःहून बाजूला होऊन किंवा आपल्या अनुभवाचा वापर करून ‘ॅकॅरॅक्टर रोल्स’ स्वीकारले, तरच नवीन पिढीला आपली जागा निर्माण करता येईल. अन्यथा, एकाच चेहऱ्यांना वारंवार पाहून प्रेक्षक कंटाळतील आणि हिंदी सिनेमाचे मोठे नुकसान होईल.
Check Also
गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी
बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …
पांचजन्य वृत्तपत्र