भारतीय आयटी उद्योग एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. स्वयंचलनामुळे पारंपरिक सेवा पद्धतींना आव्हान निर्माण झाले असले, तरी याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भारताच्या आर्थिक विकासाला नवी चालना मिळू शकते. योग्य धोरणे, कौशल्य विकास आणि नियोजन यांच्या आधारे या बदलत्या तंत्रज्ञानाला स्वीकारणे हेच पुढील काळात भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
देशाची माहिती तंत्रज्ञान उद्योगव्यवस्था अनेक दशकांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ राहिली आहे; मात्र आता ती एका नव्या आणि धोकादायक टप्प्यातून जात आहे. हा धोका दुसरा कोणी नसून, आयटी कंपन्यांनी स्वतः विकसित केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता हीच आहे. ज्या कंपन्या सॉफ्टवेअर विकास, चाचणी प्रक्रिया आणि विविध सेवा पुरविण्यावर अवलंबून होत्या आणि झपाट्याने प्रगती करत होत्या, त्यांच्यासाठी कठीण दिवस सुरू झाले आहेत. कारण ही सर्व कामे आता कृत्रिम बुद्धिमत्ता स्वयंचलित पद्धतीने पूर्ण करू लागली असून ती थेट त्यांच्या व्यवसाय मॉडेललाच आव्हान देत आहे. भारतासाठी ही स्थिती अधिक चिंताजनक आहे, कारण देशाला जगातील आऊटसोर्सिंग केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत आयटी क्षेत्र, बीपीओ, कॉल सेंटर्स आणि बॅक-ऑफिस सेवांमध्ये लाखो लोकांना रोजगार मिळतो.
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे असे तंत्रज्ञान की जे संगणक प्रणालींना सामान्यतः मानवी बुद्धिमत्तेची गरज भासणारी कामे करण्यास सक्षम बनवतेउदा. शिकणे, तर्क लावणे, समस्या सोडविणे आणि निर्णय घेणे. आज आरोग्य, वित्त, शेती ते प्रशासन अशा प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. एका बाजूला हे तंत्रज्ञान मानवी जीवन अधिक परिणामकारक आणि सुलभ बनवू शकते, तर दुसऱ्या बाजूला ते अनेक गंभीर नैतिक, सामाजिक आणि कायदेशीर प्रश्नही निर्माण करते. या प्रश्नांवर गंभीर चिंतन आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानापुरते मर्यादित न राहता जवळजवळ सर्वच क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रभावी प्रवेश केला आहे. कोणतीही प्रक्रिया अधिक सुलभ आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करणे शक्य झाले आहे. शिक्षण क्षेत्राचा विचार केला तर विद्यार्थी कोणताही विषय आधुनिक पद्धतीने सहज शिकू शकतो. संगणक अशा प्रकारची कामे करू लागला आहे, ज्यासाठी पूर्वी मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता होती. मात्र जसे प्रत्येक तंत्रज्ञानाचे फायदे असतात तसे त्याच्या नकारात्मक वापराची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणताना या तंत्रज्ञानाचे दुष्परिणामही दिसू शकतात.
विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या शिकण्याच्या गरजा आणि क्षमतांनुसार अभ्यास सादर करणे शक्य झाले आहे. एकाच माहितीचे विविध पद्धतींनी सादरीकरण करून ती विद्यार्थ्यांच्या पातळीला अनुरूप करता येते. शारीरिक अडचणी, शिकण्यातला फरक किंवा भाषेची अडचण यांवर मात करण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयोगी पडते. पेपर तपासणी आणि अभ्यास आराखडे तयार करणे यांसारखी कामे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने करता येतात, त्यामुळे शिक्षकांचा वेळ अधिक महत्त्वाच्या शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध होतो. एखाद्या माहितीवरून अधिक माहिती शोधून काढणे आणि नव्या माहितीची निर्मिती करणेही शक्य होते. परंतु शिक्षण क्षेत्रातील सर्वांत मोठी चिंता म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता आणि स्वयंपूर्ण विचारशक्ती कमी होण्याची शक्यता. प्रश्नांची उत्तरे सहज उपलब्ध झाल्याने स्वतः शोध घेण्याची सवय कमी होऊ शकते. उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि निष्पक्षता यांसारख्या मूल्यांबाबतही अनेक आव्हाने निर्माण होतात. कमी वेळेत विस्तृत माहिती देणाऱ्या चॅटबॉट प्रणालींची गती मानवी क्षमतेपेक्षा अधिक आहे. हीच बाब खोटी बातमी आणि चुकीची माहिती वेगाने पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते. सायबर गुन्हेगार त्याचा गैरफायदा घेऊन दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू शकतात. सामाजिक माध्यमांवर त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात. काही कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म छायाचित्रे आणि व्हिडीओ तयार करण्यासही सक्षम आहेत आणि त्यांचा वापर खोट्या प्रचारासाठी केला जाऊ शकतो.
बेरोजगारी हा पुढील गंभीर प्रश्न आहे. अनेक कंपन्यांनी कार्यक्षमता वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची शक्यता वर्तवली जाते. डेटा नोंदणी, लेखा सहाय्यक, भाषांतरकार, ग्राहक सेवा प्रतिनिधी, लेखन क्षेत्र आणि सामाजिक माध्यम व्यवस्थापन या नोकऱ्यांवर सर्वाधिक धोका असल्याचे मानले जाते. एका अहवालानुसार सुमारे 30 कोटी लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. 2020 मधील एका अहवालात सायबर सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अधिक प्रभावी ठरू शकतो, असे नमूद करण्यात आले होते. मोठ्या धोक्यांचा शोध घेण्यात ती मानवी क्षमतेपेक्षा अधिक वेगवान ठरते. या दृष्टीने भविष्यात सुरक्षा व्यवस्थेबाबतही कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतः निर्णय घेण्याची क्षमता विकसित करू शकते आणि नियंत्रणाच्या पद्धती शोधू शकते. मात्र या तंत्रज्ञानावर अति अवलंबित्व नवीन अडचणी निर्माण करू शकते.
काही दिवसांपूर्वी तांत्रिक त्रुटीमुळे चॅटजीपीटी या प्रणालीची शोध नोंद गळती झाल्याची घटना घडली होती. भविष्यातही अशा प्रकारचे धोके संभवतात. कंपन्यांकडे वापरकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर डेटा साठवलेला असतो. कृत्रिम बुद्धिमत्ता त्या डेटाच्या आधारे वापरकर्त्यांच्या सवयी आणि नमुने ओळखू शकते, त्यांची नक्कल करू शकते आणि जाहिरातींसाठी माहितीचा गैरवापर करून बनावट प्रोफाइल तयार करू शकते. आज लष्करात वापरली जाणारी अनेक यंत्रणाउदा. क्षेपणास्त्रे आणि ड्रोनकृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने नियंत्रित केली जातात. सध्या त्यांना दिले जाणारे आदेश निश्चित चौकटीत असतात; परंतु भविष्यात या तंत्रज्ञानाच्या क्षमता वाढल्यास मानवी आदेशांशिवाय निर्णय घेण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे गुंतागुंती वाढू शकतात.
या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय आयटी उद्योग एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. स्वयंचलनामुळे पारंपरिक सेवा पद्धतींना आव्हान निर्माण झाले असले, तरी याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भारताच्या आर्थिक विकासाला नवी चालना मिळू शकते. योग्य धोरणे, कौशल्य विकास आणि नियोजन यांच्या आधारे या बदलत्या तंत्रज्ञानाला स्वीकारणे हेच पुढील काळात भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.-कमलेश गिरी
Check Also
बच्चू कडू यांची ‘प्रहार’ इतिहासजमा
विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती …
पांचजन्य वृत्तपत्र