काही दिवसांपूर्वीच प्रसारित झालेल्या एका मालिकेत युटयूबर रणवीर अलाहाबादियाने अतिशय हिन पातळीवर भाष्य करत वाद निर्माण केला आणि एका नव्या चर्चेला तोंड फुटले. प्रत्यक्षात दृक श्राव्य माध्यमात आक्षेपार्ह मुद्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही तरतूदी आहेत. पण सोशल मीडियाने मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसविले. सोशल मीडियाचा दुष्परिणाम म्हणजे लोकप्रियता आणि लाइक मिळ्वण्यासाठी पातळी सोडून कंन्टेट तयार केला जात आहे. एवढेच नाही तर यात काहीवेळा कुटुंबातील प्रत्येक सदस्य म्हणजे अगदी अल्पवयीन मुलांनांही सामावून घेतले जाते आणि मर्यादेला तिलांजली दिली जाते. बाजारात स्वत:चे प्रमोशन करण्याच्या नावाखाली नैतिक अध:पतन करणार्या लोकांनी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की सोन्याची लंका ही रावणाकडे असू शकते, परंतु काळाच्या पुढे जाणारा आणि मर्यादा पुरुषोत्तमच्या रुपातून वावरणारा यशस्वी होतो.
अलिकडच्या काळात टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ नावाचा रिआलिटी शो खूपच लोकप्रिय झाला. देशभरातील हुशार लोकांनी या व्यासपीठावर आपल्या बुद्धिमत्तेचे दर्शन घडविले. तरुणपिढीतील सेलिब्रिटी किंवा आयकॉन म्हटले जाणारे लोक अशा प्रकारच्या कार्यक्रमातून पुढे आलेले असतात. ‘इंडियाज गॉट टॅलेट’ची लोकप्रियता पाहता युट्यूबवर देखील एक कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि त्याचे नाव ‘इंडियाज गॉट लेंटट’. लेटेंट शब्दाचा अर्थ अव्यक्त किंवा गोपनीय. पण लवकरच हा कार्यक्रम सुमार वाटू लागला. कारण लोकप्रियता मिळवण्याच्या वेडापायी या व्यासपीठावरून निरर्थक गोष्टी बोलल्या जावू लागल्या. लोकांचे कौतुक मिळवण्यासाठी सभ्यता सोडून अश्लिलतेकडे मुद्दे मांडले जावू लागले.
काही दिवसांपूर्वीच प्रसारित झालेल्या एका मालिकेत युटयूबर रणवीर अलाहाबादियाने अतिशय हिन पातळीवर भाष्य करत वाद निर्माण केला. रणवीरने स्पर्धकाला विचारलं होतं की, कुणालाच्या पालकांना दररोज इंटिमेट होताना पाहायला आवडेल की, त्यांना साथ द्यायला आवडेल. त्याचे हे विचार एवढ्या खालच्या पातळीवरचे होते की नेहमीच्या प्रेक्षकांनाही धक्का बसला. अर्थात हा शो पाहणार्या लोकांना या कार्यक्रमाचा दर्जा, त्यातील भाषा चांगलीच ठाऊक होती. तरीही एक सार्वजनिक व्यासपीठावर एखाद्या अव्यक्त गोष्टीला अभिव्यक्त करताना वापरलेली भाषा आणि विषय पचनी पडणारा नव्हता. शेवटी देशभरात वाढता संताप पाहता संबंधित युट्यूबरने माफी मागितली.
अर्थात अशा प्रकारचे भाष्य करण्याचे धाडस आताच झालेले नसून या प्रवृत्तींनी समाजातील सभ्यतेला नेहमीच गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दोन अडीच दशकांपासून कला आणि अभिव्यक्तीच्या क्षेत्रातील एक नवीन प्रवृत्ती बाळसं धरू लागली आहे. एकार्थाने विविध क्षेत्रासाठी आखून दिलेल्या मर्यादांचे भान न राखता मनमानीप्रमाणे अनेक गोष्टी सादर केल्या जात आहेत आणि दुर्देवाची बाब म्हणजे बाजारातून याच प्रवृत्तींना हवा दिली जात असून त्यातून फायदा उचलला जात आहे. भारतासारख्या देशात सुसंस्कृतपणा आणि सभ्यता यांना सर्वाधिक महत्त्व दिले जात असताना अगदी बिनधास्तपणे बोलल्या जाणार्या अनैतिक गोष्टींना डोक्यावर घेतले जात आहे अणि दुय्यम आणि नितीमत्ता सोडून वर्तन करणार्या लोकांना सेलिब्रिटीचा दर्जा दिला जात आहे.
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ग्रेशम यांनी एकदा म्हटले होते की, वाईट वर्तन हे चांगल्या वर्तनावर मात करते. अर्थशास्त्रात या मुद्याला ग्रेशमचा नियम म्हणून ओळखले जाते. पण सध्याची स्थिती पाहता हा नियम समाजातील सर्वच घटकांना लागू होऊ लागला आहे. कमी वेळेत आणि कमी श्रमात लोकप्रियता मिळवण्याच्या नादात काही मंडळी अनैतिक गोष्टींचा पुरस्कार करण्यासाठी सामाजिक व्यासपीठ किंवा सार्वजनिक ठिकाणचा वापर करत अफाट प्रसिद्धी मिळवू पहात आहेत आणि मिळवतही आहेत. मध्यंतरी, बॉलिवूडची एक साहाय्यक अभिनेत्री ही असभ्य शब्दांच्या वापरामुळे लोकप्रिय झाली होती. याशिवाय आणखी एक मॉडेल ही सार्वजनिक ठिकाणी लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ओंगळवाणे कपडे घालत असत. या गोष्टी फार काळ टिकत नाहीत.
सध्याच्या काळात अनेकांना अकारण सेलिब्रिटी म्हणून ओळखले जाते. यांची भाषा, आचरण हे कोणत्याही सभ्य समाजाला पटण्यासारखे नसते. पण तरीही त्यांना व्ह्यूअर्स डोक्यावर घेतात. कधीकाळी चांगली भाषा, आचरण या गोष्टी आवश्यक असल्याचे आपल्या घरातील वडिलधारी मंडळी वारंवर सांगत असत. याच गोष्टी आता कथित सेलिब्रिटींनी बासनात गुंडाळून ठेवल्या. म्हणूनच असे लोक टिव्हीवर येताच अनेक ज्येष्ठ मंडळी संताप व्यक्त करत असतात. एका मर्यादेपर्यंत समाज तुमचा मुद्दा मान्य करत असतो. कारण भारतीय समाजाची व्यवस्थाच मुळात सर्व विचारांचा सन्मान करणारी आहे. परंतु जेव्हा मर्यादा ओलांडली जाते, तेव्हा उद्वेग बाहेर पडणे स्वाभाविकच आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या व्यासपीठावर मांडलेल्या मतावरून गोंधळ निर्माण होण्यामागे सभ्यतेचा त्याग हेच कारण आहे.
रणवीरच्या निमित्ताने बेताल वाचाळपणा कसा घातक ठरू शकतो, याची नव्याने प्रचिती आली आहे. विचार करुन बोलावे, हा संस्कार आपल्यावर बालवयापासून रुजवला जात असतो. परंतु बहुतांश जणांकडून तो आचरणात आणला जात नाही. राजकारणाचे क्षेत्र याचे उत्तम उदाहरण आहे. पण याच राजकारणात अविचारीपणाने बोलल्यामुळे अनेकांची कारकिर्द संपुष्टात येण्याच्या मार्गावर पोहोचल्याचे देशाने पाहिले आहे. ‘सब कुछ चलता है’ हेच सूत्र घेऊन चालणार्या अश्लाघ्य शोमध्येही किती खालची पातळी गाठावी, याचं भान न राहिलेल्या रणवीर अलाहबादियाबाबतही हेच घडताना दिसत आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये एक पुसट रेषा असते असे म्हणतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झूल पांघरुन नेहमीच कायद्यांच्या बडग्यापासून बचाव करत आलेला सोशल मीडिया स्वैराचाराच्या अश्वावर आरुढ होत चालला आहे, ही बाब रणवीरच्या प्रकरणामुळे प्रकर्षाने समोर आली आहे.
प्रत्यक्षात दृक श्राव्य माध्यमात आक्षेपार्ह मुद्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही तरतूदी आहेत. पण सोशल मीडियाने मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसविले. सोशल मीडियाचा दुष्परिणाम म्हणजे लोकप्रियता आणि लाइक मिळ्वण्यासाठी पातळी सोडून कंन्टेट तयार केला जात आहे. एवढेच नाही तर यात काहीवेळा कुटुंबातील प्रत्येक सदस्य म्हणजे अगदी अल्पवयीन मुलांनांही सामावून घेतले जाते आणि मर्यादेला तिलांजली दिली जाते. या कारणांमुळेच मागच्या पिढीपर्यंत अपशब्दांच्या कोशात असलेले शब्द ही तरुण पिढीच्या तोंडात आली असून त्याचा वापर ते सहजपणे करताहेत. अनेक सेलिब्रिटी किंवा कथित आयकॉन असणार्या लोकांकडून सातत्याने अपशब्दांचा, आक्षेपार्ह मतांचा वापर होत असेल तर एखादा तरुण अशा प्रकारच्या प्रभावापासून कसा वाचू शकेल. व्यक्त होत नसलेल्या गोष्टी म्हणण्याचा एक मार्ग असतो. प्रामुख्याने अव्यक्त गोष्टी लोकांसमोर मांडण्याच्या अनेक वैशिष्ट्येपूर्ण शैली आहेत आणि त्यातील संवेदनशीलता अधोरेखित करते. परंतु मर्यादेला, नितीमत्तेला पायदळी तुडवून मत मांडत तुम्ही एकवेळ लोकप्रियता मिळवू शकता, परंतु त्याला आदर्श म्हणता येणार नाही. बाजारात स्वत:चे प्रमोशन करण्याच्या नावाखाली नैतिक अध:पतन करणार्या लोकांनी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की सोन्याची लंका ही रावणाकडे असू शकते, परंतु काळाच्या पुढे जाणारा आणि मर्यादा पुरुषोत्तमच्या रुपातून वावरणारा यशस्वी होतो. – प्रसाद पाटील
Check Also
बच्चू कडू यांची ‘प्रहार’ इतिहासजमा
विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती …
पांचजन्य वृत्तपत्र