किशोरवयीन मुलांमधील एकटेपणा ही आज जगभरात एक गंभीर आणि वाढती समस्या बनली आहे. सतत येणाऱ्या किशोरांच्या आत्महत्येच्या बातम्या याबाबतच्या गांभीर्याची जाणीव करून देतात. ग्लोबल स्टेट ऑफ कनेक्शन्स या अहवालानुसार, जगभरात सुमारे 1.25 अब्ज लोक एकटेपणाशी झुंज देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातील 13 ते 15 वयोगटातील सुमारे 25 टक्के किशोर मुले मानसिक तणाव व एकटेपणाने त्रस्त आहेत. 2022 मधील एका अभ्यासात असे दिसून आले की 18 ते 29 वयोगटातील 57 टक्के भारतीय तरुणांनी कधीतरी एकटेपणाचा अनुभव घेतलेला आहे. काय करता येईल?
1. सहज संवादाचे वातावरण तयार करा ः घरातील वातावरण मोकळे आणि शांत असावे, जिथे मूल कोणतीही भीती किंवा संकोच न ठेवता मन मोकळं करू शकेल. त्यांच्या बोलण्यात काही गोष्टी तुम्हाला विचित्र वाटतील, पण संयमाने ऐकून त्यावर शांततेने संवाद साधा. शाळांमध्ये सुद्धा समुपदेशकांची नियुक्ती असायला हवी, जेणेकरून मुलांना भावनिक मदत मिळू शकेल.
2. डिजिटल जीवनात समतोल ठेवा ः
सोशल मीडियाचा वापर अपरिहार्य झाला असला तरी त्याचा अतिरेक मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर घातक परिणाम करू शकतो. मुलांशी यावर स्पष्ट संवाद साधा. शक्य असल्यास त्यांच्या सोशल नेटवर्कचा भाग बना, पण हस्तक्षेप न करता. ‘कूल पालक’ बना. रील्स, मीम्स बघा, पण त्याचबरोबर माहितीपूर्ण पोस्ट्सही शेअर करा.
3. मदत मागण्याबाबत प्रोत्साहन द्या ः
हल्लीची पिढी पाहिली तर मुळातच त्यांना स्वतंत्र जगायचे असते. तसेच फटकून वागणारी मुलेमुली या पिढीत जास्त दिसतात. वास्तविक पाहता, समाजात राहताना, वावरताना असे वागणे पूर्णपणे चुकीचे आहे. तसेच हल्लीच्या अनेक मुलांना मदत मागणे म्हणजे कमीपणा वाटतो. हे बदलण्यासाठी मुलाशी संवाद साधा. तुमच्या भावनिक गुंतागुंतीबद्दल प्रामाणिकपणे बोला. जेव्हा तुम्ही तुमच्या अडचणी सांगाल, तेव्हाच मूलही स्वतःचे मन मोकळेपणाने मांडेल. याखेरीज शाळांमध्येही ‘ड्रॉप बॉक्स’सारखी यंत्रणा असावी, जिथे विद्यार्थी आपले प्रश्न, त्रास गुप्तपणे मांडू शकतील.
4. लक्षणे ओळखा ः
जर मूल सतत एकटे राहू लागले, समाजापासून दूर जाऊ लागले, रात्री उशिरापर्यंत जागू लागले तर ही लक्ष देण्यासारखी बाब आहे. अशा वेळी ओरडण्याऐवजी किंवा शिक्षा देण्याऐवजी प्रेमाने संवाद साधा. ‘का’ असा वागतो आहे, याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
5. अपेक्षांचे ओझे लादू नका ः
प्रत्येक पालकाला आपले मूल यशस्वी व्हावे असे वाटते, पण त्यासाठी मुलांवर बळजबरी करणे, आपली स्वप्ने लादणे चुकीचे आहे. सतत याबाबत दबाव आणणाऱ्या पालकांपासून मुले लांब राहणे पसंत करतात. त्यातून तुटलेपण वाढत जाऊन एकटेपणा बळावतो.
किशोरवयात मनातील असंख्य विचारांची, प्रश्नांची आणि भवतालातील वास्तवाची सांगड घालताना दिशाहीनता येते. अशा वेळी मार्गदर्शन गरजेचे असूनही नकोसे झालेले असते. परिणामी, या टप्प्यावर अनेकदा मुलं भावनिकदृष्ट्या कोलमडतात. मग पालक म्हणून त्यांना आपण आधार द्यायचा असेल तर आपणही थोडा विचार करणे गरजेचे ठरते. संवाद, समजूत, सहकार्य आणि सोबत या चार गोष्टींचे भान ठेवणारे समजूतदार, सहनशील आणि प्रेमळ पालक म्हणून तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
Check Also
जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?
बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू …
पांचजन्य वृत्तपत्र