लेख-समिक्षण

एकात्मतेचा ‌‘रंग‌’ सोहळा

भारतात सर्व प्रांतात साजरा होणारा सर्वात चैतन्यमयी सण म्हणजे होळी. एकीकडे वसंतागमनाच्या ओढीने आतूर झालेली सृष्टी वातावरणात चैतन्य पसरत असते, त्याच वेळी फाल्गुन पौर्णिमेला येणाऱ्या होळीला रंगांची उधळण करत मानवी मने आनंदाने न्हाऊन निघतात. प्रेम, जिव्हाळा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा हाभव्य सोहळा भारतीय णसंस्कृतीतील विविधता आणि एकात्मता दर्शवणारा आहे. ‌‘वाईटावर चांगल्याचा विजय‌’ हे या सणाचे मुख्य सूत्र आहे. या काळात लोक जुने हेवेदावे विसरून एकमेकांना क्षमा करतात आणि नात्यांमधील ओलावा पुन्हा नव्याने जिवंत करतात. हा सण जात-पात, धर्म आणि सामाजिक स्तर या पलीकडे जाऊन सर्वांना एकाच रंगात रंगवून टाकतो. होलिकोत्सवाचा गर्भितार्थही ‌‘अनिष्टाचे दहन करुया‌’ हाच आहे. भावनिक बंध घट्ट करणे आणि पूर्वग्रहांच्या भिंती पाडून टाकणे, हेच या सणाचे गमक आहे.
भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांची संरचना ही मानवी अस्तित्वाच्या विविध स्तरांना स्पर्श करणारी आहे. फाल्गुन मासातील पौर्णिमेला साजरा होणारा होळी हा उत्सव याचे मूर्तीमंत उदाहरण. वरवर पाहता हा सण केवळ रंगांची उधळण आणि मौजमजेचा वाटत असला, तरी त्यामध्ये दडलेला समाजशास्त्रीय, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक विचार मौलिक आहे. मानवी मनातील क्लेष, निसर्गातील बदल आणि सामाजिक एकात्मता या तिन्ही पातळ्यांवर होळीचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते.
गेल्या काही वर्षांमध्ये सांस्कृतिक सरमिसळीमुळे महाराष्ट्रातही होळीच्या दिवशी रंगोत्सव साजरा होतो. साधारण 10-15 वर्षांपूर्वी फाल्गुन पौर्णिमेला होलिकोत्सव, त्याच्या दुसऱ्या दिवशी धुळवड आणि रंगपंचमीच्या दिवशी रंगांची उधळण केली जात असे. पण आता उत्तरेकडील परंपरांप्रमाणे होळी आणि धुळवड यांना अधिक महत्त्व आले असून रंगपंचमी बिचारी झाकोळली गेली आहे. गावाखेड्यात नसलं तरी महानगरांमध्ये ही स्थिती प्रकर्षाने दिसते. अर्थात यामुळे या सणांचा लौकिकार्थ आणि महत्व तसूभरही कमी होत नाही.
होलिका दहनामागे जी पौराणिक कथा सांगितली जाते, दैवी चमत्काराची नसून मानवी अहंकाराच्या पतनाची आणि शुद्ध भक्तीच्या विजयाची गाथा आहे.
असुराजधिपती हिरण्यकश्यपू हा अत्यंत अहंकारी राजा होता. त्याने स्वत:लाच देव मानले होते, मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. प्रल्हादाची भक्ती पाहून क्रोधीत झालेल्या हिरण्यकश्यपूने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. शेवटी त्याने आपली बहीण होलिका हिला मदतीला बोलावले. होलिकेला अग्नीपासून सुरक्षित राहण्याचे वरदान लाभले होते. प्रल्हादाला मांडीवर घेऊन ती चितेवर बसली, जेणेकरून प्रल्हाद जळून खाक होईल. परंतु, प्रल्हादाच्या भक्तीमुळे होलिकेकडील संरक्षक वस्त्र उडून प्रल्हादावर आले आणि होलिका मात्र त्या आगीत भस्मसात झाली. या घटनेची आठवण म्हणून वाईट विचारांचे आणि नकारात्मकतेचे दहन करण्यासाठी ‌’होळी दहन‌’ करण्याची परंपरा सुरू झाली. हिरण्यकश्यपूने स्वतःला ईश्वराच्या स्थानी बसवण्याचा जो अट्टाहास धरला, तो त्याच्या विनाशाचे कारण ठरला. शक्तीचा वापर जेव्हा अनिष्ट हेतूंसाठी केला जातो, तेव्हा वरदानही शापात रूपांतरित होऊ शकते. होलिकोत्सवाचा हाच खरा संदेश असून आपल्यातील ईर्ष्या, द्वेष आणि अंहकार यांसारख्या राक्षसी प्रवृत्तींचे दहन केल्याशिवाय मनाची शुद्धी होणे अशक्य आहे.याच सणाशी जोडलेली दुसरी कथा भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्यातील निखळ प्रेमाची. गोकुळात सुरू झालेली रंगांची ही प्रथा सावळ्या आणि गोऱ्या रंगातील द्वैत मिटवून मानवी मनाला एकाच रंगात न्हाऊ घालण्याची प्रेरणा देते. ब्रजभूमीतील होळी आजही जगप्रसिद्ध आहे. पुतना वधाचा संदर्भ असो वा कामदेवाचे आत्मबलिदान, प्रत्येक कथा ही अनिष्टाचा नाश करून शुभ्र आणि सात्त्विक विचारांच्या स्थापनेचा पुरस्कार करते. रघु राजाच्या काळात धुंधी राक्षसिणीला मुलांनी आवाजाच्या जोरावर पळवून लावल्याची कथा आजही आपल्याला सामूहिक शक्तीच्या महत्त्वाची जाणीव करून देते.
अनादी काळापासून होळी हा सण चालत आला आहे. निसर्गात होणारा बदल आणि हिवाळ्याची सांगता होऊन वसंताची चाहूल लागली की, होळीचे आगमन होते. ‌‘वाईटावर चांगल्याचा विजय‌’ हे या सणाचे मुख्य सूत्र आहे. या काळात लोक जुने हेवेदावे विसरून एकमेकांना क्षमा करतात आणि नात्यांमधील ओलावा पुन्हा नव्याने जिवंत करतात. रंग, संगीत, नृत्य आणि पक्वान्नांची मेजवानी यामुळे हा सण जात-पात, धर्म आणि सामाजिक स्तर या पलीकडे जाऊन सर्वांना एकाच रंगात रंगवून टाकतो. या सर्वसमावेशकतेमध्येच होळीचे सांस्कृतिक महत्त्व दडलेले आहे. हा सण कोणत्याही एका वर्गाचा किंवा जातीचा उरलेला नाही. चेहऱ्यावर रंगांचा थर चढला की माणसाचे बाह्य रूप पुसले जाते आणि उरतो तो केवळ एक माणूस. हीच या उत्सवाची खरी सामाजिक फलश्रुती आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात सामाजिक स्तरावर अनेक भेदाभेदांच्या भिंती आहेत; पण होळी हे सर्व भेद विरघळवून टाकणारे एक रसायन म्हणून काम करते. ‌‘बुरा न मानो होली है‌’ असे म्हणत विरोधक किंवा शत्रूच्याही चेहऱ्याला रंग लावून, त्याची गळाभेट घेऊन, जुने हेवेदावे विसरण्याची ही परंपरा लोकशाही रचनेला बळकटी देते. या सणाला खाद्यसंस्कृतीचीही जोड आहे.
पुरणपोळी हा महाराष्ट्रातील खास बेत असतो, तर उत्तर भारतात गुजिया, मठरी आणि दही वडा यांसारखे पदार्थ मोठ्या आवडीने बनवले जातात. ढोल-ताशांच्या गजरात आणि लोकगीतांच्या सुरात नाचणे, हे या सणाचे अविभाज्य अंग आहे. हा काळ निसर्गासाठी नवचैतन्याचा असतो. वृक्षवेलींनी आपली जुनी पाने त्यागून नवी पालवी धारण केलेली असते. निसर्गातील हा बदल मानवी जीवनातही प्रतिबिंबित व्हावा, हा होळीमागचा मूळ हेतू आहे. या दिवशी संध्याकाळी मिठाईची देवाणघेवाण, गोडधोडाचा स्वयंपाक, सर्वांनी एकत्रितपणाने या मेजवानीचा आस्वाद घेण्याची परंपरा आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याची प्रथा नात्यांमधील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. वसंत ऋतूच्या आगमनासोबतच निसर्ग जसा कात टाकतो, तशीच माणसानेही आपल्या मनातील द्वेष, अहंकार आणि कटुता सोडून देऊन क्षमाशील व्हावे, अशी यामागची धारणा आहे. -अंजली महाजन, कला-संस्कृती अभ्यासक

Check Also

बच्चू कडू यांची ‌‘प्रहार‌’ इतिहासजमा

विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती …