सर्वांत प्रगत आणि किफायतशीर चॅटबॉट कुणाचा, यावरून ओपन एआय आणि चीनचे डीपसीक यांच्यात संघर्ष सुरू असण्याच्या काळातसुद्धा मानवजातीच्या इतिहासातलं सर्वांत जुनं वास्तव बदललेलं नाही. ते म्हणजे, पृथ्वीच्या पाठीवरचं सगळ्यात गुंतागुंतीचं, आश्चर्यजनक आणि अमूल्य यंत्र म्हणजे मानवी शरीर. मानवी जीवनात प्रत्येक वस्तूला पर्याय देता येईल; पण मानवी शरीराला पर्याय नाही. हे यंत्र बिघडलं तर दुरुस्त होऊ शकतं; पण संपलं की त्याचं अस्तित्व भिंतीवरच्या फोटोपुरतंच..! कुणी काबाडकष्ट करून, कुणी स्मार्टवर्क करून तर कुणी लबाड्या करून आयुष्यभर पैशाला पैसा जोडत राहतो. आपलं यंत्र बंद पडलं, तर पुढच्या पिढीची सोय असावी, याचीही खबरदारी घेतो. कुणी एकटाच सात-आठ पिढ्यांचं कमावून ठेवतो. परंतु मृत्यूनंतर त्यातला छदामसुद्धा त्याला सोबत नेता येत नाही. लोभी माणसाला या वास्तवाची जाणीव नेहमी करून दिली जाते. मात्र, काहीच फरक पडत नाही.
अशा व्यक्तीला जर समजलं, की मृत्यूनंतर पुन्हा जिवंत करू शकणारं तंत्रज्ञान विकसित झालंय, तर ते विकत घेण्यासाठी ती व्यक्ती कितीही पैसे मोजू शकेल. दीड-दोन कोटी म्हणजे ‘चिल्लर’ वाटणारे असंख्य महाभाग आजकाल अवतीभवती दिसतात. अशा व्यक्ती केवळ ‘चान्स’ घ्यायचा म्हणूनसुद्धा पैसे गुंतवू शकतात. म्हणूनच, अद्याप कोणताही आधार, अनुभव आणि शाश्वती नसलेल्या ‘क्रायोनिक्स’ नावाच्या कथित तंत्रज्ञानाचा मोठा बोलबाला आहे.
अनेक अब्जाधीशांनी मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होण्यासाठी ‘बुकिंग’ वगैरे करून ठेवलंय म्हणे! जर्मनीतल्या एका स्टार्टअप कंपनीमुळं हा विषय पुन्हा रंगलाय. कंपनीच्या तीन रुग्णवाहिका भररस्त्यात अमरत्वाचा दावा आणि प्रचार करताना दिसतात. या रुग्णवाहिका म्हणजे ‘क्रायोनिक लॅब’ आहेत असं सांगितलं जातं. मृत मानवी शरीर कमी तापमानात ठेवून त्यावर प्रयोग करण्याच्या तंत्राला ‘क्रायोनिक तंत्र’ म्हणतात. आम्ही तुमच्या मृत्यूनंतर तुमचं शरीर जपून ठेवू आणि भविष्यात ते पुन्हा जिवंत करून दाखवू, असा कंपनीचा दावा आहे. दोन लाख डॉलर म्हणजे सुमारे पावणेदोन कोटी एवढा खर्च ‘बुकिंग’ करणार्याकडून घेतला जातो. ‘पर्फ्युजन पंप’ नावाच्या उपकरणात मानवी शरीर थंड वातावरणात ठेवलं जातं. अमरत्व मिळवण्याच्या या धडपडीला मोठा इतिहास आहे. अमेरिकेत अशी लॅब शंभर वर्षांपूर्वीच सुरू झाली होती. परंतु ‘आशा’ एवढ्या एकाच शब्दावर ही धडपड आधारलेली आहे. काहीजणांना हा शुद्ध वेडेपणा वाटतो, तर काहीजणांना नैतिकदृष्ट्या हे अयोग्य वाटतं. जर्मनीतल्या कंपनीला आतापर्यंत चार-पाच मानवी मृतदेह ‘प्रिझर्व्ह’ करण्यासाठी मिळालेत, शिवाय काही मृत प्राणीही प्रयोगासाठी जपून ठेवलेत.
भविष्यात जेव्हा आपला मृत्यू होईल, तेव्हा आपलं शरीर ‘प्रिझर्व्ह’ करून ठेवावं, असं सांगून ‘बुकिंग’ केलेल्यांची संख्या जर्मनीत 700 वर गेली आहे. वास्तविक, ‘क्रायोप्रिझर्व्हेशन’ प्रक्रियेतून आजतागायत कुठलीच मृत व्यक्ती जिवंत झालेली नाही. शिवाय, तसं झालंच तरी अशा व्यक्तीचा मेंदू कार्यरत राहण्याची शक्यता फारच धूसर आहे. मानवी देहाचं यंत्र एकदा बंद पडलं की बंदच! ते पुन्हा सुरू करण्याचा खटाटोप हास्यास्पद आहे, असं तज्ज्ञ सांगतात. तरीही एवढ्या मोठ्या संख्येनं लोक पुनरुज्जीवित होण्यासाठी ‘बुकिंग’ करतात, यालाच म्हणतात आशा..!-हिमांशु चौधरी
Check Also
दिलासादायक माघार
केंद्र सरकारने बहुचर्चित ‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र