लेख-समिक्षण

पडद्यावरुन हरपतंय सामाजिक ऐक्य

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात जातीय, धार्मिक सलोखा आणि ऐक्य प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान होते. विखुरलेल्या समाजाला एकसंध करण्याची मोठी कामगिरी पार पाडायची होती. यामध्ये चित्रपटांनीही मोठी भूमिका निभावली. कृष्णधवलच्या जमान्यापासून 1980 च्या दशकांपर्यंत सामाजिक सद्भाव, जातीय आणि धार्मिक ऐक्य, सलोख्याचा संदेश देणार्‍या चित्रपटांची रेलचेल असायची. नंतरच्या काळातही अशा प्रकारचे चित्रपट येत राहिले; पण आता अशा कथानकांना फारसे महत्त्व दिले जात नाही. कारण आजच्या वातावरणाला ते पुरक नसल्याचे निर्मार्त्याना वाटते.
——————
आपल्या देशात वेळोवेळी होणारे बदल कथानकाच्या माध्यमातून दाखविण्याची बॉलिवुडची जुनीच परंपरा राहिली आहे. म्हणूनच सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब कथानकात उमटलेले दिसते. युद्ध काळात आपल्या निर्मात्यांनी युद्धावर आधारित चित्रपट साकारले, बेरोजगारीवरून तरुणांचा उद्रेक होऊ लागला तेव्हा हा विषय निर्मात्यांच्या केंद्रस्थानी आला. नैसर्गिक संकट झेलणार्‍या शहरांवर चित्रपट साकारले गेले. एवढेच नाही तर बॉम्बस्फोट, हत्याकांड यासारखे गंभीर विषय देखील निर्मात्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. क्रीडा स्पर्धा, क्रीडापटू, राजकारणी यांच्यावरही चित्रपट आले. अवकाशात यश मिळवले तेव्हा त्यावरही चित्रपट आला. पण अनेक काळापासून हिंदी चित्रपटाचा आत्मा राहिलेला आणि हिंदू मुस्लिम ऐक्य सांगणार्‍या चित्रपटांची संख्या रोडावलेली दिसते. कृष्णधवलच्या जमान्यापासून 1980 च्या दशकांपर्यंत सामाजिक सद्भाव, जातीय आणि धार्मिक ऐक्य, सलोख्याचा संदेश देणार्‍या चित्रपटांची रेलचेल असायची. पण आता अशा कथानकांना फारसे महत्त्व दिले जात नाही. कारण आजच्या वातावरणाला ते पुरक नसल्याचे निर्मार्त्याना वाटते . यामागचे आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या कलाकृतीवर कोणी आक्षेप घेऊ नये किंवा एखाद्याच्या नाराजीत भर पडेल, संतापाचे वातावरण तयार होईल, या भीतीपोटी निर्माते सामाजिक आशय, ऐक्यभावनांवर आधारित चित्रपट तयार करण्याचे टाळत आहेत. विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ला यश मिळाले असते तर अशा चित्रपटांची लाटच आली असती. ‘द केरल स्टोरी’ सारखा चित्रपट येत असेल तर तो सत्यघटनांवर आधारित असल्याचे सांगितले जाते. याचा मतितार्थ एवढाच की समाजातील एका गटाला नायक आणि दुसर्‍या गटाला खलनायक म्हणून सादर केले गेले. मात्र बॉलिवुडचा इतिहास पाहिला तर सामाजिक ऐक्यावर आधारित असंख्य चित्रपटांची नावे सांगता येतील. हे ऐक्य, बंधुता केवळ पडद्यावरच नाही तर प्रत्यक्षात कलांकारांमध्येही दिसला आहे.
1941 मध्ये व्ही. शांताराम यांनी ‘पडोसी’ नावाने दोन मित्रांवर चित्रपट आणला. या चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे यात पंडिताची भूमिका मजहर खान यांनी तर मुस्लिम युवकाची भूमिका गजानन जहागीरदार यांनी साकारली होती. चित्रपटाच्या शेवटी एकाच उद्देशासाठी दोघेही जीव देतात. काही वर्षानंतर पी.एल. संतोषी यांचा हम एक हे (1946) नावाचा चित्रपट आला आणि त्यात सामाजिक ऐक्य दाखविले गेले. तत्कालिन काळात जातीय वैर, द्वेष यासारख्या भावना नव्हत्या. चित्रपटांकडे मनोरंजन म्हणून पाहिले जात होते. तेव्हा क्रांतिवीरसारखे आवेशपूर्ण संवाद देखील नसायचे. यश चोप्रा यांचा धुल का फूल (1959) देखील याच धाटणीचा चित्रपट. एक मुस्लिम व्यक्ती जंगलात निराधार सापडलेल्या एका हिंदू मुलाचा सांभाळ करतो. या चित्रपटात ‘तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद हे, इन्सान बनेगा’. हे गाणे कमालीचे गाजले, आजही तितकेच लोकप्रिय आहे. आजच्या काळात धार्मिक ऐक्य आणि मानवतेशी संबंधित चित्रपटांचा विचार केला तर ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘मुल्क चा समावेश करावा लागेल.
हिंदी चित्रपटात धर्म हा कधीच वादाचा विषय राहिलेला नाही. त्याला कधी हवा देखील दिली नाही. कारण चित्रपट हे मनोरंजनाचे साधन होते. परंतु बॉलिवुडच्या कथानकात आता धर्माला अधिक महत्त्व दिले जात आहे. प्रेक्षकही वेगवेगळ्या विचारसरणीत विभागले गेले. पब्लिसिटी स्टंटचे रुप देत चित्रपट हिट केले जावू लागले. परिणामी चित्रपटाचा मूळ गाभा ऐक्य, बंधुता हा बाजूला पडू लागला. तरीही प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणणारा शाहरुख खान आजही पडद्यावरचा राज आणि आर्यन आहे. आमीर खानच्या भुवन, रवी आणि लाल सिंह चढ्ढाला प्रेक्षकांनी पसंती दिली. सलमानखान हा चुलबुल पांडे म्हणून अधिक गाजला. अमिताभ बच्चनच्या विजय या पात्राबरोबरच इक्बाल आणि अथोंनी पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. चित्रपटातील प्रत्येक रुप ऐक्यभावना प्रदर्शित करणारे होते, परंतु आता तेच लोप पावत आहे.
स्वातंत्र्यानंतर ऐक्य महत्त्वाचे होंते
स्वातंत्र्यानंतर देशात जातीय आणि सलोखा, ऐक्य प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान होते आणि विखुरलेल्या समाजाला एकसंध करण्याची मोठी कामगिरी पार पाडायची होती. याच काळात लोकांनी सामाजिक आणि आर्थिक समता, समृद्धी तसेच समाधानी जीवनाबाबतचे स्वप्न रंगविले होते. म्हणूनच मदर इंडिया, दो बिघा जमीन, नया दौरसारखे चित्रपट यशस्वी ठरले. आजही या चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळतो. देशाच्या फाळणीनंतर झालेल्या हत्याकांडावर कधीही चित्रपट तयार झाले नाहीत. कालांतराने फाळणीवर आधारित चित्रपट आणण्याचा प्रयत्न झाला. तरीही फाळणीचे दु:ख बाजूला ठेऊन ऐक्य साधण्यावरच भर राहिला. कुंभमेळ्याला जाणार्‍या भावांची रेल्वेत होणारी ताटातूट यासारखे कथानक रचले गेले. मग हे दोन्ही भाऊ वेगवेगळ्या धर्मात लहानाचे मोठे होतात. याच काळात गांधीवादी विचारांना प्रोत्साहन दिले गेले अणि अस्पृश्य, जातीवाद संपविण्याचे आवाहन केले गेले. अनेक चित्रपटांनी जमीनदार, सावकार पद्धतीचा विरोध केला. नव्या रुपात आजही या अपप्रवृत्ती दिसतात, परंतु त्यावर चित्रपटांची निर्मिती केली जात नाही. करण अर्जुन यासारख्या चित्रपटांनी सावकारी, जमीनदारीवर प्रहार केले. परंतु या मुद्यावर बॉलिवुडची गाडी 1990 च्या दशकांतच थांबलेली दिसते.
‘शोले’तील इमाम साहब आठवा
देवानंद यांचा ‘अल्लाह तेरो नाम’ (1961) हा चित्रपट ऐक्य भावनांचे आदर्श उदाहरण मानले जाते. शोले (1975) मध्ये लहान भूमिका असलेल्या इमाम साहबची तुलना हे सर्वात धाडसी आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणून केली गेली. कच्चे धागे (1999) मध्ये हिंदू आणि मुस्लिम सावत्र भाऊ हे आई मरियमला वाचविण्यासाठी एकत्र येतात. एवढेच नाही तर सात हिंदुस्थानी (1969) क्रांती (1981), कर्मा (1986), लगान (2001) या सारख्या चित्रपटांचा उल्लेख करता येईल. या चित्रपटांनी सामाजिक ऐक्य, सलोखा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
मदतीच्या निमित्ताने एकतेचे दर्शन
बॉलिवुडमध्ये अनेक चित्रपटांत मुस्लिम पात्र हे हिंदु पात्राला मदत करणारा, जीव लावणारा व्यक्ती दाखविला गेला. अमिताभ बच्चन यांच्या जंजीर चित्रपटातील खलनायक शेरखान (प्राण) हा पोलिस अधिकार्‍याला मदत करतो. इक्बाल (2005) देखील असाच चित्रपट असून त्यात मुकबधीर नायक इक्बाल हा क्रिकेटमध्ये यशस्वी हेाऊ इच्छित असतो. त्याचा प्रशिक्षक हिंदू असतो. 2006 मध्ये ‘डोर’ चित्रपटात हिंदू आणि मुस्लिम असलेल्या दोन महिलांमधील संवेदनशील नाते दाखविले आहे. खुद्दार (1982) मध्ये एक मुस्लिम व्यक्ती दोन भावांना आधार देताना दाखवला आहे. खुदा गवाह (1992) मध्ये अमिताभ बच्चन हा काबुलच्या पठाणाची भूमिका साकारताना एका हिंदु पोलिस अधिकार्‍याची मदत घेताना दिसला आहे.
अशा चित्रपटांची यादी मोठी आहे. ‘हे राम’ (2000) मध्ये अमजद खान नावाचे पात्र शेवटच्या प्रसंगात हिंदू नायकाला गांधी यांची हत्या करण्यापासून रोखते. मुन्नाभाई एमबीबीएस (2003) मध्ये जहीरचा मृत्यू हा कथानकाला वेगळे वळण देतो. यशराजचा चित्रपट ‘चक दे इंडिया’ (2007) मध्ये मुस्लिम हॉकी प्रशिक्षक महिला संघाला जिंकून देतो. अशा चित्रपटांची संख्या असंख्य असून त्यात हिंदु आणि मुस्लिम मित्र किंवा एकमेकांना मदत करणारे दाखविले आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘अंधा कानून’मध्ये विजय अणि खान हे दोघेही समाजातील गुन्हेगारांशी एकत्रपणे मुकाबला करताना दिसतात. वेनस्डे (2008) मध्ये दहशतवादी मुस्लिम आहे. मात्र प्रामाणिक पोलिस अधिकार्‍यांपैकी एक पात्र मुस्लिम असते. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणार्‍या चित्रपटांना पसंती देण्यासाठी वातावरणही असणे गरजेचे आहे आणि त्याचाच आज अभाव दिसून येतो.- सोनम परब

Check Also

रामायण, राम, रणबीर आणि वाद

सध्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‌‘रामायर्ण या चित्रपटाच्यानिमित्तान रणीबर कपूरने साकारलेल्या रामाच्या व्येितेखेवरुन वाद सुरू आहेत. वास्तविक …