नोपॉझ म्हणजेच मासिक पाळी जाण्याची प्रक्रिया ही ढोबळ मानाने पन्नाशीनंतर सुरु होणारी प्रक्रिया स्रियांच्या आयुष्यात अपरिहार्य असली तरी ती बहुतेकदा वेदनादायी असते. अलीकडील काळात धकाधकीच्या जीवनशैलीमुळे स्त्रियांचा मोनोपॉझ चाळीशीजवळ येऊन ठेपला आहे. ही प्रक्रिया काही महिने नाही, तर काही वर्षेही चालू शकते. यादरम्यान स्त्रियांमध्ये मानसिक, शारीरिक बदल होत जातात. इतक्या वर्षांची झालेली सवय बदलणं काही जणींना खूप अवघड जातं. यासाठीच काही काळजी घेणं आवश्यक आहे. काही स्त्रियांच्या बाबतीत चाळीशीच्या आधीच रजोनिवृत्ती येते. याचं कारण म्हणजे काहीतरी शारीरिक बदल किंवा एखादी व्याधी यामागे असते. मेनोपॉज मधून जात असलेल्या बर्याच स्त्रियांना मानसिक त्रासाबरोबर शारीरिक त्रासही खूप होतो. मूड स्विंग तर होतातच पण अंगदुखी, रात्री अपरात्री अचानक घाम फुटणे, शरीराची उष्णता खूप वाढणे, चिडचिड, डोकेदुखी असे खूप त्रास होतात. मेनोपॉझमध्ये असताना स्त्रियांना असंतुलित वजन वाढ, डायबेटीस, ऑस्टिओपोरोसिस, हृदयरोग देखील संभवतात..
स्त्री जन्माला येते ती तिच्या बिजकोषातल्या बिजांसहित. तिच्या अंडाशयात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरोन हे हार्मोन्स तयार होत असतात आणि हेच हॉर्मोन्स बीज कधी सोडायचं आणि कधी नाही यावर कंट्रोल करतात. यांच्यामुळेच स्त्रीची मासिक पाळी सुरू असते. साधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर हे हार्मोन्स दर महिन्याला बीज सोडणं थांबवतात आणि स्त्रीचा मोनोपॉझ सुरू होतो. मोनोपॉझची लक्षणे म्हणाल तर , मासिक पाळी नियमित राहत नाही. कधी कधी खूप जास्त आणि वेदनायुक्त रक्तस्त्राव होतो. तर कधी खूप कमी रक्तस्त्राव होतं. याखेरीज खूप घाम येणं, निद्रानाशाचा विकार जडणं, डोकेदुखी वाढणं, उदास वाटणं, सतत थकवा जाणवणं यांसारखी लक्षणे या काळात दिसून येतात. यापैकी कुठल्याही तक्रारी जर चाळीशीनंतर एखाद्या स्त्रीला जाणवत असतील तर डॉक्टरांकडे जाणे आणि व्यवस्थित तपासणी करून घेणे हितकारक असतं. त्यामुळे पुढे जर काही समस्या उद्भवणार असतील तर त्यांचं निराकरण करणं डॉक्टरांना सोपं जातं. या सोबतच आपल्या जगण्यातल्या छोट्या-छोट्या सवयींमध्ये काही बदलही गरजेचे ठरतात. भरपूर पाणी पिणे, रोज व्यायाम करणे, वजन नियंत्रित ठेवणे, अति तिखट, कॉफी, कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक, अति गोड असे पदार्थ टाळणे, त्याऐवजी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ जसे की, दूध, दही, मासे, अंडी असे पदार्थ खाणे, पुरेशी झोप घेणे उपयुक्त ठरते. नियमित योग, दीर्घश्वसन यांचाही खूप फायदा होतो.
Check Also
जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?
बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू …
पांचजन्य वृत्तपत्र