लेख-समिक्षण

केवळ पदवी पुरेशी नाही…

काही दशकांपूर्वी ‘बी.टेक.’ पदवीला विशेष महत्त्व होते. विशेषतः कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित आकर्षक नोकर्‍या मिळत असत. पण आजचे जॉब मार्केट पूर्णपणे बदलला आहे. तंत्रज्ञानातील वेगवान बदल, कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती आणि डिजिटल स्पर्धा यामुळे केवळ पदवी मिळवणे पुरेसे राहिलेले नाही. या बदलत्या परिस्थितीत इंजिनिअर्सना त्यांच्या व्यावहारिक कौशल्ये, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर अधिक भर द्यावा लागणार आहे.
याच संदर्भात गुगलचे अँड्रॉइड हेड आणि गुगल प्लेचे व्हाईस प्रेसिडेंट समीर सामत यांनी तरुण इंजिनिअर्सना काही महत्त्वपूर्ण सल्ले दिले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, औपचारिक शिक्षण ही यशाची सुरुवात असते; परंतु खरे यश सतत शिकत राहण्यात, नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यात आणि समस्यांचे वेगळ्या पद्धतीने निराकरण करण्यात आहे.
समीर यांच्या मते, आजच्या टेनॉलॉजी जगात एआय, मशीन लर्निंग आणि लाउड कॉम्प्युटिंगसारख्या क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवणे अत्यावश्यक झाले आहे. ही कौशल्ये भविष्यातील उद्योगजगतातील सर्वात महत्त्वाची ठरणार आहेत. पण केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नाही; टीममध्ये काम करण्याची सवय आणि प्रभावी संवादकौशल्यही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण गुंतागुंतीच्या तांत्रिक कल्पना साध्या भाषेत मांडता आल्या तरच त्या प्रत्यक्ष उत्पादनांमध्ये त्याचे परिणाम दिसून येतात.
भविष्यातील इंजिनिअर्सनी स्वतःला केवळ ‘कोडर’ किंवा ‘डेव्हलपर’ म्हणून मर्यादित ठेवू नये, असेही सामत सांगतात. त्यांनी ‘युझर-केंद्रित’ तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यावर भर दिला आहे.
तंत्रज्ञानाचे खरे मूल्य तेव्हाच अधोरेखित होते, जेव्हा ते वापरकर्त्यांच्या प्रत्यक्ष समस्यांचे निराकरण करते आणि त्यांचा अनुभव सुलभ करते. त्यामुळे ‘युझर एसपिरियन्स’ समजून घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
गुगलने अलीकडच्या काळात भारतासारख्या विकसनशील देशांकडे विशेष लक्ष दिले आहे. स्वस्त स्मार्टफोन आणि स्थानिक अ‍ॅप्सच्या माध्यमातून तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर गुगल भर देत आहे. या दृष्टिकोनातून, स्थानिक गरजांचा अभ्यास करणे आणि वापरकर्त्यांच्या जीवनाला सोयीस्कर बनवणारे उपाय शोधणे हीच भावी इंजिनिअर्ससाठी खरी संधी आहे.
आजच्या पिढीतील तरुणांनी हे समजून घेतले पाहिजे की पदवी ही केवळ सुरुवात आहे. जग बदलत आहे, नोकरीच्या संधींचे स्वरूप बदलत आहे आणि त्याचबरोबर कौशल्यांचे मूल्यही बदलत आहे. जर तुम्ही नवनवीन तंत्रज्ञानाशी मैत्री केली, समस्यांकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले आणि आपल्या कल्पकतेला योग्य दिशा दिली, तर यशाची असंख्य दारे तुमच्यासाठी खुली होतील.

Check Also

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …