लेख-समिक्षण

आठवणी ‘शोले’च्या

बॉलिवुडमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपट म्हणून रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ चित्रपटाचा उल्लेख करावा लागतो. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण झाली. आजही या चित्रपटातील पात्र, गाणे, संवाद, दृश्य प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहेत. तीन कोटी रुपयांत तयार झालेल्या चित्रपटाचे प्रारंभिक बजेट एक कोटी रुपये होते. मात्र या चित्रपटाने तत्कालिन काळात ३५ कोटी रुपयांची कमाई केली. मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमध्ये सलग पाच वर्षे‘शोले’ चित्रपटाचे खेळ सुरू होते. १९७० च्या दशकांतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ‘शोले’ने विक्रम नोंदविला. व्यक्तिशः मला ‘बसंती’ म्हणून आयुष्यभरासाठी ओळख या चित्रपटाने दिली. प्रेक्षकांचे चित्रपटावरील आणि बसंतीवरील प्रेम अफलातून आणि विलक्षण होते आणि ५० वर्षांनंतरही ते कायम आहे.
१९७४ मध्ये शोले चित्रपटाची शुटिंग सुरू झाले. चित्रपट १९७५ मध्ये प्रदर्शित झाला. आज या चित्रपटास प्रदर्शित होऊन पाच दशकं लोटली. पन्नास वर्षांनंतरही प्रेक्षकवर्ग या चित्रपटाचा आनंद लुटत आहेत आणि प्रदर्शनाचा सुवर्णमहोत्सव वर्ष साजरा करत आहेत. अर्थात असे चित्रपट नेहमी तयार होत नाहीत. हा एक आयकॉन चित्रपट मानावा लागेल. प्रेक्षकांनी या चित्रपटातील एका एका पात्राला पुन्हा पुन्हा जीवंत केले आणि स्वत:शी जोडले. ही बाब खरोखरच रंजक आहे. या चित्रपटातून मैत्री कशी करावी, प्रेम कसे करावे अशा अनेक गोष्टी शिकावयास मिळतात. या सर्व गोष्टींचे सादरीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आले.
तत्कालिन काळात आजच्या काळाप्रमाणे आधुनिक तंत्र आणि तंत्रज्ञान नव्हते. सुविधाही नव्हत्या. आजकाल बहुतांश गोष्टी तंत्रज्ञानाच्या मदतीने साध्य केल्या जातात. पूर्वी असे नव्हते, तरीही एवढा दर्जेदार चित्रपट आकाराला आला. या चित्रपटातील प्रत्येक कोपरा अजरामर झाला आहे. चांगले कथानक, संवाद, संगीत आणि अभिनय. अभिनयाबाबत बोलायचं तर ‘शोले’मधील प्रत्येक कलाकार हा प्रत्येक पात्रात किंवा व्यक्तिरेखेत अतिशय फिट बसला. याचे श्रेय दिग्दर्शकांचे आहे. कारण त्यांची कलाकाराची निवड अतिशय अचूक ठरली. मी सुमारे २०० हून अधिक चित्रपटांत काम केले. मात्र त्यातही ‘शोले’ला पहिल्या क्रमाकांवरच ठेवेन. त्यानंतर सीता गीता. ‘शोले’ ही अजरामर कलाकृती. अशा चित्रपटात काम केल्याचा मला अभिमान वाटतो.
आणखी एक म्हणजे या चित्रपटात काम करण्याअगोदर मी आणि धर्मेंद्रजी आम्ही एकमेकांना ओळखत होतो. परंतु या चित्रपटामुळे आणखी जवळ आलो. ‘शोले’व्यतिरिक्त अनेक चित्रपटात धर्मेंद्रजी यांच्यासमवेत काम केले आहे. त्यामुळे ‘शोले’मध्ये काम करताना फारशी अडचण आली नाही. कारण प्रत्येकाचे शुटिंग वेगवेगळ्या काळात होत असे. संजीवकुमार आणि अमजदजी यांचे शूटिंग वेगळ्या वेळेत असायचे. शुटिंगचे ठिकाण ठरलेले होते, बंगळूरजवळील रामनगरला. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, तेथून तासाभराचा प्रवास करत शुटिंगस्थळी जावे लागायचे. दररोज शूटिंग नसायचे. पण या काळात तयारी करावी लागायची. हा चित्रपट पूर्ण होण्यास एक वर्ष लागले. यात दहा-दहा दिवसांनंतरच्या तारखा असायच्या. कधी कधी तर एक महिना तर कधी दोन महिन्यांनंतरची तारीख असे.
बहुतांश शुटिंग उन्हाळ्यात झाले. माझे तर शुटिंग अनेकदा कडक उन्हातच झाले. वास्तविक, मी नेहमीच त्यांना नोव्हेंबर डिसेंबरच्या तारखा देण्याची मागणी करत होते; परंतु तसे घडले नाही. एवढेच नाही तर या चित्रपटातील एकही दृश्य मुंबईत झालेले नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी मुंबईहून बंगळूरला यावे लागायचे. संपूर्ण शुटिंग रामनगरला झाले. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. माझे सर्व सीन उन्हात आहेत. ‘जब तक है जान’ हे गाणे तर भरदुपारी चित्रीत केले गेले. मला आठवतंय ऐन कडाक्याच्या उन्हाचा मे महिना होता आणि डोंगरावर नृत्य होते. यावरुन आम्ही कशा वातावरणात काम केले असेल याचा तुम्हाला अंदाज येईल. ती जागा आज पर्यटनस्थळ झाली आहे. पण त्यावेळी नाचताना मला प्रचंड त्रास झाला. प्रत्येक शुटिंगच्या अगोदर पायाला थंडपणा मिळावा यासाठी दगडावर पाणी टाकले जायचे. कारण तीव्र उन्हाने दगडांचे अक्षरशः चटके बसायचे. त्याच्यावर उभे राहणे देखील त्रासदायक होते. काम करताना अनेकदा चटके बसायचे. बसंतीला तर किती त्रास सहन करावा लागला, हे मलाच ठाऊक. खाली झोपून गाणे म्हणणे असो, जमीनीवर पडलेले दृश्य असो किंवा माती लागलेला सीन असो. तशा स्थितीत मी आनंदाने काम केले. डोयावर ऊन असायचे. नृत्य संपताच एक मुलगा छत्री घेऊन उभा राहायचा. तेथे मेकअप रुम नव्हती, झाडही नव्हते. पंखाही नाही. मी घामाघुम व्हायचे. कधी कधी एखाद्या दृष्यात घाम आला नाही तर वॉटर स्प्रे म्हणून कृत्रिम घाम आणला जायचा. पण या सर्वाचे शल्य सिनेमाच्या यशाने कधीचेच पुसून गेले.
‘शोले’ चित्रपटाच्या अनेक आठवणी आहेत. आम्ही सर्वांनी एक टिमवर्क म्हणून काम केले. सर्वांनी एकच गोष्ट ठरविली आणि ती म्हणजे उत्कृष्ट अभिनय करायचा. आम्ही शूटिंगवर जाताच त्या पात्रात शिरायचो. मला बसंती म्हणूनच वावरायचे असल्याने मला तसा स्वभावही ठेवायचा होता. विशेषत: बोलण्याची स्टाईल, हालचाली. मी स्वत:ला ‘बसंती’ला वाहून घेतले होते. कधी कधी विचार येतो की ते पात्र माझ्यात भिनले की काय?. पण त्यामुळेच बसंतीचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले. जणू ते पात्र माझ्यासाठीच लिहिले की काय असे वाटते. लिहिणार्‍यांनीही अन्य कोणाही व्यक्तीबाबत विचार केला नाही. वितरकांना देखील त्याच पात्रासाठी हेमामालिनी हवी होती.
शेवटी वर्षानंतर शूटिंग संपले. सिनेमा रिळांमध्ये बंदिस्त झाला. मी गाडीत बसून घरी आले. त्यानंतर नियमित काम सुरू झाले. या चित्रपटासाठी नृत्य शिकवण्यासाठी गुरुजी घरी यायचे, ही प्रथा खंडीत झाली नाही. चित्रपट तयार झाला, झळकला आणि खूप चालला. त्याचे संवाद लोकांच्या तोंडावर रेंगाळू लागले. आम्ही कोठेही गेलो तरी ‘शोले’चेच संवाद म्हणण्याची ऑफर यायची. एकदा तर आम्ही फिजीला गेलो होतो. तेथील लोक देखील ‘शोले’मधील संवाद ऐकून आनंदित झाले. या आठवणी सुखदायी आहेत.
या चित्रपटाचे शुटिंग सुरू होण्यापूर्वी मला थोडे कठीण काम असल्याचे वाटत होते. कारण एवढे मोठे लांबलचक संवाद म्हणायचे, जरा अवघड वाटायचे. लेखक जावेद अख्तर यांनी मला, ‘तुम्हाला असे असे संवाद म्हणायचे आहेत,’ असे सांगितले होते. रमेश सिप्पी यांनी देखील तुम्हाला असा सीन करायचा आहे, असे सांगायचे. मी पण त्यांना ‘ठीक आहे’ एवढेच म्हणायचे. चित्रपटात मंदिरातील एक सीन आहे. यात धर्मेंद्र हे भोपू घेऊन भगवान म्हणून माझ्याशी बोलतात. या दृश्यात सलग संवाद आहेत. पण मी संपूर्ण संवाद काळजीपूर्वक लक्षात ठेवले आणि त्याचे स्मरण केले. त्यामुळे शुटिंगमध्ये अगदी सहजपणे बोलून गेले. नंतर मला संवादाची भीती वाटली नाही.
आता मी राजकारणात आहे. निवडणुकीच्या प्रचारात जाते तेव्हा मला नागरिक देखील ‘शोले’मधील डॉयलॉगची मागणी करतात. ‘बसंती की इज्जत का सवाल है,’ किंवा कहा जाना है बाबू, बेलापूर, रामपूर, कहा जाना है बोलो, या मोटरगाडी नही मिलेगी, बैठे और घर्र से चल दिए. या तो बस बसंती का टांगाही मिलेगा. जाना है तो बोले, बैंठना हे तो बैठो नही तो…’आजही हा संवाद कमालीचा लोकप्रिय आहे.
आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यावेळी मी २५ वर्षाचे होते. आजही मी या गोष्टी करू शकते. कारण मी आजही तितकीच उत्साही आहे. त्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे नृत्य. आजही मी रोज सराव करते. या कारणामुळे फीट आहे. स्टेजवर नाचण्यासाठी फिगर चांगली असणे गरजेचे आहे. बॉडी मेन्टेंन हवी. स्टेजवर राधाचे पात्र साकारते. ‘राधा रासबिहारी’मध्ये राधा होऊन येते तेव्हा मी पूर्णपणे त्यात हरवून जाते. नृत्य करताना मला वाटते की मी कृष्णासमवेत नृत्य करत आहे. त्याचेवळी मी स्व:ला राधा मानते.
पण ‘शोले’ चित्रपटानंतर मला सर्वजण ‘बसंती’ म्हणूनच हाक मारू लागले. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. एक ज्येष्ठ नागरिक मला पाहून म्हणाले, ओह… ही तर बसंती. ते अतिशय उत्साही झाले. ते म्हणाले, ‘बसंती तेरा नाम या है’, व्वा! हे ऐकून मला मजा आली. आजही ‘शोले’ची आठवण काढून त्यांना आनंद होतो. एकवेळ ‘शोले’तील बसंतीवरचे प्रेम पाहून लोक माझे खरे नाव विसरतील की काय? असे वाटू लागले होते. ‘शोले’तील संवाद लोकांच्या तोंडपाठ आहेत. २०१९ च्या निवडणुकीत धर्मेंद्र माझ्या प्रचारासाठी आले तेव्हा नागरिकांनी ‘शोले’च्या संवादाची मागणी केली. तेव्हा ते म्हणाले, गाववाँलो हेमा को वोट दो. नही तो मै टंकी पर चढ जाऊंगा.’ लोकांनी टाळ्या वाजविल्या. ‘शोले’च्या बर्‍याच काळानंतर मी राजकारणात आले. लोक मला निवडणुकीत बोलावत असत. मी प्रचारात जात असे. प्रचारासाठी हेमामालिनी यांना पाठवा, अशी मागणी करत असत. बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश या राज्यात मी प्रचारासाठी गेले होते. प्रत्येक ठिकाणी मला पाहताच लोक ‘बसंती..बसंती,’ म्हणून ओरडू लागतात. हे लोकांचेच प्रेम विलक्षण आहे.- हेमा मालिनी, ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार

Check Also

गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …