लेख-समिक्षण

‘पक्ष्यांच्या ताई’चा सन्मान

’टाइम’ मासिकाने विविध क्षेत्रांतील १३ महिलांची ’वूमन ऑफ द इयर’ या प्रतिष्ठित यादीत निवड केली असून, २०२५च्या यादीत समाविष्ट असलेल्या एकमेव भारतीय महिला म्हणजे पौर्णिमा देवी बर्मन.
पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित कार्य
पौर्णिमा देवी बर्मन या आसाममधील प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ आणि वन्यजीव संशोधक आहेत. त्या विशेषतः मोठ्या आकाराच्या ’हारगिला’ (ग्रेटर अडज्युटंट स्टॉर्क) या दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ओळखल्या जातात. मानवी हस्तक्षेपामुळे नामशेष होण्याच्या संकटात असलेल्या या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
संशोधनाची सुरुवात आणि जागृती मोहीम
पौर्णिमा देवी यांचे बालपण नाशिक आणि आसाममधील कामरूप जिल्ह्यातील एका खेड्यात गेले. गुवाहाटी विद्यापीठातून पर्यावरणशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी ’अरण्यक’ या जैवविविधता संवर्धन संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणून काम सुरू केले. त्याच दरम्यान, हारगिला पक्ष्यांची घटती संख्या लक्षात घेत त्यांनी या प्रजातीच्या संरक्षणासाठी झपाटून काम करण्याचा निर्णय घेतला. गावकर्‍यांमध्ये या पक्ष्यांबद्दल अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा होत्या. सुरुवातीला त्यांच्या संवर्धनासाठी लोकांना समजावणे अवघड होते. मात्र, पौर्णिमा देवी यांनी गावातील महिलांना विश्वासात घेत विशेष मोहीम राबवली. मंदिरात महिला एकत्र जमत असताना त्या त्यांच्याशी संवाद साधत हारगिला पक्ष्यांची महत्त्वाची भूमिका समजावून सांगू लागल्या. हळूहळू महिलांनी त्यांचे म्हणणे स्वीकारले आणि याच महिलांनी पुढे ’हारगिला आर्मी’ स्थापन केली.
हारगिला आर्मी आणि महिलांचे सक्षमीकरण
ही ’हारगिला आर्मी’ पक्षीसंवर्धनाच्या कार्यात सक्रिय झाली. पक्ष्यांची घरटी वाचवणे, जखमी पिल्लांची काळजी घेणे, पथनाट्य सादर करणे, गाणी तयार करून गावकर्‍यांना प्रबोधन करणे अशा विविध माध्यमांतून त्यांनी जनजागृती केली. विशेष म्हणजे, त्यांनी हारगिला पक्ष्यांसाठी ’डोहाळजेवण’ आणि ‘उष्टावण’ असे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले, ज्यामुळे या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला.
याशिवाय, पौर्णिमा देवी यांनी गावातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कापड विणकाम उद्योग विकसित करण्यास मदत केली. पारंपरिक हातमाग तंत्राच्या साहाय्याने ’हारगिला’चे चित्र असलेल्या ओढण्या (गमोसा) तयार करून त्यांना बाजारपेठ मिळवून दिली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान
हारगिला पक्षीसंवर्धनाचे हे कार्य आसाम राज्य सरकारच्या पर्यावरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले. २००७ मध्ये आसाममध्ये हारगिला पक्ष्यांची संख्या अवघी ४५० होती, पण ’हारगिला आर्मी’च्या प्रयत्नांमुळे २०२३ पर्यंत ती १८००च्या वर पोहोचली. त्यांच्या कार्याची दखल घेत, त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचा ’अर्थ हिरो’ पुरस्कार, ’व्हीटले अवॉर्ड’ (ग्रीन ऑस्कर), तसेच राष्ट्रपतींकडून ’नारीशक्ती पुरस्कार’ यांचा समावेश आहे.
आता ’टाइम’ मासिकाने ’वूमन ऑफ द इयर’ पुरस्काराने त्यांचा सन्मान केला असून, हा सन्मान पर्यावरण रक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची योग्य दखल आहे. आज त्यांना संपूर्ण आसाममध्ये ’हारगिला बायडो’ (हारगिला पक्ष्यांची ताई) म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा!

Check Also

लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग

लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी …