दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रिपदाबद्दलचा सस्पेन्स संपवला आहे. आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रामलीला मैदानात शपथ घेतली. यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी दिवंगत काँग्रेसच्या शिला दीक्षित आणि भाजपच्या सुषमा स्वराज यांनी काम केले आहे. रेखा गुप्ता तिसर्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाने आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पक्षातील दिग्गजांना मागे टाकून त्यांनी खुर्ची मिळवली आहे. विशेष म्हणजे भाजप देशातील 21 राज्यांमध्ये सत्तेत असताना त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी कुठेही महिला चेहर्यावर विश्वास दाखवलेला नाही. पण दिल्लीत त्यांनी रेखा गुप्ता यांच्या रुपात महिला नेत्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. भाजप दिल्लीत तब्बल 27 वर्षांनी सत्तेत आला. त्यामुळे भाजप दिल्लीचे नेतृत्त्व कोणाकडे सोपवणार याची उत्सुकता होती. अखेर 11 दिवसांनी भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला. वैश्य समाजातून येणार्या रेखा गुप्ता यांच्याकडे दिल्लीचे मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. त्या पहिल्या टर्मच्या आमदार आहेत. शालीमार बाग मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत.
दिल्लीत मुख्यमंत्री निवडताना भाजप कोणता पॅटर्न वापरणार याची चर्चा होती. दिल्लीत भाजपने राज्यस्थान पॅटर्न वापरला आहे. 2023 मध्ये भाजपने राजस्थानात विधानसभा निवडणूक जिंकली. त्यावेळीही मुख्यमंत्रिपदाबद्दलचा सस्पेन्स बरेच दिवस कायम राहिला. अखेर भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. ते पहिल्यांदाच आमदार झालेले असताना भाजप नेतृत्त्वाने त्यांना थेट मुख्यमंत्रिपदावर बसवले. भजनलाल मुख्यमंत्री होतील याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पण कोणाच्या ध्यानीमनी नसताना भाजपने त्यांना राजस्थानसारख्या मोठ्या राज्याचं नेतृत्त्व दिले. आता दिल्लीत रेखा गुप्ता यांच्याकडे दिल्लीचे मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. 2015 आणि 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा आपच्या वंदना कुमारी यांनी पराभव केला होता. पण यंदा पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली. दोन पराभवांचा बदला त्यांनी यंदा 30 हजार मतांनी विजयी होत घेतला.
रेखा गुप्ता या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडलेल्या नेत्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भारतातील एक प्रमुख विद्यार्थी संघटना आहे, जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित आहे. आरएसएसच्या शिफारसीनंतर भाजप हायकमांडने रेखा गुप्ता यांच्या नावाला मान्यता दिली. वैश्य समाजातील रेखा गुप्ता यांच्या माध्यमातून भाजपने महिला मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, राजकीय आणि जातीय समीकरण यामुळे संतुलित होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
भाजपचे धोरण आता राजधानीतील अर्ध्या लोकसंख्येला लक्ष्य करण्याचे आहे. दिल्लीची यंदाची निवडणूक महिलाकेंद्रित ठरली. निवडणुकीत महिलांचे प्रश्न महत्त्वाचे होते. भाजपने महिलांसाठी अनेक आश्वासने दिली होती. यामध्ये दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन महत्त्वाचे होते. भाजपने महिलांचा आत्मविश्वास दुणावला असे सांगण्यात येते. महिलांसाठी 50 टक्के आरक्षणाची घोषणा केल्यानंतर, भाजपने रेखा गुप्ता यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाला महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश दिला आहे.
Check Also
तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …
पांचजन्य वृत्तपत्र