माणसाचं काम हलकं करण्यासाठी, त्याला अधिक सुख देण्यासाठी मशीन रोज ‘अपडेट’ होत राहिलं. आता तर मशीन माणसासारखंच जगू लागलंय. तरीसुद्धा माणसाला माणसासारखं का जगता येत नाहीये? मशीनचा माणूस होत असताना माणूस मशीनसारखा का होत चाललाय? अनेक माणसांचं काम एकच मशीन करतंय, तर माणसाचं काम डिप्रेशन येण्याइतकं का वाढतंय? त्याच्याकडून कधी आठवड्याला सत्तर तास तर कधी नव्वद तास कामाची अपेक्षा का केली जाते? चांगल्या कंपनीत चांगलं ‘पॅकेज’ मिळालं म्हणून खुशीत असणारे तरुण थोड्याच दिवसांत ‘बर्न आउट’च्या समस्येनं हैराण का होतात?
या समस्येचा आणखी एक भयावह पैलू नुकताच समोर आलाय. संशोधकांनी त्याला ‘पॅरेन्टल बर्न आउट’ असं नाव दिलंय. माणूसपणाचा अनादर करून यंत्रवत काम करत राहिल्यामुळं निर्माण होणारी ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ‘जॉब बर्न आउट’मुळं अनेकांनी नोकर्या सोडून दिल्या, तर अनेकांकडून कामात चुका होऊ लागल्या. कामावरून घरी गेल्यानंतर फक्त विश्रांती… तीही सक्तीची! दुसरा पर्यायच नाही, अशी अवस्था. घरातल्या कोणत्याही गोष्टीत लक्ष घालता येत नाही, अशी स्थिती. ‘पॅरेन्टल बर्न आउट’ ही त्याची पुढची पायरी म्हणता येईल. मुलांसोबत वेळ घालवावासा वाटत नाही, त्यांच्याशी खेळावंसं वाटत नाही, अशा अवस्थेला पोहोचलेले असंख्य आईवडील दिसू लागलेत; वाढत चाललेत, हीच चिंतेची बाब!
ज्या घरात लहान मुलं आहेत, त्यांच्या मातापित्यांना घरातसुद्धा सतत तणाव जाणवत राहणं, हे या विकाराचं स्वरूप. ही एक विचित्र मानसिक स्थिती आहे आणि ती बळावली, तर प्रसंगी आत्महत्येचा विचारही मनात येऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. त्यांच्या मते, ही मानसिक अवस्था नैराश्य म्हणजे डिप्रेशनपेक्षाही गंभीर आहे. बेल्जियमच्या एका विद्यापीठात याविषयी संशोधन सुरू आहे. सुमारे तीस हजार मातापित्यांची मनोअवस्था या तज्ज्ञांनी जाणून घेतली. त्यासाठी एका प्रश्नावलीचा उपयोग करण्यात आला. कामावरून आल्यानंतर जाणवणारा थकवा हा केवळ थकवाच आहे की तो मानसिक तणाव आहे, हे त्यांनी जाणून घेतलं. बहुतांश पालक गंभीर स्वरूपाच्या मानसिक तणावातून जात आहेत, असं त्यांना आढळून आलं. ‘पॅरेन्टल बर्न आउट’चा सामना करणार्यांना सततचा थकवा, निराशा, एकटेपण, मुलांपासून भावनात्मक अंतर वाढणं, मुलं थोडी मोठी असतील तर त्यांना सतत रागावणं, नात्यांमध्ये तणाव अशी लक्षणं जाणवतात. स्वतःच्याच क्षमतेवर विश्वास उरत नाही. आपण कमी पडतो आहोत, या भावनेनं ते ग्रासून जातात. मुलांची देखभाल करणंही कंपनीनं दिलेलं ‘टास्क’ वाटतं.
क्षमतेपेक्षा अधिक अपेक्षा केल्या जाणं, परिपूर्णतेचा आग्रह आणि सतत काम, यामुळं माणूस अशा अवस्थेला पोहोचतो, की सारं काही यंत्रवत करू लागतो. मग यंत्रात आणि माणसात फरक राहिलाच कुठे? यंत्राला मानवी मेंदू मिळाला, तरी मानवी मेंदू शिणत असेल तर कुठेतरी काहीतरी चुकतंय, हे मान्य करायला नको का? हे त्रासलेले पालक पुन्हा त्यांच्या मुलांकडून अशीच परिपूर्णतेची अपेक्षा करणार. स्पर्धेत जिंकण्याची सक्ती करणार. क्षमता न पाहता अपेक्षा करणार. म्हणजे, बालवयातच मुलं तणावग्रस्त होणार… पुढे तणाव वाटच पाहतोय!-हिमांशु चौधरी
Check Also
दिलासादायक माघार
केंद्र सरकारने बहुचर्चित ‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र