लेख-समिक्षण

आव्हाने नव्या प्रदेशाध्यक्षांपुढील

लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक जागा निवडून आल्यानंतर हवेत असलेल्या काँग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जोरदार आपटले. या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन नाना पटोले यांनी आपल्याला अध्यक्षपदावरुन मुक्त करावे, असे काँग्रेस नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांना त्यांच्या भेटी घेऊन सांगितले होते. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे लांबणीवर टाकले. दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेसने दिल्लीत एकही जागा न जिंकण्याची हॅट्ट्रिक केली. त्यामुळे काँग्रेसची उरली सुरली इज्जत धुळीला मिळाली. राज्यात आणि देशात सत्ता नसल्यामुळे कॉँग्रेस नेत्यांची तगमग सुरु झाली आहे. पदाधिकारी व कार्यकर्ते अन्य पक्षांच्या वळचणीला जात आहेत. माजी आमदारही आपल्या सोयीसाठी सत्ताधारी पक्षाचा मार्ग शोधत असल्याने प्रदेशाध्यक्षपदासाठी फारसे कोणी इच्छुक नसताना बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव चर्चेत नसतानाही घोषित झाले.
विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्याच्या तीन महिन्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाला नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी वेळ मिळाला. यावरुन पक्ष वाढवण्यासाठी नेतृत्वालाच किती काळजी आहे, हे स्पष्ट होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तेरा जागा मिळाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नेत्यांना आपण फार मोठे तीर मारल्यासारखे वाटत होते. वास्तविक पाहाता भाजपच्या विरोधात असलेली नकारात्मक मते आघाडीकडे वळली होती. त्याचा काँग्रेसला फायदा झाला. विधानसभा निवडणुकीत आघाडीतील तिन्ही पक्षांची तोंडे तीन दिशेला होती, त्यांच्यात समन्वय नव्हता. पटोले हे स्वबळावर लढण्याचे विधान करीत होते. परस्परांमधील विसंवादाचा फटका विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बसला. शेतकरी, कष्टकरी, कामगार, दलित, अल्पसंख्याक ही काँग्रेसची व्होटबँक होती. मात्र, सतत सत्तेत राहिलेल्या काँग्रेस नेत्यांना या घटकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांची पक्षाशी असलेली नाळ जोडून राहावे यासाठी प्रयत्न करावेसे वाटले नाही.
संघटनकौशल्य आज महाराष्ट्रासह देशातील कोणत्याही एका काँग्रेस नेत्यामध्ये नाही. अगदी सतरंज्या उचलण्यासाठीही काँग्रेसकडे कार्यकर्ते राहिले नाहीत. अशा मोठ्या आव्हानाच्या परिस्थितीत सपकाळ यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी आल्याने पक्ष वाढवण्याची त्यांच्यासमोर कसोटी आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने त्यामध्ये पक्षाला चांगले यश मिळवून देण्यासाठी कोणती जादू वापरणार आणि पराभवाची मालिका तोडून सपकाळ काँग्रेसला सुकाळ कधी आणणार, हे पाहावे लागेल. ओबीसीनंतर सर्वात मोठा वर्ग असलेल्या मराठा समाजातून काँग्रेसने सपकाळ यांना निवडल्याने निवडणुकीत काय फरक पडणार हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल. – प्रसाद पाटील

Check Also

दिलासादायक माघार

केंद्र सरकारने बहुचर्चित ‌‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026‌’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …