नातीगोती वगैरे खरोखर अस्तित्वात असतात, की गरज ठरवून त्यानुसार जोडली जातात? एकत्र कुटुंबपद्धतीपासून ‘सेल्फ मॅरेज’ म्हणजे स्वतःशीच लग्न करण्याच्या अजब निर्णयापर्यंत बरीच स्थित्यंतरं आपण पाहिली. या प्रवासात माणसाला अधिकाधिक एकटं आणि आत्मकेंद्री होताना आपण पाहिलं. शहरांकडे होणार्या स्थलांतरांमुळं सुरुवातीच्या काळात या विभक्तपणाचा आपण ‘अपरिहार्यता’ म्हणून स्वीकार केला. मग जास्तीत जास्त आमदनी आणि कमीत कमी जबाबदारी असणार्या नवश्रीमंतांची नवी जीवनशैली म्हणून आपण या प्रक्रियेत आपण रमलो. जगापासून तुटत जाताना जग जवळ आल्याचा आभास निर्माण करत राहिलो. जगाला आणि इतरांनाही फसवत राहिलो. परंतु मूलतः आपण स्वार्थी आणि स्वतःच्या पायापुरती वहाण कापणारेच होतो का? आपल्या मूलभूत अंतःप्रेरणा खरोखर काय होत्या? या प्रश्नांच्या जाळ्यात अधिकाधिक अडकत जावं, अशा घटना आपल्या आजूबाजूला- कधीकधी आपल्याच घरात- घडत राहिल्या. श्रावणबाळाची गोष्ट ऐकत लहानाचे मोठे झालेले आपण बापाच्या इस्टेटीसाठी भांडू लागलो. बापाच्या चित्याची आग शांत व्हायच्या आत घराच्या, जमिनीच्या, बँक बॅलन्सच्या वाटण्यांची चर्चा करू लागलो. मोठ्या कंपन्यांचे छोटे शेअर्स खरेदी करून स्वतःला ‘गुंतवणूकदार’ म्हणवून घेणारे आपण बापाच्या रक्तापासून आणि आईच्या दुधापासून अधिकाधिक दूर गेलो. बापाची जी काही स्थावर, जंगम मालमत्ता असेल त्यातला छोट्यात छोटा का होईना, हिस्सा ‘माझा’ झाला पाहिजे, ही आपली मोठ्ठी अॅम्बिशन!
इस्टेटीचं सोडा, बापाच्या मृतदेहात जर आपण वाटा मागू लागलो, तर जिवंतपणाचं कोणतं लक्षण आपल्यात उरलं? ही काही कपोलकल्पित कहाणी नाही. मध्य प्रदेशच्या टिकमगढ जिल्ह्यात घडलेली सत्यकथा आहे. एक म्हातारा बाप आपल्या धाकट्या मुलाबरोबर राहत होता. वयाच्या 84 व्या वर्षी त्याने इहलोक सोडला. त्याच्या पार्थिवाजवळ घरातले लोक शोक करत असतानाच त्याचा थोरला मुलगा आला. बापावर अंत्यसंस्कार करण्याचा ‘हक्क’ मागण्यासाठी तो चक्क दारू पिऊन आला. धाकटा म्हणाला, वडिलांवर मी अंत्यसंस्कार करावेत अशी त्यांची अंतिम इच्छा होती. थोरल्याला हे पटणं शक्य नव्हतं. वाद विकोपाला गेला आणि प्रकरण हमरीतुमरीवर आलं. तणाव वाढताना पाहून गावकर्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी आले तेव्हा त्यांनी विचित्र दृश्य पाहिलं. थोरला मुलगा वडिलांच्या मृतदेहाचा ‘अर्धा हिस्सा’ मागत होता. त्यांच्या शरीराचे दोन भाग करावेत, माझा मला द्यावा आणि मग आपण दोघे आपापल्या ‘हिश्शावर’ अंतिम संस्कार करू, अशी अट त्यानं ठेवली होती. पोलिसांनी कौशल्यानं परिस्थिती हाताळून थोरल्याची समजूत घातली आणि शांत करून त्याला घरी पाठवलं.
हे सगळं होईपर्यंत म्हातार्याच्या जाण्यानं व्यथित झालेल्यांचा रडण्याचा मूडही संपला होता. मृत्यूनंतर काही दिवस आत्मा आपल्या घराच्या आसपास राहतो आणि मग ‘अश्मा’बरोबर निघून जातो, असं सांगितलं जातं. हे खरं असेल तर म्हातार्याला केवढा शॉक बसला असेल! ‘हिस्सा’ हा व्हायरस केवळ मनुष्यप्राण्यालाच लागलाय आणि त्याच्यावर अजून लस निघालेली नाही. इतर प्राणी स्वतःची इस्टेटच करत नाहीत, त्यामुळं हिश्शाची भानगडच उद्भवत नाही. तरीही माणूसच प्राण्यांना पाळतो. त्यांच्याकडून काम करवून घेतो आणि त्याची विक्री केल्यानंतरही आपला हिस्सा मागतो!
Check Also
दिलासादायक माघार
केंद्र सरकारने बहुचर्चित ‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र