बाजार नियामक संस्था सेबीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान 93 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांना फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सरासरी 2 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झाले आहे. किरकोळ गुंतवणूकदांचं नुकसान तीन वर्षात वाढून 1.8 लाख कोटींवर पोहोचलं आहे. 4 लाख गुंतवणूकदारांना या काळात 28 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झालं आहे. अलीकडील काळात ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला लागून कर्जबाजारी झालेल्यांच्या, फसवणूक झालेल्यांच्या बातम्या नित्यनेमाने वाचायला मिळतात. याची कारणमिमांसा करणारा लेख.
र, माझ्या भावाने इंट्राडेमध्ये तीन लाख रुपयांचा लॉस केलाय. असा लॉस का होतो? अशा प्रकारचा प्रश्न आर्थिक साक्षरतेच्या कार्यक्रमात कॉलेजमधील युवावर्ग हमखास विचारतात. सध्याचा विचार करता कॉलेजमधील नवीन पिढी ही डे ट्रेडींग, इंट्राडे आणि शेअर ट्रेडिंगकडे जास्तीत जास्त आकर्षित होत आहे. पालकांकडून मिळणारा पॉकेटमनी हा या क्षेत्राकडे प्रवाही होत आहे. युवावर्गांना झटपट शीमंत व्हायचे असते. पण शेअर बाजाराविषयीचा त्यांचा अभ्यास कमी असल्यामुळे याविषयीचे समज कमी आणि गैरसमज जास्त असतात.
वास्तविक पाहता इंट्राडे, डे ट्रेडिंग आणि ट्रेडिंग क्षेत्रामध्ये स्पेक्युलेशन जास्त असते आणि गुंतवणूक कमी असते. युवकवर्गांची मानसिकता देखील झट मंगनी, पट ब्याह’ अशी असते. अशा मानसिकतेतून युवक-युवती शेयर बाजारातील या क्षेत्राकडे वळत आहेत. काही युवक वर्ग दररोज सकाळी शेअर बाजार सुरू होतो तेव्हा एखाद्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतात. पण बाजार बंद होतो, तेव्हा मात्र त्यांना आर्थिक फटका बसलेला दिसतो. याचे कारण वेगाने बाईक चालवणार्यांप्रमाणे त्यांचे वर्तन असते.
शेअर बाजारात गुंतवणूक क्षेत्राकडे वळणारा वर्ग हा परिपक्व विचारांचा असतो. एखादा शेअर खरेदी करणे म्हणजे खरेदी केलेल्या शेअर्सच्या कंपनीत मिळणार्या नफ्यातील मिळणारा लाभांश घेणे. त्या कंपनीचा मालकी हक्क त्या प्रमाणामध्ये घेणे असा याचा अर्थ असतो. शेअर्स गुंतवणुकीतील फायदे मिळवण्यासाठी तो शेअर खरेदी करीत असतो. जसे नफ्यातील लाभांश मिळविणे, बोनस शेअर मिळविणे इत्यादी. नवीन तरुण वर्गाला मात्र शेअर्समध्ये प्रवेश करीत असताना लाभ व लोभ यांच्यातील सीमारेषा समजलेली नसते. लाभ हा व्यावहारिक विचारांचा पगडा असतो; पण लोभ हा भावनिक विचारांचा पगडा असल्याने व्यावहारिक विचाराला गौण लेखले जाते. त्यामुळे या क्षेत्रात आर्थिक फटका बसू शकतो.
बरेच युवक इतरांकडून मिळालेल्या टिप्सचा आधार घेऊनच त्यावर जास्त विश्वास ठेवतात. असा वर्ग स्वतःचे नुकसान करून घेतो, कारण अशा वर्गांचा शेअर बाजाराचा अभ्यास कमी असतो. त्यातून तो लोभाच्या चक्रव्यूहात अडकत जातो.
वस्तुतः, शेअर ट्रेडिंग करीत असताना तांत्रिक विश्लेषण याचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये विविध प्रकारच्या चार्टस्चा आधार घ्यावा लागतो. त्यामध्ये मागील काही कालावधीत झालेल्या आर्थिक व्यवहारा संदर्भात, संबंधित शेअर्सचा डाटा संकलन केला जातो. हा कालावधी तीन, पाच, सात वर्षेअसा असू शकतो. भूतकाळात संबंधित शेअर्समधील किमतीमधील झालेल्या हालचालीवरून भविष्यात तो शेअर कशा प्रकारची वाटचाल करेल याचा अंदाज घेतला जातो. तशा प्रकारचा अंदाज काढला जाऊ शकतो. त्यासाठी आपण गोळा केलेला शेअर्सचा डाटा खरा असायला पाहिजे. कोणत्या टूल्सद्वारे त्याचे विश्लेषण करायचे आहे, ते तपासले पाहिजे. संकलन केलेल्या डाटाचे विश्लेषण सुयोग्य पद्धतीने करण्याची सवय असायला हवी. भूतकाळातील अशा डाटाद्वारे एखाद्या शेअर्सच्या किमतीमध्ये होणारी हालचाल कशा प्रकारची आहे? याचा अभ्यास करूनच भविष्यामध्ये त्यामधील होणारी हालचाल कशी होईल हे समजून घेणे गरजेचे असते. याचे आकलन करुन एखादा शेअर्स खरेदी करायचा किंवा विकायचा याचा निर्णय त्वरित घेता यायला हवा. त्यानुसार होणारे वर्तन हे शेअर ट्रेडिंगमध्ये होणारा नफा किंवा तोटा होऊ शकतो. यासाठी वापरले जाणारे टूल्स म्हणजे मुव्हिंग अॅव्हरेज, रेझिस्टन्स लेवल व सपोर्ट लेव्हल इत्यादी आहेत.
याखेरीज पायाभूत विश्लेषण याचा आधार घ्यावा लागतो. एखाद्या कंपनीचा शेअर्स विकत घेतल्यानंतर त्या कंपनीमध्ये होणार्या आर्थिक व्यवहाराचे प्रतिबिंब हे पायाभूत विश्लेषणात दिसते. कंपनीला एकूण किती ऑर्डर्स मिळाल्या, त्यात पेंडिंग किती स्वरूपाच्या आहेत, कंपनीचा सेल मागील पाच वर्षांपासून सातत्याने वाढत आहे का, किती टक्क्यांनी वाढत आहे, नफ्याचे प्रमाण किती आहे, त्यात लाभांश किती वाटप झालेला आहे, बोनस शेअर्स कंपनी किती वर्षातून दिले जाते, कर्जाचे व इक्विटीचे प्रमाण किती आहे, कर्ज कोणत्या प्रकारचे आहे, तारणरहित आहे की, तारणासह आहे, कर्जावरील व्याज व मुद्दल कंपनीला मिळणार्या कोणत्या उत्पन्नाच्या स्तोत्रातील आहे, मिळणार्या उत्पन्नातून भांडवली खर्चाकडे किती निधी वळविला जातो, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी होणारा खर्च किती आहे, एकूण खर्चामध्ये त्याचे प्रमाण किती आहे? इत्यादी बाबी तपासल्या जातात. याखेरीज कंपनीचा एक शेअर खरेदी करणार्या वर्गाला किती उत्पन्न मिळवून देतो, त्याची बुक व्हॅल्यू काय आहे, अर्निंग पर शेअर किती आहे, अशा प्रकारच्या असंख्य घटकांचा अभ्यास हा पायाभूत विश्लेषण करीत असताना होतो आणि तो कंपनीच्या आर्थिक व्यवहाराशी निगडित असतो. अशी सर्व माहिती कंपनीच्या वार्षिक अहवालामध्ये दिसत असते. त्याचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. त्यानंतरच आपणास ती माहिती तार्किक पद्धतीवर तपासून पाहावी लागते. त्यानंतर अशा कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची किंवा नाही हे समजते. या सर्व बाबी सकारात्मक दिसत असतील तर त्या समभागात दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास ती फायदेशीर ठरू शकते.
शेअर ट्रेडिंग करीत असताना अनेक युवक ओव्हर कॉन्फिडन्सने व्यवहार करीत असतात. असा वर्ग स्टॉप लॉस लावत नाही. त्यामुळे मर्यादित होणार्या तोट्याचे रूपांतर अमर्याद स्वरूप धारण करते. त्यातून आर्थिक फटका बसतो. या वर्गाचा एखादा शेअर कधी खरेदी करायचा किंवा विकायचा याचा गृहपाठ कमी असतो. इतरांनी दिलेल्या टिप्सवरच जास्त विश्वास ठेवल्याने त्याचा फायद्यापेक्षा तोटा जास्त होतो. टिप्स देणारा वर्ग हा कोणत्या मानसिकतेचा आहे ते तपासले जात नाही? बदलत्या काळामध्ये अशा युवक वर्गाकडून मिळणार्या पैशांद्वारे टिप्स देणारा वर्ग श्रीमंत झाला आहे. याउलट टिप्स घेणारा वर्ग मात्र तोटा सहन केल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. तोटा सहन करण्याची आपली कुवत किंवा क्षमता किती आहे, हे नवीन वर्ग तपासत नाही. शेअर ट्रेडिंग करीत असताना जोखीम किती प्रमाणात घ्यावी? कॅल्क्युलेटेड रिस्क कशी घ्यावी? हे त्यांना कमी अनुभवामुळे समजत नाही. याला अपवाद काही युवकांचा असू शकतो. मात्र मोठ्या प्रमाणावर डे ट्रेडिंग, इंट्राडे, नॉन -डिलिव्हरी बेस व्यवहार करणारा वर्ग बाईकवरच्या स्टंटबाजीप्रमाणे वर्तन करुन आर्थिक अपघात घडवून घेत आहे.
युवक असोत, गृहिणी असोत, नोकरदार असोत, व्यावसायिक असोत, हा वर्ग शेअर बाजारातून महिन्याला वीस पंचवीस हजार रुपये मिळवण्याच्या मानसिकतेतून प्रवेश करतो , परंतु प्रत्यक्षात तो याहीपेक्षा जास्त तोटा सहन करत असतो. यासाठी खर्या अर्थाने शेअर ट्रेडिंग, इंट्राडे यांच्या संकल्पना स्पष्ट असणे गरजेचे ठरते. त्यामुळे अशा व्यवहारातून सर्वांचा प्रवास हा नफ्याकडे जाऊ शकतो. – प्रदीप गुडसुरकर,शेअर बाजार विश्लेषक
Check Also
तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …
पांचजन्य वृत्तपत्र