मुलं उर्मटपणाने वागत असल्यास…

मुलगा किंवा मुलगी वयात येताना म्हणजेच कुमारवयीन मुलांच्या वागण्यात अचानक बदल होणे ही अनेक पालकांसाठी चिंतेची बाब ठरते. मुले प्रत्येक गोष्टीला उलट उत्तर देतात, मोठ्यांचा अनादर करतात किंवा एखादी गोष्ट मनाली की तीच मुद्दाम करतात, अशा तक्रारी पालकांकडून वारंवार ऐकायला मिळतात. या संवेदनशील विषयावर भाष्य करताना टीन बिहेवियर सायकॉलॉजिस्ट आणि पेरेंटिंग कोच पुष्पा शर्मा यांनी पालकांना दोन अत्यंत प्रभावी उपाय सुचवले आहेत.
त्यांच्या मते, या वयातील मुलांना धाकाने किंवा दबावाने सुधारण्याऐवजी त्यांच्याशी असलेले नाते सुधारणे हाच यावरचा खरा तोडगा आहे.
?किशोरवयीन मुलांच्या संगोपनाचे म्हणजेच ‌‘टीनएजर पेरेंटिंग‌’चे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यातील पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे ‌’कनेक्शन‌’. जोपर्यंत मुलाशी तुमचे भावनिक नाते किंवा संवादाचे माध्यम भक्कम नसते, तोपर्यंत त्यांच्या वागण्यात कोणताही बदल किंवा सुधारणा करणे शक्य नसते. दुसरे म्हणजे घरातील ‌’एनव्हायरनमेंट‌’ म्हणजेच वातावरण. जर घरातील वातावरण सतत टोमणे मारणे, मुलांची इतरांशी तुलना करणे किंवा त्यांच्यावर अवाजवी दबाव टाकणे असे असेल, तर मुले प्रतिक्रिया देणारच. अशा नकारात्मक वातावरणात मुले केवळ स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात आणि पालकांच्या बोलण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.
?त्यामुळे जर तुम्हाला मुलांनी तुमचे ऐकावे असे वाटत असेल, तर घरातील वातावरण शांत आणि आश्वासक ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांवर सतत दबाव टाकण्याऐवजी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करा आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण करण्यावर भर द्या. जेव्हा मुलांना घरात आपली मते मांडण्याची मोकळीक मिळते आणि पालक आपल्याला समजून घेतात याची खात्री पटते, तेव्हा त्यांच्या वागण्यातील आक्रमकता आपोआप कमी होते. कुमारवयीन मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी हाच सर्वात प्रभावी आणि शाश्वत उपाय असल्याचे पुष्पा शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

मोबाईलमधील बॅक टॅप फिचर

आपण स्मार्टफोन वापरताना स्क्रीनवर वारंवार वेगवेगळ्या गोष्टी शोधण्यासाठी आणि ॲप्स उघडण्यासाठी मोठा संघर्ष करत असतो. …