आजकाल शाळकरी मुले मैदानावर खेळण्यापेक्षा किंवा पालकांसमवेत फिरायला जाण्यापेक्षा घरातच मोबाईलवर खेळणे पसंत करतात. अर्थात काही मुले अपवाद असू शकतात, मात्र बऱ्याच ठिकाणी असेच चित्र पाहवयास मिळते. पूर्वी उन्हाळी सुटी आली की लहान मुलांना जादुचे प्रयोग, लहान मुलांसाठीचे चित्रपट, भटकंती यासारखे उपक्रम दिसायचे. आता जादूच्या प्रयोगाला मुलांपेक्षा पालकांचीच गर्दी अधिक दिसते. दुसरीकडे लहान मुलांचे चित्रपट टॉकीजवर लागतातच असे नाही आणि सोशल मीडिया व ओटीटीसारख्या प्लॅटफॉर्ममुळे मुलांना टॉकीजवर नेण्याची आवश्यकता राहिली नाही. परिणामी खास मुलांसाठीचे चित्रपट तयार होण्याची प्रक्रियाच मंदावली आहे. – सोनम परब
गीतकार गुलजार यांनी लोकप्रिय मालिका ‘जंगल बुक’मध्ये लिहलेले टायटल साँग ‘जंगल जंगल बात चली है पता चला है…’ हे आजही तीन दशकांनंतर तितकेच लोकप्रिय आहे. केवळ जंगल बुकचेच गीत नाही तर तत्कालिन काळात लहान मुलांसाठी अनेक चित्रपट आणि गाण्यांची निर्मिती झाली आणि आज तसे चित्र दिसत नाही. आजची अवस्था पाहिली तर गेल्या एक दीड दशकांत मुलांसाठी साकारलेल्या चित्रपटाचे नाव किंवा गाणे समोर येत नाही. परिणामी 1980-90 च्या दशकांतीलच गाण्यांची आणि चित्रपटांची वारंवार आठवण येते. गुलजार देखील सध्याच्या काळात मुलांसाठी पुरेशा प्रमाणात चित्रपट निर्मिती होत नसल्याचे सांगतात. तसेच अशा चित्रपटांना चित्रपटगृहे देखील उपलब्ध होत नाहीत, हे देखील तितकेच खरे.
गुलजार यांची चिंता खरोखरच विचार करण्यासारखी आहे. गेल्या काही वर्षांत मुलांसाठी चित्रपटांची निर्मिती असून नसल्यासारखीच राहिली आहे. सध्या देशात सुमारे एक तृतियांश लोकसंख्या अल्पवयीन असून चौदापेक्षा कमी वयोगटातल मुलांची संख्या तब्बल 25 टक्के असताना त्यांच्यासाठी छोटा चेतनसारखे चित्रपट तयार होत नाहीत, ही एक प्रकारची थट्टाच म्हणावी लागेल. मुलांसाठीचा चित्रपट हा तिकीटघरापासून ते आर्थिक गणीत मांडणाऱ्या टेबलवर कोठेच दिसत नाही. हे विचार करण्यासारखे आहे.
टिव्हीवर भडीमार, टॉकीजमधून हद्दपार
बॉलिवुडमध्ये मुलांसाठी चित्रपट येत नाहीत, असे नाही. थोडे मागे केले तर 2000 च्या दशकांत या दृष्टिकोनातून चित्रपटांची निर्मिती झाली आहे. मकडी, भूतनाथ यासारख्या रहस्यमय चित्रपटांनी मुलांचे मनोरंजन केले आहे. जजतरम ममंतरम आणि राजू चाचा यासारख्या काल्पनिक कथानक असलेल्या चित्रपटांनी मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना दिली. ‘द ब्लू अम्ब्रेला’सारख्या चित्रपटांनी संवेदनशीलता आणि नैतिक मुल्याचे धडे देखील दिले. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळवू शकले नाही, मात्र टिव्हीच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोचले. आय ॲम कलाम, स्टॅनली का डब्बा, चिल्लर पार्टी, माय फ्रेंड गणेशा, तारे जमीन पर याचा उल्लेख करता येईल. या चित्रपटांनी आशा पल्लवीत झाल्या, परंतु बॉलिवुड उदासिन का आहे? हे न समजण्यासारखेच आहे.
खरे कारण काय?
आता युट्यूब, नेटफ्लिक्स आणि गेमिंगने मुलांना मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे चित्रपटगृहात जाण्याची गरज राहिली नाही. चित्रपट निर्माते उमेश विनायक कुलकर्णी यांच्या मते, 2010 नंतर सिनेमाचे स्वरुप पूर्णपणे बदलून गेले. जागतिक पातळीवर मुलांसाठी एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती होत असताना ते भारतीय मुलांपर्यंत पोचतच नाहीत. यात सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे लहान मुलांचे मोबाईलच्या आहारी जाणे. रील्स आणि शॉट्सच्या काळात मुलांची एकाग्रता भंग पावत आहे. त्यामुळे दोन तीन तासांचा चित्रपट पाहण्यासाठी ते एकाजागी बसून राहण्याची शक्यता मावळत चालली आहे. शिवाय चांगल्या कंटेटचा अभाव आहे. मुलांसाठी चांगले कथानक असणारे चित्रपट येणे दुर्मीळ झाले आहे. मुलांचा विचार करत होणारी चित्रपट निर्मिती आता मागे पडत आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, महागड्या तिकीटामुळे पालक केवळ ब्रह्मास्त्र किंवा मार्वलसारख्या चित्रपटांवरच खर्च करू इच्छितात. ही मानसिकता बाल चित्रपटांसाठी चांगली नाही. काल्पनिक, सुपरहिरोच्या बाबतीत भारतीय मुलांना मार्वल आणि डिस्ने स्टुडिओ अधिक आकर्षित करतात. मोठे बजेट, उच्च तंत्रज्ञानामुळे भारतीय मुले स्वदेशातील कथानकावर तयार होणारे चित्रपट पाहण्यास फारसे उत्सुक नसतात.
संस्थेची उदासिनता
1955 मध्ये चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच सीएफएसआय नावाची संस्था ही कधीकाळी लहान मुलांच्या चित्रपटाचा कणा होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयार्तंगत काम करणाऱ्या या संस्थेने दहा भाषांत अडीचशेहून अधिक चित्रपट, ॲनिमेशन आणि लघुपटांची निर्मिती केली आहे. त्यांचा मुख्य उद्देश मुलांसाठी नवीन भारताचे मूल्य रुजविणे. ख्वाजा अहमद अब्बास, मृणाल सेन, श्याम बेनेगल, सई परांजपे, जहु बरुआ, ऋतूपर्ण घोष यासारख्या दिग्गजांनी लहान मुलांना केंद्रस्थानी ठेऊन चित्रपटांची निर्मिती केली. ईद मुबारक, चरणदास चोर (1975) सारख्या चित्रपटांत मुलांची जिज्ञासू वृत्ती आणि दृष्टिकोनाला गांभीर्याने हाताळले होते. आता या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती होताना दिसत नाही. यावर ‘सीएफएसआय’च्या माजी क्रिएटिव्ह हेड मोनिका वाहनी म्हणतात, 1990-2000 या काळात दरवर्षी सुमारे 70 लाख मुले ‘सीएफएसआय’चे चित्रपट पाहत असत. हे चित्रपट सिनेमागृहात नाही तर शाळा, जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालय आणि एनजीओमार्फत देशभरात दाखविले जायचे. आता ही पद्धत बंद झाली आहे. 1970 च्या दशकांत हाथी मेरे साथी, राणी और लालपरी, सफेद हाथी यासारख्या चित्रपटांची निर्मिती झाली. या चित्रपटांना मुलांनीच नाही तर कुटुंबांनी देखील पसंती दिली. चित्रपट इतिहासकार नोएल ब्राउन यांच्या मते, चित्रपट निर्मितीचा उद्देश निव्वळ मनोरंजनाचा होता. नैतिक शिक्षण देण्यापेक्षा हलकेफुलके विनोद सांगण्याचा हेतू होता. या कारणामुळेच या चित्रपटांचे वितरण चांगले व्हायचे. दुसरीकडे ‘सीएफएसआय’च्या चित्रपटांचे सादरीकरण हे मर्यादित कक्षेतच राहिले. पुढे त्याची व्याप्ती वाढलीच नाही.
मुलांना आवडतो परकी कंटेट
1990 च्या दशकांत केबल टिव्हीचे आगमन झाल्यानंतर भारतात परकी ॲनिमेशनची लाट आली. 2000 च्या दशकांत हनुमान चित्रपटाच्या यशाने मोठ्या स्टुडिओने या क्षेत्रात पाउल टाकले. मात्र रोडसाईड रोमिओ, छोटा भीमसारखे चित्रपट टिव्हीवर लोकप्रिय ठरलेले असताना टॉकीजवर अपयशी ठरले. याउलट परकी चित्रपटांचा बोलबाला राहिला. 2024 मध्ये मुफासा: द लायन किंगने 160 कोटीपेक्षा अधिक आणि जपानचे ॲनिमेशन डेमन स्लेयरने तब्बल 90 कोटी रुपयांची कमाई केली. वितरक अक्षय राठी यांच्या म्हणण्यानुसार, प्रेक्षक तर आहेत परंतु ते देशातील कथानकांऐवजी परकी कथानकाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे स्टार व्हॅल्यू आणि फायद्याच्या नादात मोठे स्टुडिओ आता केवळ फ्रंचाइजी किंवा भाषांतरित केलेल्या चित्रपटांना महत्त्व देत आहेत. त्यामुळे मुलांना केंद्रस्थानी ठेऊन चित्रपटांची निर्मिती करणे आजच्या काळात आव्हानात्मक ठरत आहे.
प्रादेशिक चित्रपटात मुलांना प्राधान्य
जर सध्या लहान मुलांचे चित्रपट चालत नसतील तर मणिपूरच्या लक्ष्मीप्रिया देवीचा चित्रपट ‘बोंग’ने जुटोपिया-2 आणि लिलो अँड स्टिचसारख्या मोठया चित्रपटाला मागे टाकत बाफ्टामध्ये सर्वोत्तम बाल आणि कौटुंबिक चित्रपटाचा पुरस्कार कसा मिळवला? विशेष म्हणजे हिंदी सिनेमाच्या उलट प्रादेशिक चित्रपटांकडून मुलांसाठी चांगले प्रयोग केले जात आहेत. मराठीत श्वास, फँड्री किंवा नाळ यासारख्या चित्रपटांनी गंभीर विषय मांडले. तर तमिळनाडूत काका मुट्टई चित्रपटाने झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन मुलांची पिझ्झा खाण्याची इच्छा दाखविली असून त्यातून आर्थिक विषमता जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटाने बारा कोटीपेक्षा अधिक कमाई केली. आज मुलांचे खरे चित्रपट हे झगमगाटापासून दूर असणाऱ्या मणिपूर, आसामसारख्या राज्यांबरोबरच महाराष्ट्र, केरळ आणि बंगालसारख्या राज्यांत जीवंत आहेत. तेथे कथानकात बालपण आणि जीवन यादरम्यान होणारा संघर्ष दाखविला जात आहे.
परदेशात काय स्थिती
चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या माजी क्रिएटिव्ह हेड मोनिका वाही यांच्या मते, युरोपात प्रामुख्याने स्कॅडिनेव्हिया देशातील मुलांच्या चित्रपटाला सरकार अणि खासगी संस्थांकडून निधी मिळतो. बर्लिनसारख्या मोठ्या चित्रपट महोत्सवात देखील मुलांच्या चित्रपटांसाठी वेगळी श्रेणी ठेवली आहे. याउलट भारतात मिळणारी मदत मर्यादितच आहे. 1995पासून गोल्डन एलिफंट बाल चित्रपट महोत्सव हा 2019 नंतर बंद झाला. 2022 मध्ये . ‘सीएफएसआय’ला ‘एनएफडीसी’त सामील केले. आज मात्र या संस्थेचे संकेतस्थळ सुलभ आहे ना, बंद पडलेल्या . महोत्सवाबाबत कोणतिही स्पष्टता नाही.
Check Also
‘बंटवारा’साठी आमीरचा पुढाकार
आमिर खान, सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या बहुप्रतीक्षित ‘लाहोर 1947’ या चित्रपटाच्या शीर्षकात …
पांचजन्य वृत्तपत्र