लेख-समिक्षण

सशस्त्र दलांतील महिलाराज

अलीकडेच भारतीय सशस्त्र दलांच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद घटना घडली. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) पहिल्या महिला तुकडीतील 14 कॅडेटस्‌‍नी कठोर प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्कर आणि हवाई दलात अधिकारी म्हणून प्रवेश मिळवला. महिला सक्षमीकरण, लैंगिक समानता आणि राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारतीय सैन्य व्यवस्थेतील हा बदल केवळ एका संस्थेपुरता मर्यादित नसून देशातील सामाजिक परिवर्तनाचेही प्रतीक आहे.
डेहराडून येथील भारतीय लष्करी अकादमी आणि हैदराबाद येथील हवाई दल अकादमीमध्ये झालेल्या पासिंग आऊट परेडनंतर एकूण 746 कॅडेटस्‌‍ना अधिकृतपणे भारतीय सशस्त्र दलात नियुक्ती देण्यात आली. यामध्ये 14 महिला कॅडेटस्‌‍चाही समावेश होता. यापैकी नऊ जणी भारतीय लष्करात तर पाच जणी भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून रुजू झाल्या. विशेष म्हणजे, राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रवेश मिळालेल्या पहिल्या महिला तुकडीतील या अधिकारी आहेत.
चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर महिलांसाठी एनडीएचे दरवाजे खुले झाले. त्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये महिला कॅडेटस्‌‍च्या पहिल्या तुकडीला प्रवेश देण्यात आला. तीन वर्षांच्या अत्यंत कठोर शैक्षणिक आणि लष्करी प्रशिक्षणानंतर या कॅडेटस्‌‍ पदवीधर झाल्या. त्यानंतर लष्कर आणि हवाई दलातील विशेष प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी अधिकारी पद मिळवले. हा प्रवास महिलांच्या जिद्दीचा, शिस्तीचा आणि क्षमतेचा पुरावा मानला जातो.
या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या महिला अधिकाऱ्यांना थेट स्थायी आयोग मिळाला आहे. यापूर्वी महिलांना प्रामुख्याने शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातूनच सैन्यात प्रवेश मिळत असे. स्थायी आयोगामुळे महिलांना पुरुष अधिकाऱ्यांप्रमाणेच दीर्घकालीन सेवा, पदोन्नती आणि नेतृत्वाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे भारतीय सशस्त्र दलांमधील लैंगिक समानतेच्या दिशेने हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.
भारतीय लष्करी अकादमीच्या 94 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला कॅडेटस्‌‍नी पुरुष कॅडेटस्‌‍सोबत अंतिम उद्दिष्ट साध्य करत अधिकारी म्हणून सैन्यात प्रवेश केला. हा क्षण केवळ त्या नऊ महिलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा ठरला. महिलांच्या वाढत्या सहभागामुळे सशस्त्र दलांचे स्वरूप अधिक समावेशक आणि आधुनिक बनत असल्याचे यावरून दिसून येते. गेल्या काही वर्षांत भारतीय सैन्य दलांमध्ये महिलांची भूमिका सातत्याने विस्तारत आहे. प्रजासत्ताक दिन संचलनाचे नेतृत्व करण्यापासून ते संवेदनशील लष्करी मोहिमांमध्ये सहभाग घेण्यापर्यंत महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. भारतीय नौदलानेही अलीकडच्या काळात प्रथमच महिला खलाशांना सेवेत सामावून घेतले. आज लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही शाखांमध्ये महिलांचे स्वागत अधिक खुलेपणाने केले जात आहे.. 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याची ऐतिहासिक घोषणा केली. त्यानंतर हजारो मुलींना लष्करी शिक्षण आणि करिअरच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. पूर्वी महिलांना केवळ वैद्यकीय शाखांपुरते मर्यादित ठेवले जात होते; मात्र आज त्या नेतृत्वाच्या भूमिकेतही पुढे येत आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या यशाबद्दल बोलताना महिलांना पुरुषांप्रमाणे समान संधी मिळणे हे विकसित आणि प्रगत भारताचे लक्षण असल्याचे नमूद केले होते. भारतीय महिला आज देशाच्या विकासात, सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्माणात खांद्याला खांदा लावून योगदान देत आहेत. एनडीएच्या पहिल्या महिला तुकडीचे यश हे केवळ एका प्रशिक्षणक्रमाचे यश नाही, तर भारतीय समाजातील बदलत्या विचारसरणीचे, महिलांच्या वाढत्या आत्मविश्वासाचे आणि समानतेकडे वाटचाल करणाऱ्या भारताचे प्रभावी प्रतीक आहे. – विशाखा पाध्ये

Check Also

निर्वाळ्याचा अन्वयार्थ

विशेष मतदार यादी पडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया कायदेशीरदृष्टया वैधच आहे, असा निर्वाळा अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिला. …