पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरोधात षडयंत्र पूर्णत्वास नेण्यात आले, त्याला आठवडाही होत नाही, तोच महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी करण्यात आले. पॅटर्न तोच होता. आधी पक्षातून फुटायचे, मग बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन संसदेत स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची मागणी करायची आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लगेच या गटाला वेगळा गट म्हणून मान्यता द्यायची. तीच स्क्रिप्ट मालकाने सांगीतल्याप्रमाणे ठाकरे गटातून फुटून बाहेर पडलेल्या सहा खासदारांच्या गटाला वेगळा गट म्हणून मान्यता दिली.
2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेसेनेचे नऊ खासदार निवडून आले होते. त्यामधील सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. वेगळा गट स्थापन करणाऱ्यांमध्ये संजय जाधव (परभणी), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), संजय दिना पाटील (उत्तर-पूर्व मुंबई) आणि ओमराजे निंबाळकर (धाराशिव) यांचा समावेश आहे. ठाकरेसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या सहा खासदारांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, हे फुटलेले खासदार शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेना पक्ष फुटीच्या धक्क््यातून सावरलेल्या उद्धव ठाकरे यांना आणखी एकदा मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राजकीय भूकं प झाला आहे. सात खासदारांपैकी आधी दोन खासदार दिल्लीतही पोहोचले. लगेच रात्री शिवसेना (शिंदे)चे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील दिल्लीत दाखल झाले. हे माहिती पडल्यावर, पक्षात होत असलेली ही मोठी फूट रोखण्यासाठी खासदार अनिल देसाई आणि खासदार संजय राऊत हे दिल्लीत दाखल झाले. तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी रविवारी पक्षातील खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला पाच खासदार अनुपस्थित होते. त्यावेळीच खासदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
ठाकरेसेनेत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत राहिलेले खासदार अरविंद सावंत, खा. अनिल देसाई आणि खा. राजाभाऊ वाझे यांनी खा. संजय राऊत यांच्यासोबत मिळून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना (ठाकरे)तून फुटून बाहेर पडलेल्या खासदारांच्या गटाला वेगळा गट म्हणून मान्यता देऊ नका. केवळ एखादा पक्षच दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो; एखाद्या गटाचे कोणत्याही पक्षात विलीनीकरण होण्याबाबत कोणतीही तरतूद नाही. नियमानुसार निर्णय घेण्यात यावा. तसेच आमची बाजू ऐकून घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना केली. मात्र, हा डॅमेज कंट्रोल सुरू असतानाच एक दावा केला जात आहे, ज्यात खा. राऊत यांच्या पत्रकार परिषदेला हजर असलेल्या उर्वरित तीन खासदारांपैकी सातवा खासदारही लवकरच शिंदे गटात जाणार आहे. हा खासदार गेल्या 3 महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार होता. सर्व काही निश्चित झाले होते, परंतु काही अत्यंत महत्त्वाच्या ‘वैयक्तिक अडचणींमुळे’ त्या खासदाराचा प्रवेश ऐनवेळी रखडला होता. आता त्या अडचणी दूर होत आल्या असून येत्या दोन ते तीन महिन्यांत हा ‘सातवा’ खासदार अधिकृतपणे शिंदे गटात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.
दिल्लीत महत्त्वाची बैठक आयोजित करून शिवसेनेने बुधवारी सर्व खासदारांना व्हीप जारी केला. पक्षाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना दिल्लीत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असताना या राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य विलीनीकरणासाठी आवश्यक असलेल्या पत्रावर अद्याप सर्व सह्या झालेल्या नाहीत. विशेषत: खासदार संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्या सह्या अंतिम पत्रावर नसल्याने संपूर्ण प्रक्रिया सध्या थांबली असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या 20 बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची मागणी केली. या बंडखोर खासदारांनी एनडीएला पाठिंबा देण्याची घोषणाही केली. ठाकरेसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या सहा खासदारांनीदेखील एनडीएला पाठिंबा देण्याची घोषणाही केली आहे.
Check Also
आघाडीची धडपड
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने आणि त्या पक्षावर अजूनही गांधी परिवाराचीच हुकूमत असल्याने हा पक्ष …
पांचजन्य वृत्तपत्र