ये रे ये पावसा…

सुमारे तीन महिन्यांच्या अत्यंत कडक अशा उन्हाळी हंगामानंतर केवळ धरतीच नव्हे तर धरतीवर राहणारे सर्व प्राणिमात्र चातक पक्ष्याप्रमाणे आता पावसाची प्रतीक्षा करत आहेत. सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये भारतामध्ये मान्सूनचा हंगाम सुरू होत असला, तरी यावर्षी एल निनो परिणामामुळे काही प्रमाणात मान्सूनची वाटचाल संथ झाल्याने पावसाचे थेंब पडण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय हवामान खात्याने मान्सूनबाबत जे विविध अंदाज व्यक्त केले त्यामध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेले.
अल निनोची टांगती तलवार कायमची हटवायची असेल तर जलसंधारण, जलवितरण, पाणीवापर, सिंचनव्यवस्था, पीकपद्धती, नागरी जलव्यवस्थापन, भूजल व्यवस्थापन या सर्वांबाबत काटेकोर धोरण आखून त्याची गतिमान व पारदर्शक अमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, मागेल त्याला शेततळे यांसारख्या योजनांच्या माध्यमातून याबाबत सक्रिय पुढाकार घेतलेला आहे. पण येऊ घातलेल्या संकटाचा आकार महाकाय आणि बिकट आहे. त्याचा सामना सरकार, सामाजिक संस्था आणि नागरिक या सर्वच घटकांनी सामूहिकपणाने करायला हवा.
1877-78 मध्ये आलेला अल निनो हा मानवी इतिहासातील सर्वांत भीषण हवामान बदलांपैकी एक मानला जातो. या काळात प्रशांत महासागराचे तापमान असामान्यपणे वाढल्याने भारत, चीन, ब्राझील आणि आफ्रिकेत भीषण दुष्काळ पडून जगभरात अंदाजे 3 ते 5 कोटी लोकांचा म्हणजेच तत्कालीन जागतिक लोकसंख्येच्या सुमारे 4 टक्के नागरिकांचा मृत्यू झाला होता.
आता ताज्या अंदाजाप्रमाणे, भारतामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे. सर्वसाधारणपणे 100% पेक्षा जास्त पाऊस पडला तर पावसाळी हंगाम चांगला झाला असे मानले जाते. पण हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे यावेळी 90% ते 92 टक्केच पाऊस होणार असल्याने एक नवी चिंतेची परिस्थिती आगामी कालावधीमध्ये निर्माण होणार आहे.
मुळात मान्सून उशिरा सुरू होणार आहे आणि जो काही पावसाचा हंगाम आहे त्याचा कालावधीही कमी असणार आहे आणि एकूण पावसाचे प्रमाणही नेहमीपेक्षा कमी असल्याने पावसावर अवलंबून असलेल्या आपल्या कृषी अर्थव्यवस्थेसमोर अनेक संकटे निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. अनेक वर्षांनंतर मान्सूनचा अंदाज सरासरीपेक्षा कमी असल्याने सरकारी यंत्रणांना हा अंदाज खरा ठरेल हे गृहीत धरूनच आगामी कालावधीसाठी नियोजन करावे लागणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली होती आणि तब्बल पाच महिने पावसाळी हंगाम सुरू होता. त्यावेळी लोक कधी एकदा पाऊस संपतो अशी प्रार्थना करत होते. यावेळी मात्र कधी एकदा पाऊस सुरू होतो अशी प्रार्थना करण्याची वेळ आली आहे. राज्यातील विविध धरणे कोरडी पडली आहेत.
पाणीपुरवठा करणारे जलाशय आणि तलावांनीही पातळी गाठली आहे. कोयना धरणासारखी मोठी धरणे ज्यांना महाराष्ट्राची वरदायिनी म्हटले जाते, त्या धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे वीजनिर्मितीवरही परिणाम होऊ लागला आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक प्रमुख राज्यांमध्ये ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यांपासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उष्णतेची तीव्रता अद्यापही कायम असल्याने याबाबतही चिंताजनक परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्याचा एकमेव उपाय म्हणजे वेळेवर पावसाळी हंगाम सुरू होणे हाच आहे. पण ते कोणाच्याही हातात नाही. अर्थात, गेल्या अनेक वर्षांमध्ये मानवजातीने पर्यावरणाचे आणि निसर्गाचे जे नुकसान केले आहे त्याचा परिणाम म्हणूनच आता पर्यावरणाचे गणित बदलत चालले आहे. म्हणूनच यावर्षी पावसाळी हंगाम उशिरा सुरू होणार आहे आणि पावसाचे एकूण प्रमाणही कमी असणार आहे.
सर्वसाधारणपणे नैसर्गिक रचना अशी असते की चार महिन्यांच्या पावसाळी हंगामामध्ये जे पाणी उपलब्ध होते ते वर्षभर पुरण्याची यंत्रणा निसर्ग स्वतःच राबवत असतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये पावसाळी हंगाम अनियमित झाला आहे. क्वचितच सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीचा अपवाद वगळता जून आणि जुलै या दोन महिन्यांमध्ये नेहमीच पावसाने ओढ दिली आहे. शेती कामे करण्यासाठी जेव्हा पाऊस होणे आवश्यक असते तेव्हा तो न पडता नंतरच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी होते, पण त्या पावसाचा शेतीसाठी काहीच उपयोग नसतो, असेही गेल्या काही वर्षांमध्ये दिसून आले आहे. अर्थात, निसर्गाचा हा लहरीपणा लक्षात घेता सरकारला सर्वसामान्यांचे जीवन सुखकर होईल याबाबत धोरण राबवावेच लागणार आहे. पाणी म्हणजेच जीवन हा केवळ एखादा शब्द प्रयोग किंवा म्हण नसून खऱ्या अर्थाने एक व्यावहारिक आणि वास्तव आहे. जर नजीकच्या कालावधीमध्ये पावसाचे गणित बिघडले तर सरकारला नियोजनबद्ध पद्धतीने पावले उचलून येणाऱ्या संकटाला तोंड द्यावेच लागणार आहे. आतापर्यंत या देशाने दुष्काळी परिस्थिती पाहिली नाही असे नाही, पण या दुष्काळी परिस्थितीने अर्थव्यवस्थेचे जे गणित बिघडवून टाकले होते तेसुद्धा सर्वांनी अनुभवलेले आहे. साहजिकच भारतीय हवामान खात्याने यावेळी सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला असल्याने सरकारला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. सर्वसाधारणपणे हवामान खात्याचे अंदाज चुकतात, अशी एक विनोदी टीका नेहमी केली जाते. यावेळी हवामान खात्याचे अंदाज चुकावेत आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस व्हावा अशीच प्रार्थना सर्वसामान्य नागरिक करत असावेत. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये असह्य उन्हाळी हंगामाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा पावसाळी हंगाम लवकरात लवकर सुरू होईल आणि निसर्गाचे चक्र नेहमीच्याच वेळापत्रकाप्रमाणे धावत राहील अशीच आशा आता करावी लागणार आहे.-रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

Check Also

कर्नाटकातील खांदेपालटाचा अन्वयार्थ

कर्नाटकामध्ये अखेर सत्तापालट झाला असून सिद्धरामैया यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदीर्घ ओढाताण आणि पक्षाच्या …