देशाची राजधानी दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात हौज रानी भागात आज बुधवारी सकाळी एका हॉटेलला भीषण आग लागली. या आगीमुळे 21 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 37 हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये बहुसंख्य परदेशी नागरिक आहेत. या आगीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. आग एवढी भयानक होती की, काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीला आगीच्या ज्वाळांनी लपेटले होते. यामुळे हॉटेलमध्ये उपस्थित नागरिकांची पळापळ झाली. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने मदत केली.
मालवीय नगर या उच्चभ्रू भागात असलेल्या पाच मजली हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये काही क्षणातच आगीचे लोळ वरच्या दिशेने गेले आणि संपूर्ण इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. अचानक आगीचे लोळ आणि धुराचे लोट बघून लोकांनी जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. काही वरच्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या. तर काही जीव वाचवण्यापूर्वीच आगीच्या जबड्यात सापडले आणि होरपळून मेले. आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये काही परदेशी पर्यटकही उपस्थित होते. या हॉटेलचे नाव फ्लोरिस्ट इन असे असून ही पाच मजली इमारत आहे. या इमातीत जवळपास 25 खोल्या आहेत. दुर्घटनेवेळी 40 हून अधिक लोक हॉटेलमध्ये होते. या आगीच्या दुर्घटनेतून 35 लोकांना वाचवण्यात आले आहे. त्यात काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. रेस्टॉरंटला आग लागल्यानंतर अनेक व्हिडिओ समोर आले, ज्यातून लोक जीव वाचवण्यासाठी रेलिंगमधून उडी मारताना दिसत होते. आगीमुळे सर्वत्र धूर पसरला होता. बेसमेंटमध्ये अनेक लोक अडकले होते. ते बाहेर येण्याच्या गेटवर कुलूप लावले होते. जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहचले, त्यांनी हे कुलूप तोडून रेस्क्यू ऑपरेशन केले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी मालवीय नगर येथे लागलेल्या आगीच्या घटनेत बचाव आणि मदतकार्यात सहभागी असलेले दिल्ली पोलिसांचे 10 जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जवानांपैकी पाच हेड कॉन्स्टेबल आणि पाच कॉन्स्टेबल आहेत. हे जवान जळत्या इमारतीच्या आवारात सर्वप्रथम पोहोचले होते. त्यांच्यावर एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीच्या दुर्दैवी घटनेची माहिती सकाळी 10 च्या सुमारास मिळाली. हॉटेलच्या रेस्टॉरंटमधील आचाऱ्याने सांगितले की, तो सकाळी 8 च्या सुमारास इलेक्ट्रिक शेगडी पेटवण्याचा प्रयत्न करत होता. पण अचानक आगीचा भडका उडाला. हॉटेलच्या तळघरातील स्वयंपाक घरात आग आधीच लागली होती. बघता बघता या आगीने संपूर्ण इमारतीला विळख्यात घेतले. तेथे युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु झाल्यावर 37 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयता दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आग विझवण्यात आली असून हॉटेलच्या खोलांची तपासणी केली जात आहे.
दिल्लीतील मालवीय नगरमध्ये ही हॉटेल-रेस्टॉरंट असून, त्याच्या बाजूलाच एक मोठे रुग्णालयही आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणारे हॉटेलमध्येच थांबतात. घटना घडली त्यावेळी हॉटेलमध्ये परदेशी पर्यटकही थांबलेले होते. सकाळी 9.30 वाजता जेव्हा हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांनी आगीचे लोळ बघितले. आगीचे तीव्रता लक्षात घेऊन आजूबाजूच्या लोकांनी घरातून गाद्या आणून रस्त्यावर अंथरल्या आणि त्यावर हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील लोकांनी उड्या मारल्या. पण, काही जणांनी खूप उंचावरून उड्या मारल्याने अनेक जण रस्त्यावर पडले. यात काही जणांचे हात-पाय मोडले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपले दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी लिहिले की, दिल्लीतील मालवीय नगर येथे लागलेल्या आगीच्या घटनेत झालेली जीवितहानी अत्यंत दु:खद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या मन:पूर्वक संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे. पीएमएनआरएफ प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत देईल. जखमींना 50,000 रुपये मिळतील.
Check Also
कर्नाटकातील खांदेपालटाचा अन्वयार्थ
कर्नाटकामध्ये अखेर सत्तापालट झाला असून सिद्धरामैया यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदीर्घ ओढाताण आणि पक्षाच्या …
पांचजन्य वृत्तपत्र