रेल्वे दुर्घटनांची न संपणारी कहाणी

भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानले जाते. दररोज कोट्यवधी नागरिक या यंत्रणेवर विश्वास ठेवून प्रवास करतात. केंद्र सरकारकडून सध्या भारतीय रेल्वेला जागतिक दर्जाचे बनवण्याचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्याचे मोठे दावे केले जात आहेत. वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या रुळांवर धावत आहेत. मात्र, या चकचकाटाच्या मागे प्रवाशांच्या मूलभूत सुरक्षेचा प्रश्न कमालीचा गंभीर बनत चालला आहे. नुकत्याच देशाच्या विविध भागांत घडलेल्या रेल्वे दुर्घटना रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर आणि सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवणाऱ्या आहेत.गतसप्ताहात अवघ्या दोन दिवसांत देशात तीन वेगवेगळ्या रेल्वे दुर्घटना समोर आल्या आहेत. बिहारमधील सासाराम स्थानकावर उभ्या असलेल्या एका प्रवासी गाडीच्या डब्याला भीषण आग लागली आणि संपूर्ण डबा जळून खाक झाला. दुसरी घटना उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे घडली, जिथे रूळ बदलताना उज्जैनी एक्सप्रेस रुळावरून घसरली. त्यापूर्वी मध्य प्रदेशातील रतलाम येथे राजधानी एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या अपघातांनी रेल्वे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. प्रत्येक अपघातानंतर चौकशीचे सोपस्कार पार पाडले जातात, मात्र त्यातून ठोस धडा घेतला जात नसल्याचेच चित्र आहे.सासाराम येथील आगीच्या घटनेने रेल्वेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाचे वाभाडे काढले आहेत. आग लागली तेव्हा स्थानकावर कोणतीही ठोस अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नव्हती. रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी असलेल्या पाइपलाइनमधून तातडीने पाणी मिळू शकले नाही आणि स्थानकावर ठेवलेले अग्निशामक सिलेंडरही रिकामे होते. तंत्रज्ञानाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असताना, स्थानकांवर साधे अग्निशामक सिलेंडरही सुस्थितीत नसावे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ही विभागीय पातळीवरील अक्षम्य हेळसांड आहे.दुर्दैवाची गोष्ट अशी की, अशा अपघातांवर केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते. दोषींवर नावापुरती कारवाई होते आणि चौकशीचे निष्कर्ष कधीही सार्वजनिक केले जात नाहीत. रेल्वे बोर्डासाठी प्रवाशांची सुरक्षा सर्वोपरी असल्याचा दावा केला जात असला, तरी व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याबाबत गांभीर्य दिसत नाही.रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करायचा असेल, तर केवळ आधुनिक गाड्या सुरू करून चालणार नाही. जोपर्यंत रेल्वेच्या पायाभूत सुविधा भक्कम केल्या जात नाहीत, स्थानकांवरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली जात नाही आणि प्रत्येक स्तरावर अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जात नाही, तोपर्यंत सुरक्षित प्रवासाची अपेक्षा करणे फोल ठरेल. प्रशासनाने आता तरी जागे होऊन कागदी दाव्यांपेक्षा प्रत्यक्ष जमिनीवरील सुरक्षा उपाय वाढवण्यावर भर दिला पाहिजे.- राकेश माने

Check Also

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ची वर्षपूर्ती

पहलगाम येथे झालेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना, त्याविरुद्ध भारताने केलेल्या ‌‘ऑपरेशन …