कहाणी ‌‘केंट‌’ काराची

केंट कंपनीचे प्रमुख डॉ. महेश गुप्ता यांच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात एका घरगुती समस्येतून झाली. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात दूषित पाणी प्यायल्यामुळे त्यांच्या मुलांना कावीळ झाली. स्वतः आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतलेले असल्याने, डॉ. गुप्ता यांनी या आजारपणाच्या मूळ कारणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. बाजारात उपलब्ध असलेल्या यंत्रांचा अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, विरघळलेले हानिकारक घटक आणि जड धातू पूर्णपणे वेगळे करण्यास ती असमर्थ ठरत आहेत.
त्या वेळी त्यांनी थेट अमेरिकेतून वॉटर प्यूरीफायरसाठी लागणारे सुटे भाग मागवले आणि आपल्या राहत्या घरीच पहिले आरओ यंत्र स्वतः तयार केले. हे यंत्र अत्यंत यशस्वी ठरले आणि मुलांची प्रकृती सुधारली. या यशानंतर ज्या तंत्रज्ञानाने त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण केले, त्याची गरज देशातील करोडो कुटुंबांना आहे, या विचारातून ‌‘केंट आरओ‌’ची पायाभरणी झाली.
आयआयटी कानपूरमधून पदवी घेतल्यानंतर डॉ. महेश गुप्ता हे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या प्रतिष्ठित सरकारी कंपनीत वर्ग-1 चे अधिकारी म्हणून कार्यरत होते. एक सुरक्षित भविष्य आणि उत्तम वेतन असलेली ही नोकरी सोडून व्यवसायात उतरणे अत्यंत जोखमीचे होते. परंतु, त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि अवघ्या 20,000 रुपयांच्या किरकोळ पुंजीसह या व्यवसायात पदार्पण केले. सुरुवातीचे सलग सहा महिने त्यांना सातत्याने तांत्रिक अपयशाचा सामना करावा लागला. परंतु, पराभवाचा स्वीकार न करता त्यांनी आपले तांत्रिक संशोधन सुरूच ठेवले आणि अखेर जलशुद्धीकरणाचा अचूक फॉर्म्युला शोधण्यात यश आले.
सुरुवातीला या उत्पादानची किंमत जास्त असल्याने त्यांनी ती टीव्ही आणि फ्रिज विकणाऱ्या मोठ्या कन्झ्युमर ड्युरेबल्स शोरूम्समध्ये प्रदर्शनासाठी ठेवली. महागड्या घरगुती उपकरणांच्या शेजारी या यंत्राचे सादरीकरण केल्यामुळे ग्राहकांचा दृष्टिकोन बदलला आणि विक्री वाढली.
आज केंट ही कंपनी केवळ वॉटर प्यूरीफायर पुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिने स्मार्ट किचन अप्लायन्सेस आणि वेलनेस उत्पादनांच्या बाजारपेठेतही आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, वित्त वर्ष 2025 मध्ये कंपनीने तब्बल 1260 कोटी रुपयांच्या महसुलाची (रेव्हेन्यू) नोंद केली आहे. अवघ्या 20 हजार रुपयांमधून सुरू झालेला हा प्रवास आजच्या तरुण उद्योजकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

Check Also

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ची वर्षपूर्ती

पहलगाम येथे झालेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना, त्याविरुद्ध भारताने केलेल्या ‌‘ऑपरेशन …