महाराष्ट्र हा संतांचा, समाजसुधारकांचा आणि क्रांतीकारकांचा देश म्हणून ओळखला जातो. ज्या मातीने देशाला विज्ञानाची कास धरायला शिकवली आणि अंधश्र्द्धेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र कायदा केला त्याच मातीत आज तंत्र-मंत्र, अघोरी विद्या आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण करणारी ‘कॅप्टन’ अशोक खरातसारखी प्रवृत्ती फोफावते, ही बाब राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्राने नेहमीच प्रबोधनाची मशाल हातात धरली आहे, पण खरातच्या या प्रकरणाने दाखवून दिले आहे की, अंधाराचे काही कोपरे अजूनही तसेच उरले आहेत. ते दूर करायचे असतील तर सर्वांत आधी समाजातील तथाकथित प्रतिष्ठित आणि धनाढ्य व्यक्तींनी अशा बुवाबाजीला थारा देणे थांबवायला हवे.
राजकारणीच नव्हे तर पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खरातने सुमारे पाच कोटी रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले. मानवी मनातील मृत्यूच्या भीतीचा वापर करून एखाद्या व्यक्तीला कशा प्रकारे कंगाल केले जाऊ शकते, याचे विदारक उदाहरण म्हणून या प्रकरणाकडे पाहायला हवे. खरातने संबंधित बिल्डरला एका बनावट सापाचा धाक दाखवला होता. जर माझ्या सूचनांचे पालन केले नाही, तर नागदेवता कोपेल आणि सर्पदंशाने तुझा मृत्यू होईल, अशी भीती त्याने सदर व्यक्तीच्या मनात बसवली होती. या भीतीपोटी तक्रारदाराने खरातला एक आलिशान मर्सिडीजबेंझ कार घेऊन दिली. इतकेच नव्हे, तर ‘फिलॉसॉफर्स स्टोन’ ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते अशी आख्यायिका आहे , असा दगड मिळवण्यासाठी जगातील 21 देशांचा प्रवास करणे आवश्यक असल्याचे खरातने सांगितले. या प्रवासाचा संपूर्ण खर्च त्या विकसकाला सोसावा लागला.
नाशिकमधील स्वयंघोषित महाराज आणि ज्योतिषी अशोक खरात याचे नाव सध्या सबंध राज्यभरात चर्चेत आले आहे. विशेषतः राजकीय वर्तुळात खरातच्या दररोज समोर येणाऱ्या ‘फाईल्स’नी खळबळ उडवून दिली आहे. निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकारी असल्याचे सांगत स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या 67 वर्षीय खरातने श्रद्धेच्या नावाखाली भीतीचा एक अवाढव्य व्यापार मांडला होता. या व्यापारामध्ये प्रचंड मोठे अर्थकारण तर दडलेले होतेच; पण त्याबरोबरच स्वतःची कामवासना शमवण्यासाठीची शोषणव्यवस्थाही तयार झाली होती. मागील काळात आसाराम बापूसारख्यांची प्रकरणे देशभरात गाजली होती. त्यांना मानणारा जनसमुदाय मोठा असल्याने अनेक वर्षेत्यांच्याकडून भक्ती आणि अध्यात्माच्या नावाखाली होणारे लैंगिक शोषणासारखे गुन्हे दबून राहिले. खरात हा प्रवचनकार, साधू नसल्याने त्याचा भक्तसंप्रदाय नसला तरी राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांना त्याने आपल्या कौशल्याने मोहीत केले होते. भविष्य सांगणे, अंकशास्त्र आणि आपल्याकडे असलेल्या तथाकथित दैवी शक्तीचा वापर करून त्याने समाजातील सर्व स्तरांतील लोकांना भुरळ घातली. या भुरळ घालण्याच्या प्रक्रियेत त्याने काही राजकारण्यांनाही आपल्या दरबारात नतमस्तक व्हायला लावले. पुरोगामीत्वाचा उद्घोष करणाऱ्या नेत्यांनीही जाहीरपणाने खरातवर स्तुतीसुमने उधळल्याचे समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमधून दिसून आले आहे. राजकीय नेत्यांची समाजमनात एक विशिष्ट प्रतिमा तयार झालेली असते. त्यांच्या आलिशान जीवनशैलीचे आकर्षण असणारा मोठा वर्ग असतो. राजकारणातील लाभ पदरात पाडून घेत पाहता पाहता संपत्तीचे इमले बांधणारे राजकारणी पाहताना सामान्यांना त्यामागचे गमक जाणून घ्यायचे असते. साहजिकच अशा वेळी राजकारणी मंडळी जेव्हा एखाद्या बाबा-बुवाच्या दरबारात जातात, त्यांच्या खासगी भेटी घेतात, त्यांचे आशीर्वाद घेतलेले फोटो समाजमाध्यमात व्हायरल करतात तेव्हा त्यातून एक प्रकारचा संदेश समाजात जातो. अशोक खरातसारख्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना असते. त्यामुळे ते राजकीय सावजांच्या शोधात असतात. त्यांच्या साहाय्याने आणि बरेचदा वरदहस्ताने मग या भोंदूंचा ‘कारभार’ विस्तारू लागतो. वास्तविक पाहता, महाराष्ट्रात अंधश्र्द्धेच्या नावाखाली होणारे शोषण आणि अघोरी प्रथांना लगाम घालण्यासाठी ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013’ हा क्रांतिकारी कायदा लागू झालेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी या कायद्यासाठी अनेक वर्षेदिलेला लढा महाराष्ट्राने पाहिला आहे. पण त्यांच्या पश्चात हा कायदा संमत झाला. डॉ. दाभोलकर हयात नसले तरी त्यांनी दिलेली विवेकवादाची पणती तेवत ठेवणे, ही समाजाची आणि राजकारण्यांची जबाबदारी आहे. परंतु खरात प्रकरणामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे धागेदोरे गुंतल्याचे समोर येत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव यासंदर्भात सर्वांत प्रथम पुढे आले आणि अखेरीस त्यांना राजीनामा द्यावा लागला.
धनदांडग्यांची, मध्यमवर्गीयांची आर्थिक लूट करून खरातने अमाप संपत्ती जमवली आहे. नाशिक जिल्ह्यातील मिरगाव येथे एक भव्य फार्महाऊस बांधले आहे. खरात हा ‘ईशान्येश्वर महादेव मंदिरा’चा अध्यक्ष म्हणून मिरवत असे, ज्यामुळे समाजात त्याची एक धार्मिक प्रतिमा तयार झाली होती. याच प्रतिमेचा वापर करून त्याने अनेक राजकीय नेते आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले होते. मात्र, या धार्मिक मुखवट्यामागे बलात्कार, लैंगिक शोषणासारखे अत्यंत घृणास्पद गुन्हे राजरोसपणे खरात करत होता. एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीने जिवानिशी मारण्याची धमकी देऊन खरातने तिच्यावर नाशिकमधील आपल्या कार्यालयात वारंवार बलात्कार केला. 60 हून अधिक आक्षेपार्ह चित्रफिती, बेकायदेशीर शस्त्रसाठा यातून या भोंदूगिरीचे जाळे किती खोलवर पसरले होते, याची प्रचिती येते.तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेला पेन ड्राईव्ह या प्रकरणाची व्याप्ती स्पष्ट करतो. खरातने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असावे अशी शक्यता आहे. हे व्हिडिओ ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जात होते की विकृत आनंदासाठी, याचा शोध घ्यावा लागणार आहे.
या प्रकरणातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते, ती म्हणजे मानवी मनाची हतबलता आणि त्यातून निर्माण होणारी अंधश्र्द्धा. मानवी मन हे मुळातच अनिश्चिततेला घाबरणारे असते. आयुष्यात एखादे संकट येते किंवा यशाचा मार्ग धूसर होतो, तेव्हा तर्क आणि विज्ञानाऐवजी अनाकलनीय शक्तींवर विश्वास ठेवण्याकडे माणसाचा कल वाढतो. भोंदूगिरीचे संपूर्ण साम्राज्य या हतबलतेवरच उभे असते. अशोक खरातच्या प्रकरणात अडकलेले लोक अशिक्षित नव्हते, परंतु त्यांच्या मनात असलेली अपयशाची भीती किंवा मृत्यूचा धाक इतका प्रबळ होता की त्यांनी आपला विवेक गहाण ठेवला.जोपर्यंत समाज स्वतःहून अशा प्रवृत्तींना नाकारत नाही, तोपर्यंत खरातसारखे ‘कॅप्टन’ नवीन मुखवटे धारण करून समाजात वावरतच राहतील. आता चेंडू राज्य सरकारच्या आणि एसआयटीच्या कोर्टात आहे. केवळ खरातला अटक करून चालणार नाही, तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. जेणेकरुन लोकांच्या आगतिकतेचा फायदा घेण्याची हिंमत येणाऱ्या काळात कुणी करणार नाही. -ॲड. प्रदीप उमाप, कायदे अभ्यासक
Check Also
ऊर्जा राजनयाचे यश
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जगाची तेलजहाजे अडकून पडलेली असताना भारताने आपली जहाजे सोडवून आणण्यात यश मिळवले आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र