प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते की त्याने आपल्या करिअरमध्ये अकल्पनीय उंची गाठावी, पण बहुतांश तरुण हे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकत नाहीत. ते मेहनत आणि योग्य दिशेने काम करण्याच्या बाबतीत अनेकदा मागे पडतात. अनेकदा तर प्रतिभावान व स्मार्ट तरुणसुद्धा योग्य संधी गमावतात. अखेर या समस्येपासून वाचण्याचा मार्ग काय आहे? करिअर तज्ज्ञांच्या मते जर ८० टक्के विरुद्ध २० टक्के या फॉर्म्युल्यानुसार चालले गेले, तर यश निश्चित आहे. हा फॉर्म्युला आपण आपल्या करिअरमध्ये ऐकणे, शिकणे आणि मेहनत करणे या क्रियांमध्ये लागू करायला हवा. फक्त २० टक्के बोलण्यात आणि स्वप्न पाहण्यात खर्च करायला हवा.
आजकाल भारतीय तरुण सोशल मीडिया व नेटवर्किंग साइट्समध्ये बहुतांश वेळ बोलण्यात आणि स्वतःला प्रोजेट करण्यात घालवतात. अनेकदा ते मुलाखतीदरम्यान इतके बोलतात की निवड करणार्यांना त्यांच्यात संयमाची कमतरता आहे हे लगेच समजते आणि अखेरीस त्यांची निवड होत नाही. म्हणून ऐकणे ८० टक्के हवे आणि बोलणे फक्त २० टक्के.
जेव्हा कॅम्पस प्लेसमेंटसाठी कंपन्या महाविद्यालय परिसरात मुलाखतीसाठी येतात, तेव्हा अनुभवहीन तरुण इतके बोलतात की मुलाखत घेणारे पॅनल त्यांच्या नावाकडे लक्ष न देता पुढे निघून जाते. ऑफिस कल्चरमध्येही ही गोष्ट वारंवार समोर येते. अनेक तरुण आपला सहकारी संपूर्ण बोलून पूर्ण करायच्या आधीच उत्तर देऊ लागतात. करिअर सल्लागार ही वाईट सवय मानतात आणि यशासाठी अडथळा मानतात. ऑफिस कल्चरमध्ये तोच माणूस यशस्वी ठरतो, जो ८० टक्के ऐकतो आणि फक्त २० टक्के बोलतो. याचे व्यावहारिक उदाहरण म्हणजे राजकारण. पॉलिटिसमध्ये तोच नेता टिकतो, जो जनतेचे जास्त ऐकतो आणि स्वतः कमी बोलतो. म्हणजे जास्त ऐकणे, कमी बोलणे हा यशाचा पहिला ठोस नियम आहे.
लाखो तरुण सरकारी नोकरी, आयआयटी, आयआयएम, सिव्हिल सर्व्हिसेस किंवा मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करण्याचे स्वप्न खूप पाहतात, पण त्याच्या तुलनेत मेहनत खूपच कमी करतात. नियम असा आहे की स्वप्न पाहण्यापेक्षा किमान चारपट जास्त मेहनत करावी लागते, तेव्हाच यशाची हमी मिळते. स्पर्धा परीक्षांत दरवर्षी लाखो विद्यार्थी सहभागी होतात. यूपीएससी, एसएससी, बँकिंग आणि रेल्वे या सर्व परीक्षा अशा आहेत की ज्या विद्यार्थ्यांना यश मिळते ते स्वप्ने पाहण्याच्या तुलनेत चारपट जास्त मेहनत करतात. जे विद्यार्थी ८० टक्के वेळ तयारी, सराव आणि पुस्तकांत घालवतात, त्यांच्यासाठी या परीक्षांत यश मिळवणे सोपे ठरते.
भारतात स्टार्टअप यशाचे प्रमाण जगातील इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या तरुणांनी जितकी स्वप्ने पाहिली, तितकी मेहनत ते करत नाहीत. ही बाब केवळ नोकरीच्या संदर्भातच नाही तर व्यवसाय व शेतीच्या संदर्भातही लागू होते.
जे तरुण बहुतांश वेळ सोशल मीडियावर मोठमोठ्या गप्पा मारण्यात आणि दिखाव्यात गुंतलेले असतात, ते सोशल मीडियातून काही शिकत नाहीत, उलट स्वतःचे नुकसान करतात. कारण तज्ज्ञ सांगतात की सोशल मीडियाचा देखील यशासाठी वापर करता येतो. यासाठी आपण यातून ८० टक्के वेळ शिकण्यात आणि फक्त २० टक्के वेळ इतर गोष्टींमध्ये घालवणे गरजेचे आहे. हा फॉर्म्युला स्वीकारलात तर सोशल मीडिया तुमच्यासाठी यशाचे साधन बनेल.
योग्य पद्धत म्हणजे स्वप्ने पाहण्यापेक्षा चारपट जास्त मेहनत करणे. स्किल डेव्हलपमेंटमध्ये दररोज ८० टक्के वेळ घालवा आणि फक्त २० टक्के वेळ स्वप्ने पाहण्यात खर्च करा.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र